हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करीचे प्रमाण वाढलेले आहे. या ठिकाणी वाळू तस्करांवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. यामध्ये उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड हे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भंडारा येथील पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तलाठी, पोलीस कर्मचारी असलेल्या पथकासह पवनी निलज रस्त्यावर पहाटेच्या सुमारास गस्त घातली. यावेळी त्या ठिकाणी वाळू तस्करांची वाहने आली असता त्यांनी ती अडवण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नात 15 ते 20 तस्करांनी हातात काठ्या व दगड घेऊन राठोड यांच्यासह त्यांच्या पथकावर हल्ला केला. यामध्ये वाळू तस्करांनी राठोड याच्या गाडीच्या काचाही फोडल्या. या घटनेत अधिकारी रवींद्र राठोड हे जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर हल्लेखोर वाळू तस्करांविरोधात पवनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वीही केला होता हल्ल्याचा प्रयत्न
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरात दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या पथकांवर रेती तस्करांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यातील दोन तस्करांना पोलिसांनी अटकही केली होती. आता थेट एसडीओंच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याने या घटनेने महसूल प्रशासनासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.