Saturday, December 6, 2025
Home Blog Page 2

Mumbai Crime : भर रस्त्यात अडवलं, पॉर्न दाखवलं अन…. ; मुंबईतील घटनेनं खळबळ

Mumbai Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Crime । मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात पुरुषाने कामावरून घरी परतणाऱ्या २१ वर्षीय महिलेला भर रस्त्यात अडवलं. तिला मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ दाखवला आणि नंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.२ डिसेंबर रोजी रात्री ११:४५ वाजताच्या सुमारास हि घटना घडली. या घटनेनंतर सदर महिलेने तरुणाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. मात्र या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं? Mumbai Crime

ही घटना २ डिसेंबर रोजी रात्री ११:४५ वाजताच्या सुमारास हिंदू कॉलनी लेन क्रमांक २ येथील लखमशी नापू रोडच्या कोपऱ्यावर घडली. एफआयआरनुसार, दादर पूर्वेतील हिंदू कॉलनीची रहिवासी असलेली पीडित महिला मालाडमधील एका स्टुडिओमध्ये काम करते. घटनेच्या रात्री ती रात्री ११:४० वाजताच्या सुमारास मालाडहून लोकल ट्रेनने दादर रेल्वे स्टेशनवर आली. स्टेशनवरून घरी जात असताना, ती हिंदू कॉलनी लेन क्रमांक २ मधील लखमशी नापू रोडच्या कोपऱ्यावर पोहोचली तेव्हा, पाठीमागून एक अनोळखी माणूस तिच्याकडे आला आणि नंतर पुढे गेला. त्या माणसाने पीडितेला “दीदी”अशी हाक मारून थांबवले. ती थांबताच, तो तिच्या शेजारी उभा राहिला, त्याचा मोबाईल फोन बाहेर काढला आणि त्यावर चालू असलेला एक अश्लील व्हिडिओ त्या महिलेला दाखवला. यानंतर सदर महिला चांगलीच घाबरली. तिने तात्काळ आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. महिलेचा आरडाओरडा पाहताच आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला. पीडितेने हल्लेखोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. Mumbai Crime

घरी पोहोचल्यानंतर महिलेने तिच्या कुटुंबाला ही वेदनादायक घटना सांगितली. त्यानंतर, तिने माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. माटुंगा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्याच्या कलम 75 (1)(iii) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वापरून आरोपीचा शोध सुरू केला आहे. परंतु या घटनेमुळे मुंबईत महिला सुरक्षित आहेत का? या प्रश्न पुन्हा एकदा उभा राहतोय.

Pune Nashik High Speed Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल; रेल्वेमंत्र्यांची लोकसभेत मोठी घोषणा

Pune Nashik High Speed Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nashik High Speed Railway । मागील अनेक दिवसापासून चर्चेत असणारा पुणे – नाशिक रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या रेल्वे मार्गात आता बदल करण्यात आला आहे. महत्त्वाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडणारा हा रेल्वेमार्ग पुण्याहून अहिल्यानगर आणि शिर्डीमार्गे नाशिकला पोहोचेल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना याबाबत माहिती दिली. त्यामुळे या रेल्वेचा अहिल्यानगर आणि साईभक्तांना सुद्धा मोठा फायदा होताना दिसेल.

आधीच्या प्रस्तावानुसार, पुणे – नाशिक रेल्वे कॉरिडॉरचा (Pune Nashik High Speed Railway) प्रस्तावित मार्ग नारायणगाव मार्गे होता, मात्र याच ठिकाणी नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे* (NCRA) यांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) वेधशाळा उभारली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने म्हटल्याप्रमाणे हा मार्ग व्यवहार्य नव्हता, वेधशाळेजवळून जाणारा रेल्वे मार्ग निरीक्षणांमध्ये अडथळा निर्माण करेल असे बोललं जात होत. या गंभीर कारणांमुळेच, वेधशाळेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचा पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यात आला आहे.

कसा असेल नवीन मार्ग ? Pune Nashik High Speed Railway

महाराष्ट्र सरकार, स्थानिक प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर, रेल्वेने पर्यायी मार्ग प्रस्तावित केला आहे. ज्यामधून GMRTवेधशाळेला वगळण्यात आलं आहे. नवीन मार्ग नाशिक → साईनगर शिर्डी → पुणतांबा → निंबळक → अहिल्यानगर → पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीद्वारे).असा असेल. यातील नाशिक रोड आणि साईनगर शिर्डी दरम्यानच्या मार्गांच्या दुहेरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार आहे. साईनगर शिर्डी-पुणतांबा मार्ग (१७ किमी) दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी २४० कोटी रुपये आधीच मंजूर झाले आहेत. ८० किमी पुणतांबा-निंबळक मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आधीच पूर्ण झाले आहे. ६ किमी निंबळक-अहिल्यानगर मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आधीच प्रगतीपथावर आहे. तर चाकण औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या अहिल्यानगर आणि पुणे (१३३ किमी) दरम्यानच्या नवीन दुहेरी मार्गांसाठी ८९७० कोटी रुपयांचा डीपीआर देखील तयार करण्यात आला आहे.

काय फायदे होणार :

या नव्या रेल्वे मार्गामुळे तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. देशातील सर्वात प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या साईनगर शिर्डी आणि पेशवे राजवटीत मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक शहर पुणेशी जोडले जाईल . शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि पंढरपूर मार्गावरील धार्मिक पर्यटन वाढले.

Raj Thackeray Meet Sanjay Raut : राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला; भेटीत नेमकं काय घडलं?

Raj Thackeray Meet Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raj Thackeray Meet Sanjay Raut । मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मागील महिनाभरापासून संजय राऊत हे एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे थेट त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरेंनीही संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. राज ठाकरे जवळपास 20 वर्षांनी आमच्या घरी आले अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

राज ठाकरे- संजय राऊत यांचे जिव्हाळ्याचे संबंध Raj Thackeray Meet Sanjay Raut-

खरं तर राज ठाकरे जेव्हा बाळासाहेबांसोबत शिवसेनेत काम करत होते तेव्हा त्यांचे आणि संजय राऊत यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पुढे राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर राऊत आणि राज यांच्यात थोडंसं वितुष्ट आल. मधल्या काळात तर राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर अगदी सडकुन टीकाही केली होती. मात्र यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे मनोमिलन झालं आणि राज ठाकरे – संजय राऊत यांची मैत्री पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली. एवढेच नव्हे तर दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी संजय राऊत यांनीच मध्यस्थी केल्याच्या चर्चा आजही राजकीय वर्तुळात सुरू असतात. आता तर २० वर्षांनी राज ठाकरे संजय राऊत यांच्या घरी गेले आहेत. (Raj Thackeray Meet Sanjay Raut)

राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात अजूनही चर्चा सुरु आहे. ज्या पद्धतीचा तुमचा आजार आहे, ते पहाता आता तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. लोकांमध्ये न मिसळता आणखी दीड महिने आराम करा आणि त्यानंतर मग तुम्ही जनतेमध्ये या, असा सल्ला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. राज हे तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी राऊतांच्या घरी गेले असले तरी त्यांच्यात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्या मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युतीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही पक्ष कोणत्याही परिस्थिती एकत्रितपणे निवडणूक लढवणार हे निश्चित मानले जात असून जागावाटपावर दोन्ही बाजूंकडून चर्चा सुरु आहेत. या सर्व चर्चेत संजय राऊत यांची भूमिका अतिशय महत्वाची असणार हे नक्की, कारण संजय राऊत हेच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा धागा आहेत.

काल फडणवीस- राऊत भेट

दरम्यान, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात रात्री उशीरा भेट झाली. संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाहसोहळा मंगळवारी मुंबईत होता. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते. खरं तर संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे राजकीय शत्रू म्हणून ओळखले जातात. परंतु राऊतांच्या तब्बेतीची विचारपूस करत फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन घालून दिले.

Mumbai To Kolhapur Special Train : मुंबई ते कोल्हापूरसाठी विशेष रेल्वे; कधी धावणार? कुठे कुठे थांबणार?

Mumbai To Kolhapur Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Kolhapur Special Train। पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई–कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे, त्यानिमिताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे हजारो चाहते मुंबईच्या दिशेने कूच करत असतात. अशावेळी रेल्वेवर अधिक ताण येऊ नये तसेच प्रवाशांचा प्रवास सोप्पा व्हावा यासाठी रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा हजारो आंबेडकरी जनतेला होणार आहे.

कधी धावणार मुंबई – कोल्हापूर रेल्वे ? Mumbai To Kolhapur Special Train

कोल्हापूर–मुंबई विशेष एक्स्प्रेस (Train No. 01402) ही गाडी शुक्रवारी 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.40 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटेल आणि 6 डिसेंबर रोजी पहाटे 4.00 वाजता मुंबई सीएसएमटी टर्मिनस येथे आगमन होईल. तर मुंबई ते कोल्हापूर-विशेष गाडी (क्रमांक ०४०१) ही गाडी शनिवार, दि. ६ रोजी रात्री १०.३० वाजता मुंबई सीएसएमटी येथून सुटेल व छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे सकाळी १०.०० वाजता पोहोचेल. Mumbai To Kolhapur Special Train

कोणत्या स्थानकावर थांबणार ?

कोल्हापूर-मुंबई विशेष एक्स्प्रेसचे थांबे व वेळा
हातकणंगले – सांयंकाळी 5.00 वाजता
जयसिंगपूर – सांयंकाळी 5.20 वाजता
मिरज – सांयंकाळी 5.35 वाजता
सांगली – सांयंकाळी 5.55 वाजता
किर्लोस्करवाडी – सांयंकाळी 6.20 वाजता
कराड – सांयंकाळी 6.50 वाजता
सातारा – रात्री 8.00 वाजता
लोणंद जंक्शन – रात्री 9.00 वाजता
जेजुरी – रात्री 9.30 वाजता
पुणे – रात्री 11.20 वाजता
चिंचवड – रात्री 11.50 वाजता
लोणावळा – मध्यरात्री 12.50 वाजता
कल्याण – मध्यरात्री 2.50 वाजता
ठाणे – पहाटे 3.20 वाजता
दादर – पहाटे 3.42 वाजता
मुंबई सीएसएमटी – पहाटे 4.00 वाजता आगमन

मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या या विशेष रेल्वेमुळे महापरिनिर्वाण दिनी हजारो नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच त्यांना अगदी आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. हि ट्रेन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून धावणार असल्याने फक्त कोल्हापूरचं नव्हे तर सातारा, सांगली आणि पुण्याच्या प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. प्रवाशांनी सुटण्यापूर्वी वेळापत्रक तपासून योग्य नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

Railway Ticket Booking : तात्काळ तिकिटाचे नियम बदलले; रेल्वे विभागाचा मोठा निर्णय

Railway Ticket Booking

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन Railway Ticket Booking । जर तुम्हीही रेल्वे स्थानकाच्या आरक्षण काउंटरवर रांगेत उभे राहून तत्काळ तिकिटे बुक करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी अतिशय महत्वाची आहे. आता रेल्वे स्थानकाच्या आरक्षण काउंटरवरून तत्काळ तिकिटे बुक करणे पूर्वीइतके सोपे राहणार नाही, कारण रेल्वेने बुकिंग प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ओटीपी आधारित एक नवीन नियम लागू केला आहे. म्हणजेच काय तर आता प्रवाशाच्या मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाकल्यानंतरच काउंटरवरून तत्काळ तिकिटे उपलब्ध होतील. जर ओटीपी आला नाही तर तात्काळ तिकीट मिळणार नाही. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी हि माहिती जाणून घेणं आवश्यक आहे.

भारतीय रेल्वेने डिजिटल तिकिटिंगमध्ये आधीच अनेक नवनवीन उपक्रम राबवले आहेत. जुलै २०२५ मध्ये, ऑनलाइन तत्काळ तिकिट बुकिंगसाठी आधार-कार्ड अनिवार्य करण्यात आले. त्यानंतर, ऑक्टोबर २०२५ मध्ये, सर्व सामान्य आरक्षणांच्या पहिल्या दिवसाच्या बुकिंगसाठी ओटीपी-आधारित ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिकीट विक्रीत पारदर्शकता वाढली. रेल्वेने आता हे मॉडेल काउंटर बुकिंगपर्यंत वाढवले ​​आहे. १७ नोव्हेंबर २०२५ पासून, रेल्वेने ओटीपी-आधारित तत्काळ तिकिट काउंटर बुकिंगसाठी एक पायलट प्रकल्प सुरू केला, जो सुरुवातीला काही गाड्यांमध्ये लागू करण्यात आला होता. त्याच्या यशामुळे, ही प्रणाली आता ५२ गाड्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. Railway Ticket Booking

कशी आहे प्रक्रिया Railway Ticket Booking

नवीन प्रक्रियेअंतर्गत, आरक्षण काउंटरवर तत्काळ तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या रिक्वेझिशन फॉर्ममध्ये एक वैध मोबाइल नंबर द्यावा लागेल. एकदा बुकिंगची माहिती सिस्टममध्ये टाकली की, प्रवाशाच्या नंबरवर त्वरित एक ओटीपी पाठवला जाईल.प्रवाशाने हा ओटीपी वाचल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतरच काउंटर तिकीट दिले जाईल. जर ओटीपी योग्यरित्या टाकला नसेल, किंवा दिलेला नंबर चुकीचा किंवा बंद असेल तर- बुकिंग पूर्ण होणार नाही. रेल्वेचा असा दावा आहे की हे अपग्रेड तात्काळ तिकिटाची विनंती करणारी व्यक्ती तीच व्यक्ती आहे जी शेवटी ती प्राप्त करते याची खात्री करण्यासाठी डिझाइन केले आहे, त्यामुळे प्रॉक्सी ओळखींद्वारे मोठ्या प्रमाणात ब्लॉकिंग किंवा गैरवापर रोखला जाईल.

Rupees Depreciation Against Doller : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतोय? हि आहेत यामागची कारणे

Rupees Depreciation Against Doller

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rupees Depreciation Against Doller । बुधवारी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ९० च्या पुढे गेला. सुरुवातीच्या व्यवहारात तो ९०.१४ वर घसरला. मंगळवारी तो ८९.९४७५ वर घसरला होता आणि पहिल्यांदाच ९० च्या पुढे गेला. खरं तर मागील अनेक वर्षांपासून भारतीय रुपया डॉलर्सच्या तुलनेत सातत्याने घसरताना दिसतोय. एकीकडे परदेशी बाजारात डॉलरची ताकद वाढत आहे तर दुसरीकडे परदेशी भांडवल बाहेर जाण्यामुळे रुपया कमकुवत होताना दिसत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की कंपन्या, आयातदार आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून डॉलरची जोरदार मागणी रुपयावर दबाव आणत आहे.

रुपया का घसरतोय ? Rupees Depreciation Against Doller

आज, रुपया डॉलरच्या तुलनेत १० पैशांनी कमी उघडला. मागील सत्रात तो प्रति डॉलर ८९.८७ वर बंद झाला आणि आज ८९.९७ वर उघडला. त्यानंतर तो ९०.१४ वर घसरला. महत्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया ९० च्या पुढे गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराबाबत थांबलेल्या वाटाघाटींमुळे परदेशी गुंतवणूकदार भारतातून सतत माघार घेत आहेत. त्याचा फटका भारतीय रुपयाला बसताना दिसतोय. भारतीय शेअर बाजारातून २०२५ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली जात आहे. या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी १.४८ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. तर डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसांत, त्यांनी ४,३३५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत, ज्यामुळे रुपयावर दबाव आला आहे. Rupees Depreciation Against Doller

अमेरिकेतील उच्च कर आणि सोन्याच्या आयातीत तीव्र वाढ यामुळे ऑक्टोबरमध्ये भारताची व्यापारी तूट विक्रमी उच्चांकावर पोहोचली. शिवाय, देशांतर्गत कंपन्यांच्या परदेशी कर्जातून आणि बँकांमधील अनिवासी भारतीय (एनआरआय) ठेवींमधून डॉलरचा सप्लायदेखील मंदावला आहे.

रुपयातील घसरण ही भारतीय बाजारपेठेतील एक मोठी चिंता बनली आहे. रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढून घेत आहेत आणि ते पैसे काढत असताना, रुपया आणखी कमकुवत होत आहे. रुपयांच्या घसरणीमुळे अर्थव्यवस्थेवर आणि बजेट गणनेवर दबाव येऊ शकतो. या वर्षी आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया ५% नं घसरला आहे, जो आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक बनला आहे

Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : फडणवीस- राऊतांची रात्री उशीर भेट!! राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Devendra Fadnavis Meet Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Devendra Fadnavis Meet Sanjay Raut । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते खासदार संजय राऊत यांच्यात रात्री उशीरा भेट दिली. हि कार्यक्रमात हि भेट झाल्याचे बोललं जात आहे. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी आवर्जून संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली. संजय राऊत हे मागील काही दिवसापासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत, त्याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी राऊतांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची हीच तर खास बाब म्हणावी लागेल.

राऊत आणि फडणवीस हे एकमेकांचे राजकीय शत्रू – Devendra Fadnavis Meet Sanjay Raut

संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाहसोहळा मंगळवारी मुंबईत होता. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित आहे. यावेळी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांशी चर्चा केल्याचे समजते. खरं तर संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे राजकीय शत्रू म्हणून ओळखले जातात.संजय राऊत हे सातत्याने महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावर टीका करतात, आक्रमकपणे ते ठाकरे गटाची बाजू मांडतात. तर दुसरीकडे कोण संजय राऊत? असं म्हणत फडणवीस हे नेहमीच राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्याचे टाळतात. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही नेत्याची जुगलबंदी नेहमीच बघायला मिळते. आता मात्र राऊत आजारी असताना फडणवीसांनी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. Devendra Fadnavis Meet Sanjay Raut

दरम्यान, नुकतंच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी आपली फोनवरून सुद्धा यापूर्वी विचारपूस केल्याचे सांगितलं होते. देवेंद्र फडणवीस हे आमचे कधी काळी जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जपतो. आम्ही एकत्र काम केले आहे. आजारपणात त्यांनी स्वत: फोन करुन चौकशी केली. त्यासोबतच सर्व प्रकारची मदतही केली. राजकारण वेगळं आहे. व्यक्तिगत नाती वेगळी आहेत. केदार सरकार मधील जवळपास सर्वच मंत्र्यांनी फोन करत माझी चौकशी केली. राजकारणात किती शत्रू असले तरी ते व्यक्तिगत स्तरावर शत्रूत्व येता कामा नये. पंतप्रधान मोदी यांनीही माझी चौकशी केली. राज ठाकरे, उद्धव ठाकरेही सतत चौकशी करत असतात, असे संजय राऊत म्हणाले होते.

Gold Price Today : सोने- चांदीच्या किमतीत मोठा बदल; ग्राहकांच्या खिशावर काय परिणाम होणार ?

Gold Price Today 3 dec

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज सोने चांदीच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात वाढ आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठल्याने बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स) वर सोन्याच्या किमती वाढल्या. आज ३ डिसेंबर २०२५ रोजी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 127995 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.52 टक्के म्हणजेच 661 रुपयांची वाढ पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे चांदीच्या किमती सुद्धा 982 रुपयांनी महाग झाली असून एक किलो चांदीचा भाव सध्या 177568 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात.

खरं तर MCX वर आज सोन्याचा व्यवहार 128120 रुपयांवर उघडला (Gold Price Today) जो मागील बाजारात 127334 रुपयांवर बंद झाला होता. मार्केट उघडल्या पासूनच सोन्याच्या किमती वर खाली होत होत्या. ९ वाजून २० मिनिटांनी सोन्याचा भाव १२८०११ रुपये होता. त्यानंतर या किमतीत थोडी वाढ झाली.. परंतु सध्या सोन्याचा भाव पुन्हा थोडा खाली जाताना दिसत आहे. सध्या १२ वाजता २४ कॅरेट १० ग्राम सोने १२७९५५ रुपयांवर व्यवहार करत आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 119700 रुपये
मुंबई – 119700 रुपये
नागपूर – 119700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 130580 रूपये
मुंबई – 130580 रूपये
नागपूर – 130580 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.

PMO Office Name Changed : पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले; मोदींचा सर्वात मोठा निर्णय

PMO Office Name Changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PMO Office Name Changed राष्ट्रीय स्तरावरून एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) नाव बदलून ‘सेवा तीर्थ’ असे करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) लवकरच साउथ ब्लॉकमधील जुन्या कार्यालयातून नवीन ‘सेवा तीर्थ’ संकुलात स्थलांतरित होणार आहे. म्हणजेच काय तर ते सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग असेल. खरं तर खूप वर्षानंतर अशाप्रकारचा बदल होत आहे.

नामांतराचा हा धडाका कायम : PMO Office Name Changed

नवीन पीएमओ “सेवा तीर्थ-१” पासून चालेल, जे एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह-१ मध्ये बांधलेल्या तीन नवीन आधुनिक इमारतींपैकी एक आहे. त्याच संकुलातील “सेवा तीर्थ-२” आणि “सेवा तीर्थ-३” इमारतींमध्ये कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) यांचे कार्यालय असेल. हे नवीन ‘सेवा तीर्थ’ संकुल अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. येथील सर्व काही उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. यामुळे सरकारी काम अधिक जलद होईल. खरं तर अलिकडच्या काळात देशभरातील अनेक सरकारी इमारती आणि रस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रशासनाबद्दलच्या विचारसरणीत मोठा बदल दिसून येतोय. सरकार प्रशासकीय रचनेला सत्तेपेक्षा सेवा आणि अधिकारापेक्षा जबाबदारी प्रतिबिंबित करणारी ओळख देऊ इच्छित आहे.

या संदर्भात, राजभवनांचे आता ‘लोकभवन’ असे नामकरण केले जात आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे पूर्वी ‘लोक कल्याण मार्ग’ असे नाव देण्यात आले होते. दिल्लीतील राजपथ आता ‘कर्तव्य पथ’ म्हणून ओळखले जात आहे. नामांतराचा हा धडाका कायम असून आता तर थेट पंतप्रधान कार्यालयाचे नावच बदलण्यात आलं आहे. (PMO Office Name Changed) केंद्रीय सचिवालयाला “कर्तव्य भवन” असे एक नवीन नाव देण्यात आले आहे. सरकारचे म्हणणे आहे की, पंतप्रधान कार्यालयाचे साउथ ब्लॉकहून ‘सेवा तीर्थ’ येथे स्थलांतर हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. हे बदल केवळ नावापुरते मर्यादित नाहीत, सरकार सत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी अस्तित्वात आहे हा संदेश देण्यासाठी आहेत.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हत्येचा कट? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Dhananjay Munde । महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेत असणारे नाव म्हणजे धनंजय मुंडे. खास करून मागील काही वर्षात तापलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्याबद्दल महाराष्ट्रात नकारात्मक वातावरण निर्माण केलं केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेचाच हात नाही ना? अशाही चर्चा सुरु झाल्या होत्या. आता ते प्रकरण कुठं तरी निवळत असताना खुद्द धनंजय मुंडे यांच्याच हत्येचा प्लॅन करण्यात आला होता अशी खळबळजनक माहिती गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एका जाहीर सभेत दिली आहे. गुट्टे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले रत्नाकर गुट्टे ? Dhananjay Munde

गंगाखेडमधील भाषणात बोलताना आमदार गुट्टे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना म्हंटले की, ‘धनूभाऊ, (Dhananjay Munde) तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं, तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे. पण मी हे सगळेच आता काढणार नाही. तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे. तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी किती ताकद लावली, हे देखील मला माहित आहे.

कोण होते भय्यूजी महाराज ?

प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी आत्महत्या केली होती. पत्नीच्या निधनानंतर एकाकीपणा जाणवत असल्याने आणि दुसऱ्या लग्नावरुन मुलीची नाराजी असल्यामुळे भय्यू महाराजा तणावाखाली असल्याचं बोललं जात होतं. १२ जून २०१८ रोजी ते त्यांच्या ‘सिल्व्हर स्प्रिंग्ज’ निवासस्थानी होते. याच दिवशी त्यांची मुलगी कुहू पुण्याहून इंदूरला येणार होती. तिची खोली अस्ताव्यस्त असल्याचे पाहून भय्यूजी महाराज आपल्या नोकरांना ओरडले आणि खोली नीट आवरायला सांगितली. यावेळी त्यांची पत्नीही घरी नव्हती. काही वेळाने महाराजांनी आपल्या मुलीच्या खोलीतच स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. भय्यूजी महाराज यांनी सुरुवातीला मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावले. त्यानंतर त्यांनी अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला.भय्यूजींनी महाराष्ट्रात अण्णा महाराज यांचे शिष्यत्व स्वीकारले. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याने ते लवकरच प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘राष्ट्रीय संत’ म्हणून घोषित केले होते. मात्र सगळं काही व्यवस्थित वाटत असतानाच त्यांनी स्वतःवर गोळी मारून जीव संपवला. आज रत्नाकर गुट्टे यांच्या दाव्यानंतर भय्यूजी महाराज यांच्या आठवणी ताज्या झाल्या.