मुंबई । महाराष्ट्रात १४ हॉटस्पॉट होते ते आता ५ वर आले आहेत हे चित्र दिलासादायक आहे. औरंगाबाद, सांगली, अहमदनगर हे हॉटस्पॉट होते. मात्र आता ते हॉटस्पॉट नाहीत. मालेगाववर जास्त फोकस केला असता तर हॉटस्पॉट ४ झाले असते अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्रातला डबलिंग रेट हा सध्या ७ दिवसांवर आहे. सध्या आपण जे कमी करतो आहे. डबलिंग रेटसाठी आता लागणारा कालावधी आपल्याला आणखी वाढवायचा आहे. ICMR ने ज्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे” असंही टोपे यांनी म्हटलं आहे. “धारावी आणि अन्य ठिकाणी मी केंद्रीय समितीसोबत होतो. जनतेत काहीसं भीतीचं वातावरण आहे. जो अंदाज वर्तवण्यात आला आहे तो मॅथेमॅिटकल आहे. यासाठी काही शास्त्र असतं मात्र त्यामध्ये असंही आहे काही गृहितकं धरली गेली आहेत. उदा. आपला डबलिंग रेट ३.८ असेल. आपण काहीही केलं नाही तर काय होईल? असे अंदाज आहेत. ७ हजारांपेक्षा जास्ट टीम हे सर्वे करत आहेत. त्यामुळे कुणीही घाबरुन जाऊ नये असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ९० हजाराच्या आसपास टेस्ट झाल्या आहेत” असंही त्यांनी म्हटलं आहे.
संस्थात्मक क्वारंटाइन आपण वाढवतो आहोत. समजा रुग्णांची संख्या वाढली तर आपली तयारी असावी तरीही आपण सगळी तयारी करतो आहोत. धारावीत होम क्वारंटाइन शक्य नाही. त्यामुळे ज्यांना करोनाची लक्षणं दिसत असतील तर समोर या असं आवाहन राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा केलं. बरेच रुग्ण अगदी शेवटच्या स्टेजला येतात, दुर्लक्ष करतात त्यावेळी उपाय करणं कठीण होऊन बसतं. हे घडू नये म्हणून थोडीही लक्षणं दिसली तरीही फिव्हर क्लिनिकमध्ये जा असंही आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. ८३ टक्के लोक हे सृदृढ आहेत त्यांच्यात लक्षणं नाहीत हे सगळं चित्र आशादायी आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये असंही मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगेन असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत ३ हजार ६८३ इतके रुग्ण आहेत अशीही माहिती टोपे यांनी दिली. राज्यातील ३८ लॅब मध्ये ७ हजारांपेक्षा जास्त टेस्ट होत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. आधी तीन दिवसात रुग्ण संख्या दोन अंकी व्हायची ती आता सात दिवसांवर गेली आहे. मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. महाराष्ट्रासाठी विशेष टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. एकही मृत्यू होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जे मृत्यू झाले झालेत त्यापैकी बहुतांश रुग्णांना इतर आजारांचा इतिहास होता असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला WhatsApp ला Join व्हा आणि Facebook पेज Like करा