कराड प्रतिनिधी । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय ५९) रा. रेठरे बुद्रुक ता. कराड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र या घटनेमुळे इतरांनी काळजी करू नये. कोरोना लसीमुळेच हि घटना घडली असेल असे नाही. अनेकदा इतर कारणांमुळेही अशी घटना घडते असं तज्ज्ञांनी सांगितले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 16 रोजी रेठरे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस टोचल्यानंतर दहा मिनिटात लस घेणाऱ्या व्यक्तीला चक्कर आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला उपचारासाठी कराड (मलकापूर) येथील कृष्णा हॉस्पिटलला नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे कराड तालुका आणि परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण अतिशय महत्वाचे असून नागरिकांनी अशा घटनांमुळे घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असं डॉक्टरांनी सांगितले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group