हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये लसीकरण मोहीमेसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु सेनगावच्या तहसीलदाराने चक्क कोरोनामुळे मृत झालेल्या ग्रामसेवकाला कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ओमिक्रॉममुळे केंद्र व राज्य सरकारकडून या नव्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य उपायोजना करण्याकरीता कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव होत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. जिल्हाभरात लसीकरण पूर्णत्वास आणण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. सेनगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही लसीकरण झालेले नाही. त्यामुळे ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लसीकरण संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये तहसील कार्यालयामार्फत आरोग्य विभाग, ग्रामसेवक व इतर प्रशासकीय यंत्रणा गावागावांमध्ये जाऊन नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १६ डिसेंबर तहसील कार्यालयाकडून रोजी लसीकरणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सेनगाव तालुक्यातील ७५ टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेली एकूण ४९ गावे आहेत. त्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षण, स्वस्तधान्य दुकानदार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील रोजगार सेवक, ग्रामपंचायत सेवक यांच्या समवेत सर्व पात्र व्यक्तींनी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासाठी पथक स्थापन करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत मुख्यध्यापक आणि ग्रामसेवकाच्या नावे लसीकरण मोहीम राबविण्यात यावे अन्यथा कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहे.