Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5709

जेव्हा एक भाजप आमदार सरकार सोडून सोनू सूदला मदतीसाठी हाक मारतो..

नवी दिल्ली । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी भाजपच्या एका आमदार महाशयांनी अभिनेता सोनू सूद याच्याकडे मदतीची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था सोनू करत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील भाजपचे आमदार राजेंद्र शुक्ला यांनी श्रमिकांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी सोनू सूद याच्याकडे मदत मागितल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

विरोधकांनी शुक्ला यांना चांगलाच फैलावर घेतलं असून मध्य प्रदेश आणि केंद्रात भाजपाची सत्ता असताना भाजप आमदाराला एका अभिनेत्याकडे मदतीसाठी जावे लागणं ही एक लाजिरवाणी बाब असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे.भाजप आमदार राजेंद्र शुक्ला यांनी मुंबईत अडकून पडलेल्या मध्य प्रदेशच्या रीवा आणि सतना जिल्ह्यातील रहिवाशांची एक यादी बनवून ट्विट केली. या ट्विटमध्ये त्यांनी सोनू सूदकडे मदत मागताना ‘मध्यप्रदेशातील रीवा आणि सतना रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत अडकलेले आहेत आणि अजूनही आपल्या घरी पपरतू शकलेले नाहीत. कृपया यांना पोहचवण्यासाठी आमची मदत करा’ असं म्हटलं होतं.

काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी आमदार महाशयांवर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. राजेंद्र शुक्ला यांच्या या ट्विटवर अलका लांबा यांनी ‘देशात आणि राज्यात यांच्याच पक्षाचं सरकार असूनही हे सोनू सूदकडे मदतीची मागणी करत आहेत’ असं म्हणत टीका केली आहे. इतकंच नाही तर राजीनामा देऊन टाकण्याचा सल्लाही अलका लांबा यांनी आमदार महाशयांना देऊन टाकला.

शुक्ला  यांच्या ट्विटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत अलका लांबा यांनी लिहिलंय ‘डोळ्यांवर विश्वास बसत नाही. जे स्वत: आमदार आहेत आणि माजी मंत्रीही राहिलेत, मध्य प्रदेशात आणि देशात यांचंच सरकार आहे, मुख्यमंत्री / पंतप्रधान यांच्याच पक्षाचे आहेत, महाराष्ट्रातही यांचे खासदार आणि आमदार आहेत. तरीदेखील हे मदत सोनू सूदकडे मागत आहेत. थोडी लाज उरली असेल तर राजीनामा देऊन घरी बसा, चांगलं होईल’. दरम्यान, शुक्ला यांच्या मदतीच्या मागणीवर सोनूनंही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

घटनेतील देशाचे नाव ‘इंडिया’ बदलून ‘भारत’ करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली । इंडिया हे देशाचे नाव बदलून भारत असे ठेवण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी, संबंधित मंत्रालय त्यावर निर्णय घेईल, असे कोर्टाने म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये नमूद असलेले देशाचे ‘इंडिया’ हे नाव बदलून फक्त ‘भारत’ इतकेच ठेवण्याबाबत या याचिकेत याचिकाकर्त्यांनं म्हटलं होत. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून याचिकाकर्त्यांला दणका दिला आहे.

भारतीय राज्यघटनेत बदल करून आणि इंडिया हा शब्द काढून टाकून त्याजागी हिंदुस्तान किंवा भारत असे करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. राज्यघटनेत भारत हा शब्द जोडणे आपल्या राष्ट्रीयतेसाठी आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते. इंडिया हे नाव राज्यघटनेच्या कलम १ अंतर्गतच येते. त्यात इंडिया नावाऐवजी भारत किंवा हिंदुस्थान असे नमूद करण्यात यावे असे याचिकेत म्हटले आहे.

राज्यघटनेत कलम १ मध्ये इंडिया या शब्दाचा उल्लेख असून ब्रिटीशांचे शासन संपुष्टात आल्यानंतर इंडिया हे इंग्रजी नाव बदलून भारत असे ठेवले पाहिजे, असे याचिकेत म्हटले आहे. भारताची ओळख निश्चित करण्यासाठी कलम १ मध्ये बदल केला पाहिजे. त्यासाठी इंडिया हे नाव बदलून भारत असे नाव नोंदवले जावे, अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

काही दिवसातच मल्ल्या जाणार गजाआड, भारतात आणण्यासाठीची कायदेशीर कारवाई झाली पूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर एअरलाइन्सचा संस्थापक विजय मल्ल्या याचे पुढील काही दिवसांत कधीही भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते. इंग्लिश बिझिनेस इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मल्ल्याच्या प्रत्यार्पणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. माजी खासदार आणि देशातील सर्वात मोठी दारू कंपनी असलेल्या युनायटेड ब्रुव्हरीजचा मालक मल्ल्या याने किंगफिशर एअरलाइन्स सुरू केली, जी नंतर बंद पडली. त्याच्याविरूद्ध ९००० कोटी रुपयांचा फ्रॉड आणि मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण वैयक्तिक कारण सांगून मे २०१६ मध्ये तो भारतातून पळाला.

तेव्हापासून तो युकेमध्ये राहत आहे. मल्ल्याने कमीतकमी १७ भारतीय बँकांची फसवणूक केली तसेच बेकायदेशीरपणे लोन घेतले आणि संपूर्ण पैशाचा किंवा कर्जातील काही भाग हा परदेशात सुमारे ४० कंपन्यांच्या खात्यामध्ये जमा केला.

आता काय होणार
मल्ल्याच्या प्रत्यर्पणातील सर्वात मोठा अडथळा १४ मे रोजी दूर झाला जेव्हा मल्ल्या प्रत्यर्पणाच्या विरोधात सुरु असलेला खटला हरला. आता सरकारला त्याला येत्या २८ दिवसांत परत आणावे लागेल. १४ मेपासून २० दिवस आधीच गेले आहेत. अशा परिस्थितीत त्याला येत्या आठ दिवसांतच परत आणावे लागेल.

एप्रिलमध्ये यूके हायकोर्टाने आपल्या एका निर्णयात म्हटले होते की, विजय मल्ल्या याचे भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते. यानंतर,१४ मे रोजी कोर्टाने मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी देण्यास नकार दिला. ब्रिटिश कायद्याचे ज्ञान असणार्‍या लोकांच्या मते, मल्ल्याकडे प्रत्यर्पण टाळण्यासाठी दोन पद्धती आहेत, त्यातील एक आश्रय मागणे आहे. डिसेंबर २०१८ मध्येच लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने मल्ल्याला भारताला प्रत्यार्पित करण्याचे आदेश दिले होते.

मल्ल्या येत्या काही दिवसात भारतीय तुरूंगात असेल
ईडीच्या सूत्रानुसार, मल्ल्याची याचिका ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही सर्व औपचारिकता देखील पूर्ण केल्या आहेत. सीबीआय आणि ईडीची टीम त्याच्या प्रत्यार्पणासाठी काम करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित सीबीआय सूत्रांनी सांगितले की, प्रत्यर्पणानंतर आम्ही पहिले त्याला ताब्यात घेऊ, कारण आम्ही पहिल्यांदा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! चीनने तिबेटमध्ये केला रात्रीच्या अंधारात ‘युद्धाभ्यास’

मुंबई । मागील काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान सीमा वादावरून तणावाचं वातावरण आहे. या तणावपूर्ण परिस्थितीतच चीननं रात्रीच्या अंधारात तिबेट भागात युद्धाभ्यास केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळेच दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या तिबेट मिलिटरी कमांडनं सोमवारी रात्री उशिरा ४,७०० मीटर उंचीवर सैन्य पाठवून कठिण परिस्थितीतील आपल्या क्षमतांचं परिक्षण केलं. चीनी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाईम्स’नं या युद्धाभ्यासाची माहिती दिली आहे. चीन सेंट्रल टेलिव्हिजन (CCTV) नं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १ वाजता PLA च्या स्काऊट युनिटनं तांगुला या टेकडीकडे वाटचाल सुरू केली.

या मार्चदरम्यान गाड्यांच्या लाईट बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसंच भारताच्या ड्रोनपासून वाचण्यासाठी ‘नाईट व्हिजन डिव्हाइस’ची मदत घेतली गेली. रस्त्यात येणारे अडथळे पार करण्यासाठी ड्रोनच्या मदतीनं बॉम्बस्फोट करण्यात आले. टार्गेटच्या जवळ पोहचल्यानंतर कॉम्बॅट टेस्टही करण्यात आली. यासाठी स्नायपर युनिट पुढे पाठवण्यात आलं होतं. फायर स्ट्राईक टीमनं एक हलक्या हत्यारांची गाडी अँटी टँक रॉकेटनं उडवून दिली.

यानंतर कमांडर्सनं गाडीवर लावण्यात आलेल्या इन्फ्रारेड सैन्य परिक्षण सिस्टमच्या मदतीनं सेनेच्या तुकडीला पुढच्या लढाईसाठी टार्गेटपर्यंत पोहचवण्यात मदत केी. या युद्धाभ्यासादरम्यान जवळपास २००० मोर्टार शेल, रायफल ग्रेनेड आणि रॉकेटसचा वापर करण्यात आला. यामुळे नव्या हत्यारं आणि उपकरणांसोबत लढाईसाठी सेनेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. भारत आणि चीनची सीमा उंचावर आहे. दोन्ही देशांच्या लष्करात तणाव निर्माण करणाऱ्या काही घटना घडल्यानंतर दोन्ही बाजुंना सैन्य तैनात करण्यात आलंय. त्यामुळेच तयारी म्हणून चीननं हे पाऊल उचलल्याचं समोर येतंय. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेनंही भारत-चीन तणावासंबंधी चिंता व्यक्त केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

प्रियांका चोप्राच्या बहिणीला जूनियर NTR च्या फॅन्सकडून रेपची धमकी; म्हणाले तू तर पॉर्नस्टार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण असलेल्या मीरा चोप्राने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतही मोठे नाव कमावले आहे. ती बर्‍याचदा कोणत्या ना कोणत्या गोष्टींबद्दल चर्चेत असते. पण आता ज्या बातमीमुळे ती चर्चेत आली आहे ती धक्कादायक आहे. मीरा चोप्राला ट्विटरवर बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. तिने यासंदर्भात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे. मीरा चोप्राचे ट्विटरवर आपल्या चाहत्यांसोबत एक प्रश्नोत्तराचे सेशन होते. यादरम्यान एका चाहत्याने मीराला ज्युनियर एनटीआर बद्दल प्रश्न विचारला, मीराने उत्तरात सांगितले कि,’मला ज्युनिअर एनटीआर माहित नाही,ती त्याची फॅन नाही.’

यावरून जूनियर एनटीआरच्या चाहत्यांनी तिला शिव्या देण्यास सुरुवात केली, मीराला पॉर्न स्टार म्हणून हिणवले
मीरा चोप्राच्या या बोलण्यावर जूनियर एनटीआरच्या चाहत्यांचा राग आला आणि त्यांनी ट्विटरवरून तिला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. इतकेच नाही तर तिच्यावर बलात्कार करून तिला मारून टाकण्याची धमकीही दिली. यावेळी, जूनियर एनटीआरच्या चाहत्यांनी या अभिनेत्रीचे पालक कोरोना व्हायरसने मरणार असल्याचे सांगितले आणि मीराला एक पॉर्न स्टार देखील म्हटले.

 

मीराने ज्युनियर एनटीआरला टॅग केले
मीरा चोप्रानेही ज्युनियर एनटीआरला टॅग केले आणि विचारले की,’ मी महेश बाबूंची फॅन आहे तुमची नाही म्हणून तुम्ही मला शिवी घालत आहात का ? मीराने असे लिहिले आहे की,’ आशा आहे की तुम्ही माझ्या ट्विटकडे दुर्लक्ष कराल.’ मात्र, अद्यापही ज्युनियर एनटीआरकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या वादानंतर लोकांनी मीरा चोप्राला ट्विटरवर पाठिंबा दिला आहे आणि #WeSupportMeeraChopra चा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. मीरा चोप्राच्या समर्थनार्थ महेश बाबू, पवन कल्याण आणि असीम रियाज यांचे फॅन्सही बाहेर आले आहेत.

मीराने या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे
मीरा चोप्रा ही बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची चुलत बहीण आहे. मीराने बॉलिवूडमध्ये तसेच तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. मीराने ‘गँगस ऑफ घोस्ट्स’, ‘१९२० लंडन’ आणि ‘कलम ३७५’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मुंबईत वाऱ्याचा वेग वाढला, बांद्रा-वरळी सी लिंकवरील वाहतूक केली बंद

मुंबई । मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली होती.मुंबईत वाऱ्याचा वेगही वाढल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबईत समुद्रातून जाणारा वरळी-बांद्रा सी लिंकवरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच जितामाता उद्यानातील प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

बुधवारी दुपारनंतर मुंबईत मोठा पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासन आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत समुद्रातून जाणारा वरळी-वांद्रे सी लिंक वाहतूक पोलिसांनी बंद केला आहे. दुपारनंतर समुद्राच्या मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगही वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सी लिंकवरील वाहतूक पोलिसांनी थांबवली आहे.

भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातही प्राण्यांची काळजी घेण्यात आली आहे. उद्यानातील प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. विशेषतः वाघ, बिबट्या अशा प्राण्यांना खुल्या जागेतून बंदिस्त जागेत हलविण्यात आले आहे. जेणेकरून झाडं पडल्यास त्यांना इजा होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने १० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

दुपारी मुंबईत पावसाचा जोर नसला तरी वेगाने वारे वाहत आहेत. सुमारे तीन तास ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. निसर्ग चक्रीवादळाबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौपाटीवर जाऊन तयारीचा आढावा घेतला. तर आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन कक्षात जाऊन आढावा घेतला आणि त्यानंतर वरळी आणि अन्य भागातही ते पाहणीसाठी बाहेर पडले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘निसर्ग’ चक्रीवादळापासून बचावासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला ‘या’ विशेष सूचना

मुंबई । ‘निसर्ग’ चक्रीवादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले आहे. हळूहळू ते किनारपट्टीकडे सरकत आहे. ते भूपृष्ठावर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने बचावासाठी काय केले काय नाही याची यादी जाहीर केली आहे. घराबाहेर असलेल्या सैल वस्तू  बांधा किंवा घरात हलवा, महत्वाचे दस्तऐवज आणि दागदागिने प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा, बॅटरीवर चालणाऱ्या तसेच राखीव पॉवरच्या यंत्राचे नियमित परीक्षण करा, दूरदर्शन व आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष ठेवा, आपत्कालीन लाईट्स, फोन आणि पावर बँक चार्ज करा, घर कच्चे नसेल किंवा झोपडी नसेल तर घरातील एक भाग आपत्कालीन निवारा म्हणून ठरवा, आणि चक्रीवादळाच्या वेळी याचा वापर कसा करता येईल याचा सराव करा. असे या यादीत जाहीर करण्यात आले आहे.

आपत्कालीन उपयोगी वस्तूंची बॅग तयार ठेवा, खिडक्यांपासून दूर राहा, काही खिडक्या बंद करा  खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून दबाव समान राहील. खोलीत मध्यभागी जा, कोपऱ्यापासून दूर राहा, कारण बऱ्याचदा मोडतोड झालेले सामान कोपऱ्यात जमा होते. बाक किंवा जड टेबल किंवा डेस्क यासारख्या मजबूत फर्निचर यांच्या खाली जा आणि ते धरून ठेवा, डोके व मानेच्या संरक्षणासाठी हातांचा वापर करा, मोठे छप्पर असलेल्या जागा टाळा, जसे प्रेक्षागार, मोठे सभागृह आणि खरेदीची मोठी दुकाने वगैरे ठिकाणी थांबणे टाळा. पुरेसा वेळ असेल तर योग्य निवारा शोधा अथवा सर्वात जवळच्या छोट्या खड्ड्यात किंवा चरात पडून रहा. आधी ठरवून ठेवलेल्या किंवा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी स्थलांतरित व्हा. यासह इतर गोष्टींची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

त्याचबरोबर अफवा पसरवू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका, वादळ/चक्रीवादळाच्या दरम्यान गाडी किंवा ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका, नुकसान झालेल्या इमारतींपासून दूर राहा, अधिक इजेचा प्रत्यक्ष धोका असल्याशिवाय गंभीर जखमींना हलवू नका, त्यामुळे त्यांना इजा होऊ शकते. सांडलेली औषधे, तेल व इतर ज्वालाग्राही पदार्थ पसरू देऊ नका. त्यांना ताबडतोब स्वच्छ करा, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. अशा न करणाऱ्या गोष्टींची यादीही जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहण्यास सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

हुश्श! निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईवरील धोका आणखी कमी

मुंबई । दहशतीचं सावट घेऊन आलेलं निसर्ग चक्रीवादळ हे बुधवारी मुंबईत धडकण्यापूर्वीच ते ५० किलोमीटर दक्षिणेकडे सरकलं आहे. परिणामी या चक्रीवादळाचा मुंबई शहराला असणारा धोका हा आणखी कमी झाला आहे अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिली.

निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता ही सुपर सायक्लोन इतकी तीव्र नाही. मुळात हे वादळ जितक्या वेगानं तयार झालं आहे. तितक्याच वेगानं ते शमण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. मुंबईच्या भौगोलिक स्थितीमुळं आतापर्यंत एकही वादळ मुंबईला धडकलेले नाही, हे वादळही थेट मुंबईला धडकत नाही. असं ते म्हणाले.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाची दिशा ही दक्षिणेकडे सरकल्यामुंळं मुंबई शहरावरील धोका कमी झाला आहे. असं असलं तरीही प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार अलिबागपासून अवघ्या ९५ किलोमीटर अंतरावर हे वादळ पोहोचलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईपासून हे वादळ काहीसं दूर गेलं असलं तरीही पालघर, नाशिक, पुणे, उत्तर महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांमध्येही त्याचे परिणाम दिसणार आहे. वादळामुळे या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

तुम्ही ग्रामीण, निमशहरी भागात राहताय? तर मग SBI कडून लोन मिळणं सोप्प; जाणून घ्या प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मागणी निर्माण करण्यासाठी एसबीआयने कर्ज देण्यासाठी नवीन वर्टिकल तयार केले आहेत. त्याद्वारे शहरी, नीम -शहरी आणि ग्रामीण भागातील कर्ज वितरणाची गती अधिक वेगवान होईल. फाइनेंशियल इनक्लूजन आणि माइक्रो मार्केट वर्टिकल अंतर्गत कृषी आणि संबंधित कामांना आणि सूक्ष्म उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जाला प्राधान्य दिले जाईल.

एसबीआयच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण आणि नीम -शहरी भागातील अशा ८ हजार शाखा शोधून काढल्या आहेत, ज्या सूक्ष्म उद्योग, शेती आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांना कर्ज देण्यासाठी वेगवान पावले उचलतील. ग्रामीण, नीम -शहरी आणि शहरी भागात एसबीआयचे ६३ हजाराहून अधिक कस्टमर सर्विस पॉइंट आहेत. एसबीआय त्यांच्यामार्फत कृषी क्षेत्रातील सूक्ष्म उद्योग आणि उद्योगांना कर्ज देईल. एसबीआयच्या म्हणण्यानुसार यामुळे माइक्रो फाइनेंस इंडस्ट्रीलाही चालना मिळेल.

ही कर्जे अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यास मदत करतील
लॉकडाऊननंतर आर्थिक कामांना अधिक गती देण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार एसबीआयने हे पाऊल उचलले आहे. देशात लॉकडाऊन दरम्यान मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत तसेच अनेक लघु उद्योगही संकटात सापडले आहेत. छोट्या उद्योगांसाठी सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु सध्या औद्योगिक कार्यक्रमांना वेग येण्यास वेळ लागेल. दरम्यान, बँकेला देशातील मागासलेल्या भागात राहणाऱ्या गरीब आणि संसाधने नसलेल्या लोकांना स्वस्त कर्जे देऊन त्यांना आर्थिक उपक्रमांशी जोडण्याची इच्छा आहे.

अर्थव्यवस्थेच्या मजबुतीबद्दल शंका, कर्ज ग्राहक कमी करत आहेत
सध्या देशातील अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रेटिंग एजन्सींनी वाढीच्या दराबद्दल नकारात्मक अंदाज लावायला सुरुवात केली आहे. जागतिक बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार कोविड -१९मुळे देशातील ६ करोड लोक बेरोजगार होऊ शकतात. अशा परिस्थितीत सार्वजनिक बँकांना त्यांची सामाजिक जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मात्र, ग्राहकांना आत्ताच कर्ज घेण्याची जोखीम पत्करायची नाहीये, असे एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. एसबीआयकडे कर्ज देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असूनही कमी ग्राहक कर्जासाठी येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

निसर्ग चक्रीवादळ: जवळपास ४० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई । निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असून काही तासात हे वादळ रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते. दरम्यान, वादळाचा धोका लक्षात घेऊन आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४० हजार लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या दलाने या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तसेच मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तर रायगड जिल्ह्यातील एकूण १३ हजार ५४१ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला आहे. अलिबागपासून ९५ किमीवर वादळ आले आहे. ४ तासांत अलिबागमध्ये धडकणार आहे. अलिबागच्या दक्षिणेला वादळ धडकणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वादळापासून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विमानतळावरील उड्डाणे कमी करण्यात आली आहेत,को रोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत फक्त ५० उड्डाणे होत होती ती हि आता कमी करून फक्त १९ वर आणली आहेत यात ११ उड्डाणे घेतील तर ८ विमान मुंबईत येणार आहेत त्यातही बदल होऊ शकतो म्हणून प्रवाश्यानी घरातून निघण्याआधी परिस्थिती तपासूनच निघण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.

निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागमध्ये धडकणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं असलं तरीही या वादळाचा धोका हा रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई या भागातही आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जोरदार वारे वाहतात. समुद्राला काही ठिकाणी उधाण आले आहे. जिथे जास्त धोका आहे या ठिकाणच्या प्रशासनाने किनारपट्टीवरील नागरिकांचं स्थलांतरण केले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा गुजरातमध्येही परिणाम जाणवायला लागला आहे. दमण परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या या भागामध्ये खबरदारी म्हणून पोलीस सतत पेट्रोलिंगवर आहेत. तसंच प्रशासनाकडून लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन केले जात आहे. तर दुपारी १२ वाजता समुद्रात भरतीचा इशारा देण्यात आलेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”