कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
अनैतिक संबंधाच्या संशयावरून मंगळवार पेठ येथील पांढरीचा मारूती मंदिराजवळ असलेल्या भेळगाडा चालकावर धारदार कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकास अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता शुक्रवार दि. 12 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मिलिंद कृष्णत शिंदे (वय 21, रा. बुधवार पेठ, कराड) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. तर पांडुरंग बाबूराव नाईक (वय 36, रा. कोरेगाव, ता. कराड) असे पोलीस कोठडी मिळालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भेळगाडा चालक मिलिंद शिंदे याचे संशयित पांडुरंग नाईक याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पांडुरंगला होता. या संशयावरून सोमवारी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ येथील पांढरीचा मारूती मंदिराजवळ मिलिंद शिंदे हा भेळगाड्यावर व्यवसाय करत होता. त्यावेळी पांडुरंग नाईक याने त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने स्वतःच्या चेहर्यास व अंगावर काळा रंग लावून मिलिंद शिंदे यांच्या मानेवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतिने फिरवून संशयित पांडुरंग नाईक यास अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता शुक्रवार दि. 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे, सहाय्यक फौजदार संतोष सपाटे, राजेंद्र पुजारी, सतिश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलीस नाईक असिफ जमादार, संजय जाधव, सचिन साळुंखे, तानाजी शिंदे, मारूती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव यांनी केली