रघुनाथ गोसावी यांना सालपाळी देण्याचे आदेश; नाथ वंशजांमधील वाद, खंडपीठाचा निर्णय

औरंगाबाद | पैठण येथील श्री. संत एकनाथ महाराजांच्या वंशजातील वादाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचया औरंगाबाद खंडपीठात दाखल दिवाणी अर्जावरील सुनावणीदरम्यान, न्याय विभाग कंकणवाडी यांनी इतर नाथवंशजांनी रघुनाथ बुवा गोसावी यांना 28 जून पर्यंत सालपाळी देण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशामुळे 1 जुलै रोजी होणारे एकनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थानाचे चित्र स्पष्ट झाले. पैठण येथील श्री. संत एकनाथ महाराज मंदिर संस्थानचे गावातील व गोदावरी नदीकाठावरील मंदिर यांचे सालाना व्यवस्थापन व पूजाअर्चा तसेच इतर अधिकारासंबंधी नाथ वंशजांमध्ये वाद सुरू आहे. नाथ वंशज रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांनी आपल्याला 2011 सालची नाथषष्ठी उत्सवानंतर मिळणाऱ्या सालपाळीपासून इतर नाथ वंशजांनी परावृत्त केले आहे. व संबंधित अधिकार वेळोवेळी उच्च न्यायालयाने अबाधित ठेवल्यामुळे तसे इतर वंशजांना करता येणार नाही म्हणून आपणास दोन्ही मंदिराची सालपाळी देण्याचे आदेश देण्यात यावे, अशा स्वरुपाची दाद मागणारा  दिवाणी अर्ज खंडपीठात दाखल केला होता.

सुनावणीअंती न्यायालयाने इतर नाथ वंशजांना 28 जून 2021 रोजी दोन्ही मंदिराची सालपाळी रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांना देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, एकनाथ महाराजांची पालखी 1 जुलै रोजी प्रस्थान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रकरणात रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांच्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित यांनी बाजू मांडली. अ‍ॅड. आशुतोष कुलकर्णी, अ‍ॅड. सुशांत दीक्षित यांनी सहाय्य केले.