Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2957

जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधायचाय ? ‘या’ क्रमांकावर करा व्हिडिओ कॉल !

Sunil chavhan

औरंगाबाद – जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त अनेक अभ्यागतांचा राबता असतो. अनेकजण आपली तक्रार घेऊन जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो. परंतु सध्या जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याने अभ्यागतांच्या भेटीवर निर्बंध् आले आहेत. परंतु सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत 91566 95872 हा मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे.

या मोबाईल क्रमांकावर अभ्यागत दुपारी 3 ते 4 यावेळेत व्हिडिओ कॉल मार्फत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

‘या’ कारणामुळे फेसबुक लाईव्ह करत एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कुटुंबाला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले आहे. या कुटुंबाने आत्महत्येपूर्वी फेसबुक लाईव्हसुद्धा केले होते. त्याद्वारे त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. 8 जानेवारी या तिघांनी एका जंगलात जात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या कुटुंबाने आत्महत्या करताना फेसबुक लाईव्ह सुरुच ठेवले होते.

मृत व्यक्तींची नावे अशोक नस्कर, त्यांची पत्नी रिता नस्कर आणि मुलगा अभिषेक नस्कर अशी आहेत. अशोक आणि रिता यांची मुलगी पूनम एका संस्थेशी जोडलेली आहे. तिच्यावर संस्थेचे 14 लाख रुपये हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. 8 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास पूनम ज्या संस्थेत काम करत होती त्या संस्थेच्या काही महिला नस्कर कुटुंबाच्या घरी पोहचल्या. या महिलांनी यावेळी पूनम आणि तिच्या घरच्यांना अपमानित केले.

यानंतर स्वनिर्भर गोष्ठीच्या संस्थेतील महिलांनी सुरुवातीला पूनमला घरातून बाहेर काढलं आणि तिला आपल्यासोबत घेऊन गेले. त्यानंतर घरातील इतर सदस्यांनाही घराबाहेर काढत घराला कुलूप लावलं अशी माहिती तिकडच्या स्थानिक लोकांकडून देण्यात आली आहे. तसेच पूनम आणि तिच्या पतीला रस्सी बांधून संपूर्ण गावात फिरवण्यात आले आणि त्यांना एका झाडाला बांधून बेदम मारहाणसुद्धा केली. हा अपमान सहन न झाल्याने अशोक, रिता आणि अभिषेक या तिघांनी एका जंगलात जाऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वनिर्भर संस्थेच्या 5 महिलांना ताब्यात घेतले असून आणखी काही जणांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचा आलेख वाढताच ! आज कोरोनाने गाठला 350 चा टप्पा

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज तब्बल साडेतीनशेच्या जवळ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 349 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 285 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 64 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 448 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार 532 झाली आहे. आतापर्यंत एकूण 3658 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 64 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 58 तर ग्रामीणमधील 6 रुग्णांना सुटी देण्यात आली.

धक्कादायक ! ताडीच्या अतिसेवनामुळे डोंबिवलीत दोघा मित्रांचा मृत्यू

डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – डोंबिवलीमधील कोपर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ताडीच्या अतिसेवनामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके अशी मृत्यू पावलेल्या दोन मुलांची नावे आहेत. यांच्यापैकी स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता, मात्र दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुट्टीवर होता.या प्रकरणी पोलिसांनी ताडी विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके हे दोघे काल सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख, स्वप्नील चोळके घरी परतत असताना रस्त्यात त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

यानंतर विष्णुनगर पोलिस ठाण्यात विक्रेता रवी भटने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर मृत सचिनच्या कुटुंबीयांनी संबंधित ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.हि ताडी पिऊन अजून दोघांची तब्येत सुद्धा खालावली होती, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

धक्कादायक ! रुग्णालयाच्या दारातच डॉक्टरावर गोळीबार

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सज्ज झाली आहे. आरोग्य सेवक लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. असे असताना परभणीमध्ये मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका डॉक्टरवर गोळीबार करण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

यवतमाळमधील उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाच्या परिसरात हि घटना घडली आहे. ज्यांच्यावर हा हल्ला झाला त्या डॉक्टरांचे नाव हनुमंत धर्मकारे असे आहे. या गोळीबारात हनुमंत धर्मकारे मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. हनुमंत धर्मकारे हे दुपारी रुग्णालयातून घरी जात असताना अचानक रुग्णालयाच्या परिसरात त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला.

रुग्णालयाच्या समोरच डॉक्टर धर्मकारे यांच्यावर गोळीबार झाल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पकडण्यासाठी संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

औरंगाबादकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार ! केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी ट्विट करत दिली ‘ही’ माहिती

Karad

औरंगाबाद – औरंगाबाद स्मार्ट सिटीने शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (कंप्रेहेंसिव मोबीलिटी प्लॅन) तयार करण्यासाठी आणि शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत मेट्रो रेल्वे आणि फ्लायओव्हरसाठी एकत्रित डीपीआर तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) ला नेमले आहे. केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मंगळवारी औरंगाबाद स्मार्ट सिटी, महामेट्रो आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहर आणि शेंद्रा ते वाळूज फ्लायओव्हर आणि मेट्रो रेल्वेसाठी एकत्रित डी पी आर देखील तयार करण्याची सूचना दिली, अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी ट्विट करत दिली.

हा आराखडा तयार झाल्यानंतर प्रकल्पाच्या निधीबाबत चर्चा करण्यासाठी डॉ. कराड हे केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या भेटी घेणार आहेत. यांच्यासह औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय परिवहन मंत्र्यांना जालना रोडवरील फ्लायओव्हरसाठी पत्र लिहिले होते. त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे. आज मेट्रो रेल्वेबाबत महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना सादरीकरण दिले. महा मेट्रो ही भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारची संयुक्त मालकीची कंपनी आहे जी नागपूर, पुणे आणि नाशिक येथे मेट्रो रेल्वे प्रकल्प राबवत आहे. या सादरीकरणामध्ये विविध शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांबद्दल, मेट्रो रेल्वेच्या विविध मॉडेल्सबद्दल, निधीची आवश्यकता आणि निधी मॉडेल्सबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली होती.

औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ पाण्डेय म्हणाले की, औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत मेट्रो रेल्वे आणि फ्लायओव्हरसाठी सीएमपी आणि एकत्रित डीपीआर तयार करण्यासाठी महा मेट्रोला कार्यादेश जारी करण्यात येतील. “सीएमपी आणि डीपीआर तयार करण्यासाठी 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागेल, जो या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट टप्पे निश्चित करेल. निधीचे पर्याय केंद्र आणि राज्य सरकारमधील विविध मंत्रालयांना प्रस्तावित केले जातील, जे पुढील मार्ग ठरवतील,” असेही आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त व प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, शहर अभियंता सखाराम पानझडे, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे, औरंगाबाद स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, डेप्युटी सीईओ पुष्कल शिवम, सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी, महा मेट्रोचे वरिष्ठ अतिरिक्त महाव्यवस्थापक विकास नागुलकर आणि सहाय्यक व्यवस्थापक साकेत केळकर या सादरीकरणावेळी उपस्थित होते. डॉ कराड यांनी बी.डी.थेंग अधीक्षक अभियंता (एनएचएआय) आणि महा मेट्रो प्रकल्प (संचालक) महेश कुमार अग्रवाल यांच्याशी फोनवर चर्चा केली.

आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; राग अनावर झाल्याने 16 वर्षीय मुलाने थेट…

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या आईच्या प्रियकरावर कोयत्याने सपासप वार करत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला एवढा भयानक होता कि प्रियकर तरुण घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी मुलावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून घटनेच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

विवेक अर्जुन कोठुळे असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. तो बीड तालुक्यातील वरवटी येथील रहिवासी आहे. विवेक हा बीडमध्ये मजुरीकाम करतो. घटनेच्या दिवशी विवेक आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी प्रेयसीचा 16 वर्षीय मुलगासुद्धा त्यावेळी घरी होता. यावेळी आईच्या प्रियकराला पाहून आरोपी मुलाला राग अनावर झाला आणि त्याचे आईच्या प्रियकरासोबत कडाक्याचे भांडण झाले.

याच भांडणाच्या रागातून आरोपी मुलाने आईच्या प्रियकरावर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयावह होता की, विवेक घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्धावस्थेत पडला. यानंतर जखमी विवेकला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट

rain

औरंगाबाद – मराजवाड्यातील काही भागात गारपीट व अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. आज लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घरणी, आष्टा शिवारात पहाटे साडेचार वाजता अचानकपणे जोरदार वारे वाहू लागले. यावेळी सुमारे अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला तर काही वेळातच गारा ही पडल्या. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील अनेक शेतकऱ्यांची उभी ज्वारी भुईसपाट झाली असून, गारपीटीमुळे गहू, हरभरा या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ आणि परिसरात सोमवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला आहे. मंगळवारी पहाटे येथे पंधरा मिनिटे पावसाची भुरभुरी होती. मात्र या परिसरातील घरणी, घारोळा, मोहनाळ, लातूर रोड, कडमुळी, मोहदळ, अंबुलगा, आष्टा, आष्टामोड येथे जोरदार वाऱ्यासह सुमारे अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी पाच ते दहा मिनिटे जबरदस्त गारपीट झाल्याने घरणी शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील शेतात उभी असलेली ज्वारी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे.

दरम्यान, जोरदार वारे आणि अवकाळी पावसासोबतच गारपीट झाल्यामुळे घरणी, लातूर रोड आणि आष्टामोड शिवारात काढणीला आलेली तुर तसेच गहू, हरभरा, करडई, सुर्यफूल आणि टोमॅटोसह इतर भाजीपाल्यांचेही नुकसान झाल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. या गारपीटग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अंगणात कोंबड्या आल्यावरुन झालेल्या वादातून बारामतीत महिलेची निर्घृण हत्या

बारामती : हॅलो महाराष्ट्र – बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका किरकोळ कारणातून झालेल्या वादात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. अंगणात कोंबड्या आल्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात एका महिलेची डोक्यात कुऱ्हाडीने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हि धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कऱ्हावागज या ठिकाणी घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
गंगूबाई तात्याराम मोरे असे मृत महिलेचे नाव आहे. मयत महिला आणि आरोपीचे घर समोरासमोर आहे. दोन्ही कुटुंबामध्ये अंगणात कोंबड्या येण्यावरुन आणि पाच फूटांच्या जागेवरुन वारंवार वाद होत होता. घटनेच्या दिवशीसुद्धा या दोघांमध्ये यावरुन मोठा वाद झाला. आरोपीची बायको आणि मृत गंगुबाई यांच्या मोठा वाद झाला.

यानंतर आरोपी किरणने रागाच्या भरात गंगूबाईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात त्या मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याअगोदरचा त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी किरण मोरे आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

कोरोना रोखण्यासाठी मनपाचा 15 कलमी कार्यक्रम

औरंगाबाद – कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्जझाले असून, पंधरा कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. जास्तीत जास्त रुग्ण गृह विलगीकरणात राहणार आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असेल, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

कोरोना उपाययोजनांबाबत पांडेय म्हणाले, की ज्या हेल्थ केअर वर्करने लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना तो डोस प्राधान्याने देणे व ज्यांनी दोन्हीही डोस घेतले आहेत त्यांना तिसरा डोस देणे, याला प्राधान्य आहे. आभासी पद्धतीने कोरोनाबाधितांना वैद्यकीय सल्ला दिला जाईल. त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. त्यासाठी स्वतंत्र ऑपरेशन कमांड सेंटर दोन-तीन दिवसात सुरू होईल. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घाटी रुग्णालयात प्रशिक्षण दिले जाईल. दवाखाने, कोविड केअर सेंटर्समधील ऑक्सिजनची यंत्रणा सज्ज ठेवली जाईल. महापालिकेकडे अकरा रुग्णवाहिका आहेत, त्या सज्ज ठेवल्या जातील. कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर या ठिकाणी आवश्यक ती साधनसामुग्री अद्ययावत स्वरूपात तयार करून ठेवणे, पहिल्या व दुसऱ्या लाटेत ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी महापालिकेसोबत काम केले आहे, त्यांनाच पुन्हा संपर्क साधून गरजेनुसार त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरी पाच दिवसातून एकदा जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतील, रुग्णवाहिकांच्या सेवेसाठी समन्वयक नेमला जाईल. जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण करून घेण्याकडे लक्ष दिले जाईल. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ओमीक्रॉनचा संसर्ग होऊ न देणे हे सर्वात मोठे आव्हान असेल, असेही आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्ण, कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी शहर बसचा वापर करण्यात आला होता. यावेळी देखील गरज पडल्यास या बसचा उपयोग केला जाईल. ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी कंट्रोलरुम मधून मानसशास्त्राच्या अभ्यासकांच्या माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे. खासगी दवाखान्यांनी देखील त्यांच्याशी संपर्कात असलेल्या रुग्णांना आभासी पद्धतीने मार्गदर्शन करावे, वैद्यकीय सल्ला द्यावा. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, असे आवाहन पांडेय यांनी केले.