पुणे प्रतिनिधी | विशाखा महाडिक
ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि, असे म्हणत, बुधवारी सकाळी दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पा समोर अथर्वशीर्ष पठण केले. यामुळे येथील परिसरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तीमय झाले होते. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या गणपती बाप्पांची मंगळवारी प्राणप्रतिष्ठापना झाली. ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूतन मराठी विद्यालय आणि नूतन मराठी शाळेच्या सुमारे 2 हजार 150 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त पराग ठाकूर, नूमवि शाळेच्या मुख्याध्यापिका कानगुणे व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टच्या वतीने आयोजित आंतरशालेय स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. ट्रस्टकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात पहिली इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती बनवणे, दुसरी चित्रकला स्पर्धा आणि तिसरी निबंध स्पर्धा या तीनही स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीस वाटप करण्यात आले. दरम्यान अथर्वशीर्ष पठणानंतर ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष व शि. प्र. मंडळाचे विश्वस्त पराग ठाकूर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
दि. 20 पासून ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 20 ते 26 तारखेपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर गणेश भक्तांसाठी सुरू असणार आहे. याला पहिल्या दिवशीच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे शिबिर पूर्णतः मोफत असून, यात ब्लड-शुगर, कोलेस्ट्रॉल, बिलीरूबिन, क्रिएटिन, एसजीओटी/ एसजीपीटी यांसारख्या तपासण्या मोफत करण्यात येत आहेत, अशी माहिती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.