उस्मानाबाद प्रतिनिधी । शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आज कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी गावात जीवघेणा हल्ला झाला. महायुतीचे विधानसभा उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ ओमराजे गावात आले असताना अजिंक्य टेकाळे या तरुणाने हस्तांदोलन करताना अचानकपणे ओमराजेंवर चाकू हल्ला केला. यामध्ये ओमराजेंचं घड्याळ आडवं आल्याने त्यांना कुठलीही इजा झाली नाही. घटनास्थळावरून हा तरुण लगेच पसार झाला मात्र पोलीसांनी त्याला त्याच्या घरी जाऊन अटक केली आहे.
ओमराजेंवर हल्ला करणारा कार्यकर्ता भाजपाच्या आयटी सेलचा कळंब तालुकाध्यक्ष असल्याचं समजलं आहे. ओमराजेंनी भाजपविरोधी काही वक्तव्य केल्याने त्यानं आक्रमक पाऊलं उचलल्याची गावात चर्चा असून त्याने त्याचा फेसबुकवरून अशा प्रकारच्या पोस्टही टाकल्या आहेत.
हा कार्यकर्ता नेहमी भांडणाच्या मूडमध्ये असतो, शिवाय त्याचं मानसिक संतुलन ठीक नसल्याचंही गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यानं नेमकं असं का केलं हे ओमराजे आणि पोलीस सांगण्यास तयार नाहीत.जोपर्यंत गुन्हा दाखल होतं नाही तोपर्यंत त्यानं हा हल्ला का केला हे स्पष्ट होणार नाही.