सांगली । कोरोनामुळे मराठमोळी महाराष्ट्राची लावणी व कलाकार अडचणीत आहेत. बदलत्या युगाप्रमाणे म्हणजे चित्रपट, नाटकाप्रमाणे लवणीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘नाद करायचा नाय’ हे अॅप तयार केले आहे. यामध्ये व्यवसायिक, पारंपारिक, स्टेजवरील लावण्या बघायला मिळणार आहे. जुन्या रसिकांसह नवी पिढी, महिलांनाही तो आवडेल, असा विश्वास प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राची लोककला लावणी आहे. मात्र कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाट्यगृह व बाहेरील खेळ बंद असल्याने लावणी संकटात सापडली आहे.
मनोरंजन विश्वाने कूस बदलली. कित्येक हाय बजेट चित्रपट आणि मालिका ओटीटीवर आल्या आणि त्यांनी यश मिळवले. आम्हीच लावणी फक्त रंगमंचावरच सादर करण्याचा हट्ट धरून बसण्यात अर्थ नाही. माझ्यासारख्या कलाकार ज्या अस्सल लावणीसाठी आग्रही आहेत, त्यांना तर हा बदल स्विकारून लावणीला पुढे न्यावे लागेल. त्यासाठीच हे पाऊल टाकले आहे. ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘नाद करायचा नाय’ला सबस्क्राईब करून लावणी रसिकांनी या प्रयत्नाला ताकद द्यावी, असे आवाहन करत मी दौरा करत आहे.
त्या म्हणाल्या, रंगमंचावर प्रत्यक्ष लावणी पाहणे आणि ओटीटीवर पाहणे यात नक्कीच फरक असेल, मात्र लावणीतील तो जीवंतपणा इथेही कायम ठेवण्याचा आम्ही कसोसीने प्रयत्न केला आहे. जगभरातील रसिक त्याचा आनंद घेऊ शकतील. यात जुन्या, काळाच्या ओघात गडप होत निघालेल्या लावण्यांना मी प्राधान्य देत आहे. यात कुठेही सिनेमागीतांचा समावेश असणार नाही. बैठकीची लावणी, छक्कड, सवाल जवाब हे कुठेतरी लुप्त होत आहेत, असे वाटते. ते नव्याने जीवंत करण्याचा आनंद मी घेणार आहे. या क्षेत्रासाठीची पाऊलवाट मी तुडवणार आहे, ती नक्कीच पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.