कराड | कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी तानाजी विष्णू निकाळजे (वय 41) याला दोषी धरून कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी दहा वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी ही माहिती दिली.
सरकारी वकील शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मे 2020 रोजी उंब्रज परिसरातील एका गावातील मतिमंद मुलगी शेतात गेली होती. ती शेतातून परतत असताना आरोपीने तिला एकटे गाठून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी एकूण 8 साक्षीदार तपासले. सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांचा युक्तिवादाचा आधार घेेऊन न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम. एस. तलबार यांनी केला. याकामी पोलीस हवालदार प्रमोद पाटील, प्रकाश कार्वेकर यांनी सहकार्य केले.