नवी दिल्ली । गेल्या काही काळापासून पामतेलसह खाद्यतेलाच्या किंमतीत झालेल्या प्रचंड वाढीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. खाद्यतेलाच्या या किंमती कमी करण्यासाठी सरकारने काही पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत तेलबिया पिकांना प्रोत्साहन देत सरकारने बजटमध्ये नवीन मिशन सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याद्वारे येत्या पाच वर्षांत तेलबियांचे उत्पादन 5 कोटी टनांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे बाजारात झपाट्याने वाढणाऱ्या खाद्यतेलाच्या किंमती तर कमी होतीलच मात्र त्याबोबरच पिकांना प्रोत्साहन दिल्याने देशातील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल.
खरे तर खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींचा परिणाम देशांतर्गत किंमतींवरही होतो, त्यामुळे बाजारासह शेतकऱ्यांचा विचार करून सरकारने अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद केली आहे. अर्थसंकल्प 2022 अंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला दिलेल्या अनुदानात याचा उल्लेखही करण्यात आला आहे. भारताला खाद्यतेलाच्या (तेलबिया) बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी तेलबिया पिकांसाठी NME-OS हे नवीन मिशन लाँच करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
याद्वारे पुढील पाच वर्षांत 1676 किलो प्रति हेक्टर उत्पादनासह 54.10 मिलियन टन उत्पादन घेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या हे उत्पादन 36.10 मिलियन टन असून 1254 किलो प्रति हेक्टर आहे. 3.5 मिलियन हेक्टर अतिरिक्त तेलबिया क्षेत्र (28.79 मिलियन हेक्टरवरून 32.31 मिलियन हेक्टर) मोहरी आणि सोयाबीन मिशन अंतर्गत आणले जाईल तर तांदूळ नापीक जमीन, आंतरपीक, उच्च उत्पन्न देणारे जिल्हे आणि अपारंपारिक राज्य/हंगामी तेलबियांच्या माध्यमातून पीक विविधीकरण केले जाईल. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या मिशनमुळे तेल आयात अवलंबित्व 52 टक्क्यांनी कमी होऊन 36 टक्के होईल.
पाम तेल हे एक वनस्पती तेल आहे, जे जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्येही पाम तेलाचा वापर खाद्यतेलाप्रमाणे होतो. याशिवाय पाम तेलाचा वापर अनेक उद्योगांमध्ये तसेच आंघोळीचा साबण बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. सध्या जगभरात 80 मिलियन टनांहून जास्त पाम तेलाचे उत्पादन केले जाते. खाद्यतेलाच्या बाबतीत, भारताच्या आयातीपैकी दोन तृतीयांश वाटा एकट्या पाम तेलाचा आहे. भारत दरवर्षी 9 मिलियन टनांहून जास्त पाम तेल आयात करतो.