सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
आज मराठी सणांपैकी एक महत्वाचा सण म्हणून मकर संक्रातीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातोय. या सणाचे औचित्य साधत अनेकजण विविध उपक्रम राबवितात. सातारा पोलीस दलाने मकर संक्रांतीचे औचित्य साधून “गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आज पासून अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. आज जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अजिंक्यतारा किल्य्यावर जाऊन स्वच्छता केली. त्यांच्या या मोहिमेचे सर्वत्र कौंटुक होत आहे.
सातारा येथे मकरसंक्रांतीच्या औचित्य साधून आजपासून सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘आपले किल्ले, आपली जबाबदारी’ या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. आज सकाळी या मोहिमेला अजिंक्यतारा किल्ल्यावरून प्रारंभ करण्यात आला. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गडावरील गवत, कचरा एकत्रित करत स्वच्छता केली.
सातारा पोलीस दलाची अनोखी मोहीम : मकर संक्रातीनिमित्त 'अजिंक्यतारा'वर केली स्वच्छता pic.twitter.com/SSgxe4cK9S
— santosh gurav (@santosh29590931) January 15, 2023
अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आता सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक रविवारी सातारा पोलीस दलातील कर्मचारी ही मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेत पोलिसांच्या बरोबरीने साता-यातील नागरिक, व्यापारी, तरुणांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन शेख यांनी केले.