औरंगाबाद | राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत स्थानिक नागरीकांनी केलेल्या मागण्यांचे निवेदन आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना नवी दिल्ली येथे दिले. राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) रस्त्याच्या प्रलंबीत मागण्या व चाळीसगाव घाटातील बोगदा होण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने एक लाख सह्यांचे निवेदन आज केंद्रीय मंत्र्याना सुपूर्द करण्यात आले. संभाजीनगर-चाळीसगाव रेल्वे विभागासोबत संयुक्तपणे रेल्वे लाईनचे काम करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत औट्रम घाटातील बोगदा कुठल्याही परिस्थितीत होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या शिष्टमंडळाला दिली. या बोगद्याला पाच हजार कोटीचा खर्च असल्याने रद्द झाल्याचे चुकीच्या बातम्या पसरविण्यात आल्या मात्र या खर्चामध्ये थोडीफार कपात करुन मराठवाडा खान्देश उत्तर महाराष्ट्राला जोडणारा हा बोगदा महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या बोगद्याचे महत्व लक्षात घेता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग २११ संसदेत, लोकसभेत अनेकदा प्रश्न उपस्थित करुन जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यावेळी बोगद्याचाही विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मंत्री महोदयांच्या समोर निदर्शनास आणून दिले. या रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, जो पर्यंत बोगदा पूर्ण होत नाही तो पर्यंत ट्राफीक जामची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे असलेला हा परिसर पूर्णपणे वाहतुकीस सक्षम झालेला नाही.
राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) यावर आतापर्यंत हायवे क्रॉसिंगवर ३५ ते ४० अपघात झाले असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. यामध्ये गल्लेबोरगाव ते देवगाव राज्य महामार्ग ३९ लासूरस्टेशन हा रस्ता ओलांडताना अपघाताची नविन समस्या निर्माण झाली आहे.
बोरगाव, टाकळी, चापानेर आदी ३५ ते ४० गावांची ही समस्या असून, याबाबतही प्राधिकरणाला योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देण्यात यावी अशी मागणी केली. कन्नड बायपास, अंधानेर येथेही सर्विस रोडची गरज असून, ती तात्काळ मान्य करावी. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंग राजपूत, संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, सरपंच अशोक दाबके आदींची उपस्थिती होती.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा