हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला हादरवणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यात असलेले आणि मुंबई पासून अवघे ७३ KM अंतरावरील पडघा गावात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने छापेमारी केली. या छापेमारीत 400 ते 500 पोलिसांच्या पथकाने संपूर्ण गाव ताब्यात घेतला. यादरम्यान एकधक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील ‘या’ छोट्याशा गावाला इस्लामिक स्टेट घोषित करण्यात आल्याचं बोललं जातंय. या छाप्यांमध्ये आता बंदी घातलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचा माजी कार्यकर्ता साकिब नाचन यांच्या घराचाही समावेश होता, जो एकेकाळी कट्टरपंथी इस्लामी अजेंडासाठी कुप्रसिद्ध होता.
अलिकडच्या गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. एटीएसच्या २० पथकांमधील २५० हून अधिक पोलिस त्यात सहभागी होते. एटीएसने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई सुरू केली. या कारवाईचे महत्वाचे डिटेल्स उघड करण्यात आले नसले तरी दहशतवादाशी संबंधित तपासावरूनच हि कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातंय. या जे जे संशयित आहेत त्यांची कसून चौकशी होईल. या कारवाई दरम्यान, एटीएसने साकिब नाचनच्या घरावरही छापे टाकलेत. साकिब हा बंदी घालण्यात आलेल्या सिमी या संघटनेचा पदाधिकारी आहे. यापूर्वी त्याला 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये 2002- 2003 मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोटांचा समावेश आहे. या दहशतवादी घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर 2017 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सामील झाला, असा आरोप त्याच्यावर आहे.
एटीएसच्या पथकाने ६० वर्षीय फाराक झुबेर मुल्ला यांच्याही घरावर छापेमारी केली. फाराक झुबेर मुल्ला हा जमीन एजंट आहे. त्याच्यावर बंदी घातलेल्या इस्लामिक संघटनेचा (सिमी) सदस्य असल्याचा आरोप आहे. त्याचा मोठा भाऊ हसीब मुल्ला याला २००२-०३ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्यालाही १० वर्ष जेलची हवा खायला लागली होती. दरम्यान, पडघा गाव हे दहशतवाद विरोधी रडारवर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) याचा गावात आयसिसच्या संशयितांवर कारवाई केली होती. त्यावेळी पोलिसांनी अनेकांना अटक केली होती.




