Monday, December 22, 2025
Home Blog Page 5841

टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने उद्योग सुरू करा – नाना पटोले

भंडारा प्रतिनिधी । टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नव्या अधिसूचनेनुसार टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील लहान मोठे उद्योग तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत जिल्ह्यात धान्य पुरवठा योग्य पध्दतीने करण्यात यावा तसेच पोलीस पाटील व ग्राम पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनेबाबत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड आदी उपस्थित होते.

परराज्यातील व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील नागरिक भंडारा जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या जिल्ह्यात तसेच राज्यात पाठविण्याची सोय शासनातर्फे करण्यात येत आहे. परंतु काही जिल्ह्याच्या बाबतीत त्यांनी पाठविलेले व्यक्ती प्रवास करुन गेल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशा परिस्थितीत काळजी घेण्याची गरज असून प्रत्येक व्यक्तींची वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. कोविड-१९ चे लक्षणे नाहीत अशा आशयाचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. कोरानाच्या उच्चाटनासाठी युध्दपातळीवर काम करा, असे निर्देश श्री. पटोले यांनी दिले.

कोरोना साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन घोषित केले तसेच सर्व प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद केली. यामुळे अनेक नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. आपल्या जिल्ह्यातही इतर राज्यातील व जिल्ह्यातील कामगार, विद्यार्थी, पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा विधानसभा अध्यक्षांनी घेतला.

लाखांदूर तालुका चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यास लागून असल्यामुळे तेथील रुग्ण आरोग्य सेवेकरीता ब्रम्हपूरीला जातात. परंतु जातांना गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करावा लागतो. लॉकडाऊनमुळे तेथील रुग्णास असुविधा निर्माण होत आहे. याकडे जातीने लक्ष देवून रुग्णास असुविधा होणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या.

कोविड १९ च्या तपासणीसाठी दररोज तीन हजार व्यक्तींची तपासणी करता येईल अशा प्रकारचे रुग्णालय नागपूर येथे लवकरच होणार आहे. त्यामुळे कोरोना समुळ उच्चाटनासाठी सदर रुग्णालय अतिशय उपयुक्त ठरणार आहे. वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्याच्या बाहेर पाठवू नये. त्यासाठी आगावू मनुष्यबळाची व्यवस्था करा. त्यामुळे तपासणी करणे सुलभ होऊन यंत्रणेवर ताण येणार नाही. प्रवासात संपर्कामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाणे वाढले आहे. सोशल डिस्टंन्सिंगचे भान ठेवा. बांधकामावरील मंजूरांच्या व्यवस्थेबाबत सर्व अधिकार कार्यकारी अभियंता बांधकाम यांना सोपवा, असे ते म्हणाले. कोरोना युध्दात सहभागी योध्दयांचे विमा संरक्षण करा. आरोग्य विभागाबरोबर महसूल व इतर विभागातील योध्दांचे सुध्दा विमा उतरवा, असे त्यांनी सांगितले.

होमगार्ड मानधनाचा निधी लवकरच जिल्ह्याला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हास्तराप्रमाणे उपविभागीय स्तरावर कोविड रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले. साकोली येथे २२ व्हेंटीलेटर व तुमसर येथे ६० व्हेंटीलेटरसह कोविड रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक शहरातील मद्य विक्रीची दुकाने बंदच; आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द

नाशिक प्रतिनिधी । सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस शासनाने परिपत्रकाद्वारे 3 मे 2020 रोजी परवानगी दिली. नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली. परंतु बऱ्याच मद्य विक्री दुकानांवर सुरक्षित वावराच्या नियमांना पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना मनुष्यबळाचा वापर करावा लागला. म्हणून पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील मद्य विक्री दुकाने बंद राहतील. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकानांचे परवाना रद्द करण्यात येईल, तसेच सवलतींचा अतिवापर झाल्यास त्या बंद करणे क्रमप्राप्त ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे..

याबाबत आज जारी करण्यात आलेल्या आदेशात श्री. मांढरे म्हणतात, शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत सोमवारी नाशिक शहरातील सर्व मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली. मात्र बहुतांशी दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन हाणामारीदेखील झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिस विभागाला मनुष्यबळाचा वापर करावा लागला. तसेच सदर दुकानांवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर, चेहऱ्यावर मास्क घातले जात नसल्याची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. ही दुकाने सुरू ठेवल्यास मोठ्या प्रमाणावर विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाशिक शहर विभागातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद राहणार असल्याचे श्री. मांढरे यांनी कळविले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील. तसेच आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास परवाना तात्काळ रद्द करण्यात येणार असल्याचेही श्री. मांढरे यांनी कळविले आहे.

दिलासादायक! पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे  प्रतिनिधी । पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 681 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 2 हजार 364 बाधित रुग्ण असून 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 2 हजार 103 बाधित रुग्ण असून 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 78 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 135 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 34 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 14 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 103 झाली आहे. 499 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 489 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 83 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

आजपर्यत विभागात 23 हजार 942 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 22 हजार 823 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 119 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 20 हजार 393 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 71 लाख 40 हजार 436 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 79 लाख 65 हजार 967 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 618 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय हॉटस्पॉट कोणते? जाणून घ्या

पुणे प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/ कंन्टेटमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. तसेच कोरोना प्रभावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 7 तालुके प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निर्गमित केले आहेत.

पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील काही भाग हॉटस्पॉट/ कंन्टेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.
बारामती तालुका – माळेगाव बुद्रक व लकडेनगर.
इंदापूर तालुका- भिगवण, तक्रारवाडी व डिक्सळ.
हवेली तालुका – मौजे जांभुळवाडी, मौजे वाघोली, आव्हाळवाडी, भावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी व कोळेवाडी या गावाचा रहिवास परिसर, मौजे किरकटवाडी (कोल्हेवाडी), मौजे नऱ्हे, खानापूर, लोणीकंद, उरळी कांचन, पिसोळी, वडाची वाडी, हांडेवाडी या गावाचा रहिवास परिसर, सिध्दीविनायक नगरी, दत्तनगर, परमार कॉम्प्लेक्स, निगडी (पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्र), मांजरी बुद्रुक, कदमवस्ती, लोणी काळभोर, कोंढवे धावडे.
शिरुर तालुका- शिक्रापूर.
वेल्हा तालुका- मौजे निगडे मोसे, मौजे ओसाडे, वेल्हे बुद्रुक, कोंढवाळे बुद्रुक व कोंढवाळे खुर्द, खोडद, ढाणे, वाघदरा, ब्राम्हणघर, हिरपोडी.
भोर तालुका – मौजे नसरापूर, कामथडी, खडकी, उंबरे, केळवडे, नायगाव, मालेगाव, देगाव, दिडघर, सांगवी बुद्रुक, निधान, विरवाडी, व केतकवळे.
दौंड तालुका – मौजे दहिटणे, मिरवाडी, नांदूर, खामगाव, गणेशनगर, देवकर मळा, बैलखिळा, व डुबेवाडी, दौंड शहर व बिगर नगरपालिका क्षेत्र, मौजे गोपाळवाडी, माळवाडी, मसनरवाडी, लिंगाळी, पवार वस्ती, दळवीमळा (सोनवडी), भवानीनगर व भोंगळेमळा (गिरीम).
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कोरोना बाधित 3 कि.मी. परिसर
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मोदीखाना कॅम्प 3 कि.मी. परीसर, ताडिवाला रोड, गल्ली नंबर 2, 32, 234 घोरपडी गाव, लक्ष्मीनगर व यशवंतनगर येरवडा.
देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड – देहू गाव व देहू रोड कॅन्टोन्मेंट या गावाचा रहिवासी परिसर

धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन १००% ग्रीन झोन!

बीड प्रतिनिधी । बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गी लावला. तसेच त्यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या ५% निधीतून व्यवस्था करण्यात येईल असेही श्री. मुंडे म्हणाले.

यावेळी जिल्ह्यात कमी पडणारे सोयाबीन चे बियाणे, लग्न लावण्यासाठी परवानगी, यांसह तूर व हरभरा खरेदीसाठी सध्या कमी असलेल्या ग्रेडरच्या उपलब्धीसंदर्भातही चर्चा झाली. श्री. मुंडे यांनी एफसीआयच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करून तूर व हरभरा खरेदीसाठी अधिकचे ४ ग्रेडर उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊन – तीन च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला, यावेळी जिल्ह्याला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊन चे नियम आणखी कडक करावे लागले तरी हरकत नाही असेही श्री. मुंडे म्हणाले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले, जिल्ह्यात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. बदलत्या परिस्थितीत सर्व बाबींचा विचार करून पावले टाकली जात आहेत. लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात व संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पीपीई किट देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यासाठी 9 हजार पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत व्हेंटिलेटर खरेदीतील अडचणी दूर होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी असे सांगितले.

याच बरोबर शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने बांधावर डिझेल हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर बीड तालुक्यात सुरू करण्यात येत असून, सुरुवातीस असे एक सुसज्ज वाहन उपलब्ध करून दिले आहे. यावर डिझेल वितरणाची मीटर, किंमत दर्शवणारी यंत्रणा असून इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या सहकार्याने हे वाहन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. यामुळे बीड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या डिझेल इंधनाचा प्रश्न त्यांच्या बांधावर सुटेल अशी आशा आहे. बीड मधील इतर जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना बीडमध्ये येण्यास परवानगी दिली जात असल्याने पोलीस यंत्रणेवरील वाढणारा ताण लक्षात घेता 550 होमगार्ड जवानांची सेवा जिल्ह्यातील पोलीस विभागात मिळाव्या यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यात आला आहे.

बाहेरच्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी दिली जात असून याचा उपयोग तात्पुरत्या कारणांसाठी बाहेर जिल्ह्यात गेल्यानंतर अडकलेल्या व्यक्तींना व्हावा पण नोकरी व काम धंद्यानिमित्त इतर जिल्हा व शहरात राहणाऱ्यांनी बीड जिल्ह्यात येण्यासाठी याचा वापर करू नये. पालकमंत्री श्री. मुंडे पुढे म्हणाले, संचार बंदीच्या काळात अकरा शहरातील नागरिकांना किराणा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने ‘निडली’ ॲप सुरू केले असून पुढे याद्वारे जीवनावश्यक वस्तू देखील लोकांना पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध केली जाईल.

याच बरोबर आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या कापूस खरेदी साठी जिल्ह्यातील तेरा जिनिंग केंद्र मध्ये सहा ग्रेडर उपलब्ध असल्याने, उद्यापर्यंत आणखी चार ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. तसेच खरिपाची तयारी करताना जिल्ह्यात 80 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची कमतरता असल्याने कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून सदर बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. विवाहाच्या प्रसंगी 20 नातेवाईकांना उपस्थित राहण्यासाठी नियमात शिथिलता देण्यासाठी राज्यस्तरावरून निर्णय व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ना. मुंडे यांनी येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी नागरिकांसाठी पास उपलब्ध होणाऱ्या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे आतापर्यंत 365 अर्ज प्राप्त झाले असून 45 परवानगी दिली तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी नवीन 30 व्हेंटिलेटर घेण्यात येत असल्याची माहिती दिली गेल्याचे सांगितले .

बैठकीतूनच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना फोन
पालकमंत्री धनंजय मुंडे हे झटपट व जागच्या जागी निर्णय घेण्यासाठी प्रचंड लोकप्रिय आहेत. जिल्ह्यांमध्ये लग्न लावण्यासाठी परवानगी हा विषय निघताच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावला वीस लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यास परवानगी देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे समजते. होमगार्ड ची संख्या तसेच त्यांचे वेतन यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख त्याचबरोबर विविध आर्थिक नियोजनाच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यातील कमी पडणाऱ्या सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत कृषिमंत्री दादाजी भुसे आदी मान्यवरांना श्री. मुंडे यांनी चालू बैठकीतच फोन लावले व विषय मार्गी लावले.

बाहेर अडकलेल्या तब्बल ३ हजार ५५३ नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी केंद्र शासनाने अटी शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार आता राज्य शासनानेही अडकलेल्या नागरिकांना बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने परराज्य, जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 3 हजार 553 जणांना जिल्ह्यात येण्याचे परवाने देण्यात आले आहे. तर 993 नागरिकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच 648 नागरिकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी परवानगी नाकारली आहे. परवानगी दिलेल्यांपैकी अनेक नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर अनेक जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात गेले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी व त्यांची टीम सुट्टीच्या दिवशीही ऑनलाईन पध्दतीने परवाने देण्याची मोहीम राबवित असल्याने जळगाव जिल्ह्यात येणाऱ्यांची व जिल्ह्यातून जाणाऱ्यांची सोय झाली आहे. शनिवार, रविवार सुटीचा दिवस असतानाही जिल्हा प्रशासन परवाने देण्याचे काम करीत असल्याने नागरिक प्रशासनाचे आभार मानत आहे.

जिल्ह्यात बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून येण्यास परवानगी दिलेले नागरिक व त्यांची संख्या पुढीलप्रमाणे –
गुजरात-2941
राजस्थान– 119
मध्यप्रदेश- -40
झारखंड- -8 तर

इतर नागरिक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले आहेत. यामध्ये नाशिक, धुळे, औरंगाबाद, नंदूरबार, बुलडाणा मुंबई, पुणे, गडचिरोली, अहमदनगर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
जिल्ह्यतून बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी दिलेले नागरिक
नाशिक- -519
धुळे –233
औरंगाबाद–98
अहमदनगर- -96
इतर–47 याप्रमाणे आहेत.

बाहेरील राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी त्याबाबत तलाठी, तहसिलदार, प्रांताधिकारी, पोलिस यांना कळवायचे आहे. तसेच आल्यानंतर तालुक्यातील आरोग्य केंद्रातून स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यायची आहे. स्वतः 14 दिवस होम क्वारंटाईन व्हायचे आहे. असे न करणाऱ्या व्यक्तींची माहिती गावातील लोकांनी प्रशासनाला कळवायची आहे. त्यांची नावे गोपनीय ठेवले जातील. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी असे न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ५४१ वर, दिवसभरात सापडले ७७१ नवीन रुग्ण

मुंबई । कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७ , अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या पैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये ( ७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार होते.

मुंबई महानगरपालिका: ९३१० (३६१)
ठाणे: ६४ (२)
ठाणे मनपा: ५१४ (८)
नवी मुंबई मनपा: २५४ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २२८ (३)
उल्हासनगर मनपा: ४
भिवंडी निजामपूर मनपा: २२ (२)
मीरा भाईंदर मनपा: १५२ (२)
पालघर: ४६ (१)
वसई विरार मनपा: १५८ (४)
रायगड: ४१ (१)
पनवेल मनपा: ६४ (२)
ठाणे मंडळ एकूण: १०,८५७ (३९०)

नाशिक: २१
नाशिक मनपा: ३१
मालेगाव मनपा: ३३० (१२)
अहमदनगर: ३५ (२)
अहमदनगर मनपा: ०७
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ४६ (११)
जळगाव मनपा: ११ (१)
नंदूरबार: १८ (१)
नाशिक मंडळ एकूण: ५३१ (३०)

पुणे: १०२ (४)
पुणे मनपा: १७९६ (१०६)
पिंपरी चिंचवड मनपा: १२० (३)
सोलापूर: ३ (१)
सोलापूर मनपा: १२६ (६)
सातारा: ७९ (२)
पुणे मंडळ एकूण: २२२६ (१२२)

कोल्हापूर: ८
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: २ (१)
रत्नागिरी: १० (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ६० (३)
औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३१० (१०)
जालना: ८
हिंगोली: ५२
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३७५ (११)

लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण: ५४ (३)

अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ४८ (५)
अमरावती: १ (१)
अमरावती मनपा: ५७ (९)
यवतमाळ: ९१
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २२९ (१७)

नागपूर: २
नागपूर मनपा: १७२ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १८० (२)

इतर राज्ये: २९ (५)
एकूण: १४ हजार ५४१ (५८३)

(टीप – ही माहिती केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, कोविड१९ पोर्टलवरील प्रयोगशाळांनी दिलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे.सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी ११३९५४पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई मनपा आणि ठाणे , रायगड, व पालघर हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांबाबत आय सी एम आर प्रयोगशाळेच्या एकूण आकडेवारीत वाढ झालेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या अहवालात बदल होऊ शकतो. )

९० टक्के लोकांना होणारा कोरोना हा साधा तापच – डॉक्टर येळीकर

औरंगाबाद प्रतिनिधी । 90 टक्के लोकांना कोरोनामुळे कोणताही सिरीयस आजार होत नसून तो साध्या फ्लू सारखा आहे. पंधरा दिवसानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो म्हणून नागरिकांनी त्याला न घाबरता घरीच बिनधास्त रहावं असं आवाहन डॉक्टर कानन येळीकर यांनी केलं आहे. पाहुयात त्या काय म्हणतायत..

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/232839194608439

हात मिळवू नका, कोरोनाला हरवण्यासाठी आपली मनं जुळवा – सोनाली कुलकर्णी

पुणे । नेहमी सामाजिक कार्यात सक्रीय असणाऱ्या सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सध्या सबंध महाराष्ट्रभरात कोविड पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींबरोबर होत असणाऱ्या भेदभावपूर्ण व्यवहाराविरुद्ध “#विचारबदला” या व्हिडिओच्या माध्यमातून आवाज उठवला आहे.

कोविड पॉझिटिव्ह असलेल्या किंवा संक्रमण संशयित असलेल्या व्यक्ती प्रति भेदभाव दर्शविण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. नुकतीच मुंबईच्या लालबागमधील एक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका मराठी वृत्तपत्रासह काम करणाऱ्या 24 वर्षीय फोटो जर्नलिस्टला संस्थात्मक विलगीकरण केंद्रतून घरी परत आल्यावर त्याच्याच शेजार्‍यांनी त्याला शिवीगाळ केली. या पत्रकाराची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली न्हवती . मात्र या फोटो जर्नलिस्टचा संपर्क अन्य दोन कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या फोटो जर्नलिस्ट यांच्याशी झाला असल्याने मुंबई महानगरपालिकेद्वारे २० एप्रिलला दक्षता म्हणून त्याला विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले होते. केवळ अकारण भीतीने या फोटो जर्नलिस्टशी गैरवर्तन झाल्याची ही घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे त्याला दादरच्या एका संस्थात्मक संगरोध केंद्रात परत जाण्यास भाग पडले.एवढेच नव्हे तर, कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींना त्यांचे नाव व व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून प्रसारित केल्या जात असल्याने अश्या व्यक्तिंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आरोग्य व मानसशास्त्रज्ञ यांच्याद्वारे कोविड पोसिटीव्ह असणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांवर अशा गैरव्यवहारचा दीर्घ काळासाठी मानसिक दुष्परिणाम होऊ शकतो अशी चिंता मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या भेदभावपूर्ण व्यवहाराला अधोरेखित करत जनतेने “कोविड पोसिटीव्ह असणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांबरोबर अमानवी वर्तवणूक करू नये” असे आवाहन महाराष्ट्राच्या जनतेला केले आहे. संबंधित ७० सेकंदांचा हा व्हिडिओ मुंबईच्या वातावरण व झटका या एकत्र काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी जनजागृतीच्या हेतूने तयार केला आहे. टर्टल ऑन अ हॅमॉक चे गीता सिंग व अविनाश सिंग यांच्या संकल्पनेतून या चित्रफितीचे अनावरण झाले आहे.

या व्हिडिओच्या माध्यामातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींचा व त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा व त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी असा आग्रह व्यक्त केला आहे. सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “कोविड पॉझिटिव्ह संक्रमित असलेल्या व्यक्तींना कशाची भीती आहे? दुर्दैवाची बाब अशी आहे की, आज काल काही लोकांसाठी कोविड पॉझिटिव्ह असणं हे कुठल्या हि गुन्ह्यापेक्षा कमी नाही. पण हे चुकीचं आहे, आणि आपण हि मानसिकता बदललीच पाहिजे. “एकमेकांशी हात मिळवणे गरजेचे नाही पण, कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा व त्यांच्याबद्दल निर्माण केलेली सामाजिक कलंकत्वाची प्रतिमा तोडणे गरजेचे आहे. “मिठी मारू नका, शेक हॅन्ड हि करू नका….पण कोरोनाला हरवण्यासाठी योग्य विचार नक्की करा,” असा संदेश देत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या व्हिडिओचा समारोप करतात.

Bhagwan Keshbhat, Founder Waatavaran: 9221250399
Farah Thakur, Lead, Campaigns Waatavaran : 9869364237
Shikha Kumar, Campaigns Manager at Jhatkaa.org: 9819402460
Avinash Kumar Singh, Turtle on a Hammock Films 9920466345

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/234154884685590/

मुक्तांगण बंद होईल का ?

विचार तर कराल | मुक्ता पुणतांबेकर

पु. ल. देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून १९८६ साली माझे आई – बाबा डॉ. अनिता अवचट व डॉ. अनिल अवचट यांनी मुक्तांगण ची स्थापना केली. त्यावेळी उद्घाटनाच्या भाषणात पु. ल. म्हणाले होते, ” आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन करतोय या केंद्राची भरभराट होऊ दे, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देणार नाही. त्या चुकीच्या शुभेच्छा होतील. म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो की असं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे. तेव्हा आपण इथे एक सांस्कृतिक केंद्र सुरू करू.” किती मोठ्या शुभेच्छा पु. लं. नी दिल्या होत्या. माझ्या आईनेही व्यसनमुक्त समाजाचं स्वप्न पाहिलं. ‘मुक्तांगण बंद झालं पाहिजे’ असं ती नेहमी म्हणायची.

मुक्तांगण मधून बरे होऊन जाणाऱ्या मित्रांना आम्ही सांगतो की तुम्हाला मुक्तांगणला काही मदत करायची असेल तर फक्त तुम्ही व्यसनमुक्त रहा. तुमचं उदाहरण बघून इतरही लोकांना व्यसनमुक्तीची प्रेरणा मिळेल आणि मग एक दिवस आपण मुक्तांगण बंद करू. लॉकडाऊन झाल्यावर आम्ही नवीन रुग्णांना दाखल करून घेणं थांबवलं. त्याआधी ॲडमिट झालेल्यांना संसर्ग न होणं महत्वाचं होतं. उपचार पूर्ण झालेल्यांचे हळूहळू डिस्चार्ज होत आहेत. मुक्तांगणमधे एकावेळी २०० – २५० लोक असतात. ते आता फक्त ५०-६० आहेत.

काम कमी असल्यामुळे माझं स्वप्नरंजन सुरू झालं. ‘सध्या लॉकडाऊनमुळे दारू उपलब्ध नाही. आता घरी जाणारे रुग्ण नक्कीच व्यसनमुक्त राहतील. दारुच मिळत नाही म्हटल्यावर लोकांना व्यसन लागणार नाही. म्हणजे मुक्तांगणमधे कोणी येणार नाही.’ पु. लं. नी म्हटल्याप्रमाणे आम्ही खरोखरच मुक्तांगण बंद करतोय असंच मला वाटायला लागलं.

पण आज या स्वप्नरंजनातून मी धाडकन बाहेर आले. आजपासून दारूची दुकानं उघडली. लोक रांगा लावून दारू घ्यायला लागले.नंतर नंतर तर धक्काबुक्की सुरू झाली. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. आता मला पुढचं भयानक चित्र दिसतंय. कोरोनाच्या केसेस तर वाढतीलच पण अपघात, कौटुंबिक हिंसाचार हे सर्व किती वाढेल याची मी कल्पनाच करू शकत नाही. आज दुपारी मी मुक्तांगण मधून बाहेर पडून मुख्य रस्त्याला आले तेव्हा समोरच असलेल्या वाईन शॉपच्या गर्दीचा मी काढलेला फोटो या लेखासोबत देत आहे. त्या गर्दीकडे बघताना मुक्तांगण बंद करायचं पु. लं. चं स्वप्न विरून जातांना दिसलं.

मुक्ता पुणतांबेकर
संचालक
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे