उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी
पैज लावणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने कोण निवडून येईल असा प्रश्न उपस्थित करून स्वतः च्या फायद्यासाठी बिनधास्तपणे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पैज लावल्या जात आहेत.
उस्मानाबाद – लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली. यात आघाडीकडून राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील तर युतीकडून सेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निवडणूक लढवली. यांना वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांनी आव्हान दिल्याने ही लढत तिरंगी झाली आहे. आता कोण निवडून येईल यासाठी पैजा लावल्या जात आहेत. शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर या पैजा लागत आहेत.
मतदानानंतर कोण निवडून येईल यासाठी जिल्ह्यात पैजा लागत आहेत. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून जिल्ह्यात पहिल्यांदा राघूची वाडी येथील शंकर मोरे आणि बाजीराव करवर यांनी अशी पैज लावली. त्यानंतर लगेच हनुमंत ननवरे आणि जीवन शिंदे यांनीही शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अशीच पैज लावली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील निवडून आले तर हनुमंत यांची चारचाकी गाडी विनामूल्य जीवन शिंदे यांना देण्यात येईल तर ओमप्रकाशराजे निंबाळकर निवडून आले तर त्यांची बुलेट विनामूल्य हनुमंत ननवरे यांना देण्यात येईल अशा प्रकारच्या पैजा लावण्यात येत आहेत. वास्तविक पाहता हा सट्टा लावण्याचा प्रकार असून याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलेले आहे.
कायद्यानुसार पैज लावण्यावर आहे बंदी
महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ (१८८७ चा मुंबई अधिनियम क्र. ४) The Maharashtra (Mumbai) Prevention of Gambling Act 1887 यानुसार अशा पैज लावणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने कोण निवडून येईल असा प्रश्न उपस्थित करून स्वतः च्या फायद्यासाठी बिनधास्तपणे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पैज लावल्या जात आहेत.