उस्मानाबाद प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या राजकारणात युती आणि आघाडीची गणितं हल्लीच्या काळात बिघडू लागली आहेत. २०१४ साली स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरल्यानंतर युती आणि आघाडी फुटली होती. यंदाच्या निवडणुकीतही युती झाली असली तरी काही ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवरील भाजप सेनेतील संघर्ष मिटला नसल्याचेच चित्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपचे उमेवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची तुळजापूर येथे गुरुवारी साडेचार वाजता सभा आयोजित केली आहे.
या सभेची जोरदार तयारीही सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. पण या तयारीतून सेना-भाजप मधील संघर्ष चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळत आहे. सभास्थळावर लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोटो नाही. महायुतीची सभा असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचारावेळी भाजपबरोबर सेनेचेही झेंडे असं चित्र असताना सेनेचा एकही झेंडा या परिसरात पहायला मिळाला नाही. महायुतीतील इतर मित्र पक्षांचे झेंडे या ठिकाणी आहेत, मग शिवसेनेचाच का नाही? असा प्रश्नही स्थानिक नागरिक आता एकमेकांना विचारू लागले आहेत.
जगजितसिंह पाटील यांना जागावाटपात उस्मानाबादची जागा अपेक्षित असताना युतीमध्ये ती जागा शिवसेनेकडे असल्याने पाटलांना तुळजापूर येथून उमेदवारी देण्यात आली. निंबाळकर आणि पाटील घराण्यातील वाद उस्मानाबाद जिल्ह्याला आणि एकूण महाराष्ट्राला नवीन नाहीत. मागील लोकसभा ज्यांच्या विरोधात लढवली त्यांच्याच सोबत आता मांडीला मांडी लावून बसायला जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर या दोघांनाही कमीपणा वाटत असावा म्हणूनच या सभेच्या तयारीतून सेनेला डच्चू देण्यात आला आहे.