सोलापूर | तब्बल दोन वर्षानंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार असल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे. येत्या१५ नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे. कार्तिकी यात्रेच्याला सुमारे चार लाख भाविक येण्याची शक्यता आहे. येणार्या वारकर्यांसाठी मंदिर समितीने दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे.
गोपाळपूर रोड लगत दर्शन रांगेसाठी दहा पत्राशेड उभारण्यात आले आहेत. दर्शन रांगेतूनच यंदाचा मानाच्या वारकर्याची निवड केली जाणार आहे. या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा होईल असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी ( kartiki ekadashi ) यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. राज्यात गेली २ वर्षे कोरोनाचे सावट असल्याने मंदिरे त्याचबरोबर इतर धार्मिक स्थळे पूर्णतः बंद करण्यात आली होती. दरम्यान, इतर धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. गर्दी किंवा रस्त्यवर लोक फिरू नये यासाठी कडक लॉकडाऊन देखील करण्यात आला होता. याशिवाय गर्दी टाळण्यासाठी काही कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडण्याचा निर्णय सरकार आणि प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र, यावर्षी कोरोनाचे रुग्ण कमी असल्याने यात्रेला परावानागी देण्यात आली आहे.
कोरोना आणि इतर रोगराईचा धोका पाहून चंद्रभागेमध्ये वाहते पाणी ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत. शहर आणि मंदिर परिसरात आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.