सांगली प्रतिनिधी । महापालिकेच्यावतीने शहरातील तंत्रस्नेही विद्यार्थी, नागरिक, स्टार्टअप, उद्योजक, शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय संस्थांसाठी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनाशीसंबंधित स्वच्छ टेक्नाॅलाॅजी चॅलेज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील दोन उत्कृष्ट प्रकल्पांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. 29 डिसेंबर रोजी आमराई उद्यानात स्पर्धा होईल, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
महापालिकेकडून स्वच्छ भारत अभियानातर्गंत विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. स्वच्छता, मलनिस्सारण, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित स्वच्छ टेक्नाॅलाॅजी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत तंत्रस्नेही विद्यार्थी, नागरिक, उद्योजक, शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेशी संबंधित विषयावर प्रकल्पाचे माॅडेल सादर करतील. त्यासाठी २७ डिसेंबरपर्यंत गुगल फाॅर्मवर नोंदणी करावी. 29 डिसेंबर रोजी आमराई उद्यानात प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे. यात सांडपाणी, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापनावर उपाययोजना असतील.
स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध उपकरणे वापरून तयार केलेल्या प्रकल्पाला प्राधान्य असेल, स्पर्धेतील विजेत्यांना 51,41,31,21,11 हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहे. तसेच दोन उत्कृष्ट प्रकल्पांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाईल. राज्यस्तरावर 5 लाखाहून अधिक बक्षिसे आहेत. राज्यस्तरावरून राष्ट्रीयस्तरावर प्रकल्पाची निवड झाल्यास 25 लाखापर्यंतचे पारितोषिक व एक वर्षासाठी फ्रेंचटेक कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.