औरंगाबाद – मधल्या काळात राजू शेट्टी यांनीच मला विधान परिषदेच्या जागेचे महत्त्व नसल्याचे सांगितले होते, असा उपरोधिक टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना लगावला. राजू शेट्टी यांनी ‘करेक्ट कार्यक्रम करणार’ असल्याचा इशारा दिल्याच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी झाल्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी हे विधान केले. तसेच आगामी निवडणुकीत आमची स्वबळाऐवजी सामंज्यसाची भाषा राहील असेही यावेळी पाटील म्हणाले.
तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले, १२ आमदारांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची भेटही घेतली आहे. मात्र, या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळले गेल्याची चर्चा आहे. राजू शेट्टींचे नाव आम्ही वगळले नसून, या संदर्भात त्यांनी गैरसमज करुन घेण्याची आवश्यकता नसल्याचे पाटील म्हणाले. तर राजू शेट्टी यांनी ‘करेक्ट कार्यक्रम करणार’ असल्याचा इशारा दिला होता. या प्रश्नावर उत्तर देतांना जयंत पाटील यांनी राजू शेट्टींबाबत पक्षाची भूमीका स्पष्ट केली. मधल्या काळात राजू शेट्टी यांनीच मला विधान परिषदेच्या जागेचे महत्त्व नसल्याचे सांगितले होते. ही त्यांचीच भूमीका असल्याचेही पाटील म्हणाले. विधान परिषदेच्या १२ जागांसाठी राज्य सरकारने राज्यपाल महोदयांकडे यादी दिलेली आहे. लोकशाही असलेल्या देशात त्यांच्या नियुक्तीसाठी इतका उशीर लागणे योग्य नाही. राज्यपालांनी लवकर या आदमारांची नियुक्ती करण्याची भूमीका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे बाेलून दाखवली असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
तसेच औरंगाबादचे संभाजीनगर होण्याबाबत शिवसेनेने आमच्याशी कुठलीही चर्चा केली नाही, असे देखील पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आगामी मनपा निवडणूक स्वबळावर लढवणार का ? या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, निवडणुकांना पुष्कळ वेळ आहे. आताची स्थिती वेगळी आहे. मनपा निवडणूक जवळ आल्यावर सगळ्यांची भूमिका सैल पडत असते. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढेल असे संकेत पाटील यांनी दिल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.