मुंबई पोलीस दलातील आणखी एका कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असताना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाची दहशत पसरली असून आज आणखी एका पोलिसाला कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. दादर पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले हेड कॉन्स्टेबल शरद मोहिते (५५) यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान, राज्यात कोरोनाने मृत पावलेल्या पोलिसांची संख्या आता २१ वर पोहोचली असून आतापर्यंत १९६४ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे.

राज्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत कॉन्स्टेबल शरद मोहिते यांच्या मृत्यूंनंतर मुंबईत आतापर्यंत कोरोनाने १३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात हाच आकडा २१ वर पोहचला आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यातील तब्बल १९६४ पोलीस आतापर्यंत कोरोनाबाधित झाले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ८४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर १०९५ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्य पोलीस दलाकडून देण्यात आली. करोना बाधितांमध्ये राज्यातील २२३ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर १७४१ कर्मचारी आहेत. अद्याप १५५ अधिकारी आणि ९४० पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. ६७ पोलीस अधिकारी हे या आजारातून बरे झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment