सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशन व विक्रम फाऊंडेशन, जत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय क्रॉस-कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा दिनांक २६ डिसेंबर जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आली आहे. यापूर्वी संस्थेच्यावतीने अनेक राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातल्या ३६ जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी बोलताना विक्रम सावंत म्हणाले,”यापूर्वी १९९९ साली संघटनेने ४५ वी राज्य मैदानी निवड व अजिक्यपद स्पर्धा, २००० साली ४६ वी राज्य मैदानी निवड व अजिक्यपद स्पर्धा, २००१ साली राष्ट्रीय क्रॉसकंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६ साली सलग दोन वर्षे राज्य १८ वर्षाखालील मुले/मुली मैदानी स्पर्धा, २०१७ साली राज्य क्रॉस-कंट्री निवड व अजिंक्यपद २०१७ तसेच विविध जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय मैदानी स्पर्धेचे निटनेटके, उत्कृष्ठपणे व नियोजनबद्द यशस्वी संयोजनाने पार पाडण्यात आल्या असून त्याची पोच पावती म्हणून या वर्षी राज्यस्तरीय क्रॉस-कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाची आपल्याला पुन्हा संधी मिळाली आहे.”
सदर राज्यस्तरीय क्रॉस-कंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा दिनांक २६ डिसेंबर रोजी राजे रामराव महाविद्यालय सकाळी ठिक ६.३० वाजता या स्पर्धेचे आयोजन केले असून त्याचा बक्षिस वितरण समारंभ स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून ४०० मुले, ३५० मुली तसेच ५० राज्य, राष्ट्रीय पंच, अधिकारी, पदाधिकारी, १०० स्वंयसेवक असा जनसमुदाय येणार आहे. या स्पर्धेतून दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी नागालॅन्ड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे.