सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
जनावरे चरण्यासाठी गेलेल्या वृद्धावर रानगव्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील पाटण तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यातील शिरळ येथे ही घटना घडली आहे. हरिबा सुर्यवंशी असे गव्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पाटण तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या शिरळ येथील एक शेतकरी आपली जनावरे चरावयास घेऊन डोंगराकडे गेला होता यावेळी या शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला झाला. या गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्र पाल तुषार नवले, पाटण वनपाल सावर्डेकर, वनरक्षक कदम व कर्मचारी शनिवारी रात्री घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर शेतकऱ्याचा मृत्यू हा गव्याच्या हल्ल्यात झाला आहे असं वनविभागाने सांगितले. वन कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाची पाहणी केली व वन्य प्राण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला . या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे पाटण परिसरात खळबळ उडाली आहे. गव्याच्या हल्ल्यामुळे शिरळ व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.. दरम्यान वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.