पैलवान खाशाबा जाधवांची Google कडून दखल पण सरकारचं दुर्लक्ष; संभाजीराजेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीत जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आज ९७ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज गुगलने डुडलद्वारे खाशाबा जाधव यांना मानवंदना दिली. यावरून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही ! गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे !, असे संभाजीराजेंनी म्हंटले आहे.

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज ट्विट करत शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून “पद्म” पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत.

मी खासदार असताना 2017 ते 2022 अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर “पद्मविभूषण” मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला, मात्र शेवटी उपेक्षाच झाली.

आता तरी सरकारने जागे व्हावे. या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना “पद्म” पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे शेवटी राजेंनी म्हंटले आहे.

कास्यपदक जिंकून भारताचा तिरंगा फडकवला डौलाने

घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असतानाही त्यावर मात करत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वरचे पैलवान खाशाबा जाधव यांनी ग्रामीण भागामध्ये त्याकाळी कसल्याही सोयीसुविधा नसताना अपार मेहनत घेतली. अनेक संकटांचे टप्पे पार करत त्यांनी परिस्थितीला शरण जाण्यास भाग पाडून देशातून वैयक्तिक क्रीडा प्रकारात देशाच्या ऑलिंपिक खेळाडूंच्या पथकात स्थान पटकावले. त्यांनी हेलसिंकी येथे झालेल्या कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात कास्यपदक जिंकून भारताचा तिरंगा तेथे डौलाने फडकवला. त्यानंतर कित्येक वर्षे देशाला वैयक्तिक वा सांघिक प्रकारात पदक पटकावता आलेले नव्हते. तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास थरारक आणि थक्क करणार आहे.