गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये अशी एक घटना उघडकीस आली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रेयसीची हातोड्याने वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिरामणटोला या ठिकाणी हि संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धनश्री हरिणखेडे असे मृत तरुणीचे नाव आहे तर दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
आरोपी गणेश हा धनश्री हरिणखेडे या तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. घटनेच्या दिवशी धनश्री दुपारी ट्युशनवरून परत येत होती. पण घरी येत असताना मृत्यू आपली वाट पाहत आहे याची किंचितसुद्धा कल्पना धनश्रीला नव्हती. यादरम्यान आरोपी गणेशने मध्येच तिचा रस्ता अडवला. आणि तिच्याशी वाद घालू लागला. काही कळायच्या आता गणेशने सोबत आणलेल्या हातोडीने धनश्रीच्या डोक्यावर सपासप वार केले. हा हल्ला एवढा भयंकर होता कि धनश्रीचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी गणेश हा कित्येक वर्षांपासून धनश्रीकडे प्रेमासाठी तगादा लावत होता. मात्र धनश्रीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या या माथेफिरू गणेशने हा हल्ला केला. यानंतर गावकऱ्यांनी आरोपी गणेशला घेरले. गावकऱ्यांचा जमाव बघितल्यानंतर गणेशने स्वतःला हातोडीने वार करत जखमी करून घेतले. यानंतर गावकऱ्यांनी आरोपी गणेशला पोलिसांच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी आरोपी गणेशवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.