सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
आटपाडी येथील प्रकाशवाडी परिसरात राहत असलेल्या प्राण रमेश चव्हाण या युवकाच्या मोबाईलचा खिशात अचानक स्फोट झाला असून त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर या घटनेबाबत सदर मोबाईल कंपनी विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आहे. या घटनेमुळे आटपाडीत हळहळ व्यक्त होत असून युवा पिढीने मोबाईल हाताळण्याबाबत योग्य काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे. मोबाईलच्या अशा अचानक स्फोट होण्यामुळे आटपाडीकर चांगलेच हादरले आहेत.
या घटनेबद्दल सांगायचे झाल्यास प्राण चव्हाण हा मोलमजूरी करून गुजराण करत आहे. काम करत असल्यामुळे त्याने आपला मोबाईल खिशात ठेवून दिला होता. मात्र मोबाईल गरम होऊन अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये त्याच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी सांगली सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी व्यवस्थीत उपचार न मिळाल्याने त्याला पुन्हा आटपाडी येथे उपचारासाठी आणण्यात आले.
सुमारे 1 महिन्यापूर्वी प्राण याने सांगली येथून मोबाईल खरेदी केला होता. ज्याचा अचानक स्फोट झाल्यामुळे त्याने कंपनी विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर घटना दि.19 जानेवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दि.21 जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली असून सध्या तालुकाभर याची चर्चा होते आहे. प्राण चव्हाण हा मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे.