कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील शेवाळेवाडी-म्हासोली (ता. कराड) येथील अथणी शुगर्स – रयत साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मेट्रिक टन 2 हजार 925 रुपयांप्रमाणे एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. त्याचबरोबर तोडणी वाहतुकीचीही बिले बँक खातेवर जमा केल्याची माहिती अथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांनी दिली.
रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील, अथणी शुगर्सचे संचालक योगेश पाटील, सुशांत पाटील, युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील आदी उपस्थित होते. शेवाळेवाडी येथील अथणी- रयत साखर कारखान्याने सर्वात पहिल्यांदा एफआरपी जाहीर करत सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडली आहे.
यंदा 23 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत गाळपास आलेल्या उसाचे बिल शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याने 38 दिवसांत एक लाख 22 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असुन एक लाख 27 हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. अथणी- रयत शुगर्सने मागील गळीत हंगामातील गाळपास आलेल्या उसास दोन हजार 900 रुपये एक रक्कमी दर दिला होता.