यंदाही महामानवाला घरातूनच अभिवादन

पोलीस व आंबेडकरी अनुयायांची संयुक्त बैठक

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आपण सर्व मिळून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक जयंती साजरी करू, गर्दी टाळून घरातूनच महामानवाला अभिवादन करुयात, असे आवाहन पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी केले. आंबेडकर जयंतीनिमित्त पैठणगेट येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयात दोन दिवसांपूर्वी उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन व आंबेडकरी अनुयायांची संयुक्त बैठक पार पडली.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त भापकर, पोलीस निरीक्षक सचिन सानप, माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, दिनकर ओंकार, श्रावण गायकवाड, गौतम खरात, मुकुंद सोनवणे, दौलतराव मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यंदाही कोरोनाच्या परिस्थितीला धीराने तोंड देण्याकरिता शासनाच्या निर्देशाचे काटेकोर पालन केले जाईल, कोरोनाचा संसर्ग होणार नाही, असे उपक्रम राबविण्यावर आमचा भर असेल, याशिवाय मिरवणूक न काढता शैक्षणिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, कोरोना व लसीकरणाची जनजागृती करणे, ऑनलाईन उपक्रमातून विचारांचा प्रचार व प्रसार करणे आदी उपक्रम राबविण्याची ग्वाही जयंती उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीत दिली.

शासनाने काहीवेळ निर्देश शिथिल करून जयंतीच्या सजावटीचे साहित्य, फूल-हार खरेदीसाठी वेळ द्यावा, भडकलगेट येथे नियम व अटींचे पालन करुन अभिवादन करण्याची परवानगी द्यावी, शासनाने जर परवानगी दिली नाही अथवा निर्बंध कडक केल्यास जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मनपा प्रशासकांनी बाबासाहेबांना नागरिकांच्या वतीने अभिवादन करावे, अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्या. यावेळी नागराज गायकवाड, संदीप शिरसाठ, डॉ. जमील देशमुख, योगेश बन, अरुण बोर्डे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, विजय वाहुळ, मुकुल निकाळजे, आनंद कस्तूरे, शैलेंद्र मिसाळ, श्रीरंग ससाणे, जयश्री शिर्के, सचिन शिंगाडे, प्रेम सोनवणे तसेच पोलीस कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

You might also like