सातारा | खोजेवाडी (ता. सातारा) गावच्या हद्दीत पायी जात असलेल्या प्रदीप अर्जुन देशमुख (वय- 40) यांना गुरुवारी रात्री भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या रात्रीच झालेल्या या अपघातात प्रदीप देशमुख यांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, टेम्पो (एमएच- 11 सीएच- 0134) हा आंबेवाडी येथून दूध संकलन करून नांदगावला जात होता. याच मार्गावर प्रदीप देशमुख हे शतपावलीसाठी जात होते. याचवेळी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात प्रदीप गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, प्रदीप देशमुख यांच्या लग्नाचा गुरुवारी वाढदिवस होता. याच दिवशी त्यांची सासूरवाडी तळबीड (ता. कराड) येथील यात्रा असल्याने पत्नी व मुली यात्रेला गेल्या होत्या. या घटनेत लग्नाच्या वाढदिनीच काळाचा घाला बसल्याने खोजेवाडीसह सारा परिसर शोकसागरात बुडून गेला. याप्रकरणी टेम्पो चालकावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.