सातारा | ओबीसींना राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी राज्यभरात मेळावे होणार आहेत. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सामाजिक न्यायमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवारी (ता. 12) कराड येथे वेणूताई चव्हाण सभागृहात होणार असल्याची माहिती युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दादासाहेब काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ओबीसी समन्वयक संजय विभूते, संजय धायगुडे, जगन्नाथ कुंभार, मारुती जानकर, बाळासाहेब किसवे, राजाभाऊ गोरे आदी उपस्थित होते. काळे म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून ओबीसींच्या माध्यमातून चळवळ उभी केली जात आहे. ओबीसी समाजात ३७६ जाती येतात. या सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे. ‘व्हीजेएनटी’मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणे व इतर मागण्यांसाठी मेळाव्यात दिशा ठरविण्यात येणार आहे.
”संजय विभूते म्हणाले, “ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देणार, असे सांगितले जात असताना अडचण कुठे आहे. तसेच, ओबीसी नेते प्रस्थापित नसल्याने त्यांना न्याय देण्याची गरज आहे. ओबीसींचे संघटन बांधणीसाठी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी समाजातील सर्व घटक एकत्र येणार आहेत. राजकारणात ओबीसी समाजाला संपविण्याचा डाव आखला जात असून, राज्यभरात समाजाच्या न्याय हक्कासाठी विभागनिहाय मेळावे होणार आहेत.”