Navratri 2023 । पूर्वीचे मातापूर व आता माहुर म्हणून प्रसिद्ध असलेले गाव नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे किनवटच्या वायव्येस ४५ किमी. वर असून रेणुकादेवीचे मंदिर व दत्तात्रेयाचे वसतिस्थान यांसाठी प्रसिद्ध आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी हे एक मूळ पीठ मानले जाते. माहुर हे मराठवाडा व विदर्भ यांच्या सीमेवर, डोंगराळ भागात समुद्र सपाटीपासुन सुमारे ७५५ मी. उंचीवर आहे. काही जुन्या अवशेषांवरून येथे पूर्वी मोठे नगर असावे असे दिसून येते. परशुराम आणि रेणुकामाता यांच्या अनेक प्रचलित कथा (रेणुकेचे वसतिस्थान, दहनस्थान इ.) या ठिकाणाशी निगडित आहेत. पुरातन अवशेषांपैकी येथील तटबंदीयुक्त माहुरगड प्रसिद्ध आहे. हा किल्ला तीन बाजूंनी पैनगंगा नदीने वेढलेला आहे.
माहूर गावाजवळच एका उंच टेकडीवर रेणुकामातेचे मंदिर असून ते देवगिरीच्या यादवांनी बांधले. मंदिरात देवीच्या मूर्तीऐवजी तांदळा (निरावयवी पाषाणाचा देव) आहे व त्यालाच देवीच्या मुखाचा आकार देण्यात आला आहे. त्यावर चांदीचा टोप असून बैठकीवर सिंहाचे चित्र कोरलेले आहे. येथील मूळची रेणुकेची मूर्ती उत्तानपाद, शिरोहीन होती असे अभ्यासकांचे मत आहे. रेणुकेच्या मंदिराजवळच कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, परशुराम यांची लहान मंदिरे आहे. दसऱ्याला येथे मोठी यात्रा भरते.
येथून पूर्वेस सुमारे ३ किमी. अंतरावर दुसऱ्या एका टेकडीवर दत्तमंदिर असून ही टेकडी दत्तशिखर या नावाने ओळखली जाते. मंदिरात दत्तात्रेयाची एकमुखी मूर्ती असून या मंदिराला बादशहा औरंगजेबाने ४० हजारांची जहागिरी दिली होती असे म्हणतात. येथून जवळच अनसूयेचे मंदिर, अत्री ऋषीच्या पादुका, सर्वतीर्थ नावाचे कुंड, संत विष्णुदासांचा मठ, मातृतीर्थ (मावळा तलाव) इ. दत्त व माता रेणुकेच्या कथांशी निगडित अनेक पवित्र ठिकाणे आहेत.
परशुराम हा रेणुकेचा पुत्र. तो स्वतः सात चिरंजीवांपैकी एक समजला जातो. भृगुकुलातील जमदग्नी ऋणी हा त्याचा पिता व इक्ष्वाकू वंशीय राजाची कन्या रेणुका ही त्याची माता. भृगुकुलोत्पन्न म्हणून भार्गवराम, असेही त्याचे नाव रूढ आहे. हा विष्णूचा अवतार व शिवाचा भक्त होता. नर्मदेच्या तीरावर जमदग्नींचा आश्रम होता. तेथे वैशाख शुद्ध तृतीयेच्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला. ही तिथी परशुरामजयंती म्हणून समजली जाते.
परशुरामाने पित्याकडून वेदविद्येचे ज्ञान मिळविले. त्यानंतर गंधमादन पर्वतावर जाऊन त्याने तप केले व शिवाला प्रसन्न करून घेतले. शिवाने त्याला शस्त्रास्त्रविद्या शिकविली व परशू दिला. परशुराम हा धनुर्विद्येत विशेष निष्णात होता. एकदा चित्ररथ गंधर्वाला पाहून रेणुकेचे मन विचलित झाले. त्यामुळे जमदग्नी रागावले व रेणुकेचा वध करण्याची त्यांनी आपल्या पाच मुलांना आज्ञा केली. त्यांपैकी एकट्या परशुरामानेच पित्याची आज्ञा पाळली व आईचा शिरच्छेद केला. त्यामुळे जमदग्नी परशुरामावर संतुष्ट झाले व त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करण्याचाच वर मागितला. रेणुका पुन्हा जिवंत झाली.
चक्रधरस्वामीचे (महानुभाव पंथाचे मूळ पुरुष) गुरू चांगदेव राऊळ यांनी माहुर येथेच दत्तात्रेयापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला, अशी भाविकांची समजूत असल्याने महानुभाव पंथीयांच्या दृष्टीने हे ठिकाण महत्त्वाचे बनले आहे. दत्त जयंतीला येथे मोठी यात्रा भरते.
(लेखक – प्रतीक पुरी)