ओमराजेंचा खर्च 35.63 लाख तर राणांचा 33.25 लाख – ट्रेंड कायम राहणार की बदलणार?
उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून, या निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या 14 उमेदवारांनी आपला निवडणुक खर्च निवडणुक आयोगाकडे सादर केला आहे. शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे निवडणुक खर्चाच्या बाबतीत आघाडीवर राहिले असून,त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना निवडणुक खर्चात मागे टाकले आहे. ओमराजे यांनी लोकसभा निवडणुकीत 35 लाख 36 हजार 241 रुपये खर्च केला तर राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी 33 लाख 25 हजार 633 रुपयांचा खर्च केला आहे.
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळाली. कोणता उमेदवार जिंकणार? यावर पैंजा लागल्या असतानाच ओमराजे यांनी निवडणुक खर्चात बाजी मारली आहे त्यामुळे निकालात कोण बाजी मारेल? ही चर्चा पुन्हा रंगली आहे. आमदार राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना धनलक्ष्मी प्रसन्न असताना देखील त्यांनी लोकसभा निवडणुकीत ओमराजेंच्या तुलनेत कमी खर्च केल्याचे निवडणुक आयोगाकडे सादर केलेल्या खर्चावरुन दिसते. निवडणुक खर्चाचा हाच ट्रेंड निकालात कायम राहणार की बदलणार? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांनी 8 लाख 66 हजार 435 खर्च करुन ते खर्चात तिसर्या स्थानी राहिले.
भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारादरम्यान झालेल्या निवडणूक खर्चाच्या लेख्याची तृतीय तपासणी निवडणूक निरीक्षक (खर्च संनियंत्रण) पी.सुधाकर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष व पात्र उमेदवार यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या खर्चाचे लेखे जिल्हा खर्च नियंत्रण कक्षात सादर करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.
लोकसभा निवडणुक उमेदवारनिहाय निवडणूक खर्चाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर (पक्ष-शिवसेना) रु.35 लाख 63 हजार 241,
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) रु. 33 लाख 25 हजार 633,
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन (बहुजन समाज पार्टी) रु.66 हजार 940,
अर्जुन सिद्राम सलगर (वंचित बहुजन आघाडी) रु.आठ लाख 66 हजार 435,
अण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल) रु. 93 हजार 708,
दीपक महादेव ताटे (भा.प.सेना पार्टी) रु.एक लाख 34 हजार 668,
विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (क्रांतिकारी जय हिंद सेना) रु.1लाख 2 हजार 541,
आर्यनराजे किसनराव शिंदे (अपक्ष) रु.अठरा हजार 380,
नेताजी नागनाथराव गोरे (अपक्ष) रु.1 लाख 27 हजार 855,
जगन्नाथ निवृत्ती मुंडे (अपक्ष) रु.1 लाख 60 हजार 235,
तुकाराम दासराव गंगावणे (अपक्ष) रु.37 हजार 400,
डॉ.वसंत रघुनाथ मुंडे (अपक्ष) रु.1 लाख 86 हजार 10,
शंकर पांडुरंग गायकवाड (अपक्ष) रु.64 हजार 511,
सय्यद सुलतान लाडखाँ (अपक्ष) 29 हजार 257 रुपये खर्च केले.
निवडणुक खर्चाच्या तपासणीसाठी सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक, जिल्हा खर्च नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या तपासणी बैठकीस खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर शेखर शेटे, सहाय्यक नोडल ऑफिसर किरण घोटकर, संपर्क अधिकारी सचिन कवठे व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.