Sunday, December 14, 2025
Home Blog Page 6696

“ओव्हररुल्स ” ― कलम ४९७ !

Adultry
Adultry

विचार तर कराल | दिपाली बिडवई

व्यभिचार हा यापुढे गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल भारतीय सर्वोच्च न्यायालयाने दिला तत्क्षणी माझ्या मनात पहिली प्रतिक्रिया उमटली ती म्हणजे पुरुषांना व्यभिचारासाठी शिक्षा नाही हा चांगला निर्णय आहे !! पण त्यांच्यासाठी हे उत्तेजन नव्हे बरं का ?? सर्वोच्च न्यायालयाने १५८ वर्ष जुने असलेले कलम ४९७ हे Unconstitutional मान्य करत Struck Down केले आहे. या निर्णयाचे विश्लेषण तुमच्यासोबत करणार आहेच पण त्या आधी यानिर्णयावर माझ्या तीन प्रतिक्रिया आहेत, दोन सुरवातीला तर एक सर्वात शेवटी मांडणार आहे.

पहिली – ४९७ रद्द होणं हे स्त्री-पुरूष समानतेच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे !!
दुसरी – विवाहबाह्य संबंधातील कायद्याच्या दांडगाईपेक्षा व्यक्तीच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडलेला निर्णय आहे.

कालबाह्य कायदे रद्द करणे हे भारतीय न्यायालयाचे कर्तव्यच आहे, त्यात कोणत्याही प्रकारचे दुमत नाही. पण आधी ते का होते ? आणि आता कोणती स्थिती बदली की न्यायव्यवस्थेला तो रद्द करावा लागला,हे खूपच महत्वपूर्ण आहे. भारतीय दंड विधान ४९७ हे असे होते की, पुरुषाने दुसऱ्याच्या विवाहित पत्नीशी, तिच्या पतीच्या संमतीविना लैंगिक संबंध ठेवणे हा बलात्कार नसला तरी तो व्यभिचाराचा गुन्हा असेल व त्यासाठी पाच वर्षांची कैद किंवा दंडाची शिक्षा होईल. अशा घटनेत ज्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवले जातील ती या गुन्ह्यातील साथीदार मानली जाणार नाही. तसेच कलम ४९७ च्या व्यभिचाराच्या गुन्ह्यात ज्या विवाहित पत्नीशी लैंगिक संबंध ठेवलेले असतील, तिच्या फक्त पतीचं बाधीत व्यक्ती मानले जाईल आणि यासंदर्भात फिर्याद फक्त त्यालाच दाखल करता येईल. न्यायालयाने स्पष्टपणे दोघांच्या समानतेवर शिक्कामोर्तब करत पुरूषांना होणारी Punishment रद्द केली आहे. तसेच न्यायालयाला वाटते की हे कलम संविधानाच्या अनुच्छेद २१ ( सन्मानाने जगण्याचा हक्क), अनुच्छेद १४ ( समानता ) व अनुच्छेद १५ (समान ) यांचा भंग करणारे आहे. विवाहित स्त्रीला पतीच्या मालकीची वस्तू मानून तिची Dignity and Equality हिरावून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता ‛Husband Is Not The Master Of Wife’ हे अधिकृत करण्यावर भर दिला आहे, हे या निकालात स्पष्टपणे दिसून येते आहे. पण हे न्यायालयाने बोलले असले तरी सामाजिक व्यवस्था यांचा समावेश आपल्या विचारात करेल का ?

थोडं मुद्देसुदपणे यात बघितल्यास अनेक गोष्टी या लक्षात येतात ―

■ गेल्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ३ खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली. शबरीमाला मंदिरात वय वर्षे १० ते ५० यादरम्यान वय असणाऱ्या महिलांवर असणाऱ्या बंदीविरुद्ध दाद मागण्यात आली होती. समलैंगिक संबंधांबाबत भा. दं. वि. कलम ३७७ च्या घटनात्मक वैधानिकत्वावर आक्षेप घेणाऱ्या खटल्यात, कलम ३७५ मध्ये नवऱ्याला असणाऱ्या संरक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पण या लेखाचा विषय भा. दं. वि. कलम ४९७ घटनात्मक वैधानिकत्वावर आक्षेप घेणाऱ्या खटल्याचा आढावा आहे.

१. भा. दं. वि. कलम ४९७ नुसार, एका विवाहित महिलेसोबत (अर्थात, त्या महिलेच्या संमतीने, अन्यथा तो बलात्काराचा गुन्हा आहे) शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला पाच वर्षांपर्यंत सक्तमजुरी किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद आहे.

२. हास्यास्पद भाग असा की त्या महिलेच्या नवऱ्याच्या संमतीने असे संबंध असतील तर ते गुन्हा न मानण्याची तरतूद आहे. थोडक्यात त्या महिलेच्या संमतीला दुर्लक्ष केले गेले आहे. नवऱ्याकडून केल्या गेलेल्या बलात्कारालाही अशाच दांभिक आणि भंपक प्रवृत्तीचे अधिष्ठान आहे. लवकरच त्याही मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात खटला येईलच. ( या मुद्द्यावरचे पॉईंट या लेखसोबत पुरवणी म्हणून देत आहे लेख संपल्यावर वाचा )

३. या खटल्यादरम्यान सरकारने असा दावा केला की या कलमामुळेच भारतीय समाजात विवाह संस्था टिकून आहे. दोन व्यक्तीमधला विवाह हा एक खासगी प्रसंग नसून समाजावर त्याचा परिणाम होत असतो आणि अशा वेळी सामाजिक हिताला सर्वोच्च न्यायालयाने प्राधान्य देण्याची मागणी सरकारने केली. त्यावर हे मत झुंडशाहीला उत्तेजन देणारे असल्याचा टोमणा न्या. नरीमन यांनी मारला. नंतर सरकारने, फार तर महिलेलाही शिक्षा देण्याची तरतूद करण्यात यावी पण हे कलम रद्दबातल करू नये अशी मल्लिनाथी करण्याचा प्रयत्न केला. ही मागणी हास्यास्पद असल्याचे निरीक्षण न्या. नरिमन व न्या. चंद्रचूड यांनी नोंदवले. न्या. मल्होत्रा यांनी काही प्रश्न विचारले ज्यांचे सरकारजवळ काहीही उत्तर नव्हते. उदा. महिलेच्या संमतीला दुर्लक्ष करण्याचे कारण काय किंवा ज्या महिलेचा पती मरण पावला आहे त्यासाठी सुद्धा या तरतुदी लागू आहेत किंवा गोपनीयतेच्या मूलभूत हक्कानुसार चार भिंतीआड उभयतांच्या संमतीने होणाऱ्या संबंधांबाबत सरकारला आक्षेप असण्याचे काय कारण आहे. स्त्रियांच्या कल्याणासाठी या तरतुदी असल्याच्या दाव्यापलीकडे सरकारकडे काहीही उत्तर नव्हते.

४. विवाहित पुरुषाने अविवाहित अथवा घटस्फोटित स्त्रीशी विवाहबाह्य संबंध ठेवले तरी ते कृत्य व्यभिचाराच्या गुन्ह्यात येत नाही.

५. कलम ४९७ रद्द केल्यास विवाहसंस्था उद्ध्वस्त होईल असे न्यायालयाने नमूद करतानाच पुढे त्यावर सुनावणी करताना विवाहाचे पावित्र्य हा मुद्दा आहे. परंतु गुन्हा ठरविणारी तरतुद Equality च्या हक्काचे स्पष्टपणे उल्लंघन करणारी आहे. ज्यांना वाटते की विवाह संस्था उद्ध्वस्त होतील त्यांनी ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ हा ग्रंथ वाचावा म्हणजे स्त्री-पुरुष संबंधांच्या संदर्भात त्यांचे समज किती भ्रामक आहेत, हे त्यांना समजेल.

६. न्यायालयाने म्हटले की, विवाह संस्था टिकून राहण्यासाठी हा गुन्हा दंड विधानात अंतर्भूत केलेला नाही. म्हणजे संसदेत कोणत्याच प्रकारे विवाह संस्था टिकून ठेवण्यासाठी कायदा केला नाही आहे.

७. कोणत्याही कायद्यांना त्या त्या काळाची अशी एक ‘चौकट’ असतेच. या चौकटीच्या कक्षा व्यापक करण्याचे काम संसद आणि न्यायालये दोघांचेही. समाजमन व्यक्त करणारी ‘संसद’, संसदेचे प्रतिनिधित्व करणारे ‘सरकार’ आणि कायद्याचा अन्वयार्थ लावणारे ‘न्यायालय’ हे तीनही घटक जेंव्हा सकारात्मक मानसिकतेतून आपापल्या भूमिका पार पाडतात तेंव्हा वरवर अवघड वाटणारे बदलही लोकशाहीच्या मार्गाने सहजपणे घडून येतात असे मला नेहमीच वाटते.

८. भारतासारखा परंपराप्रिय देश हे बदल समंजसपणे स्वीकारतोय, त्या विरोधात भावना भडकावणे सहज शक्य असतांना आणि अशा संधी असतांनाही हे परंपरागत रूढी व विचार नाकारणारे निर्णय कोणत्याही संघर्षाविना समाज मान्य करतो ही फार मोठी गोष्ट आहे. जागतिकीकरणाचा भाग बनलेला तरुण वर्ग, समाजमाध्यमांवरून व्यक्त होण्याची त्याला मिळणारी संधी याचा एक सकारत्मक ‘दबाव’ आज संपूर्ण समाजावर आहे आणि हा दबावच हे बदल घडवून आणतो आहे !

९. न्याययंत्रणेची विश्वासार्हता, पावित्र्य, नि:क्षपातीपणा केवळ काहींच्या हाती सुरक्षित असून न्यायनिवाडा करणारे इतर सर्व सरकारचे बाहुले झालेले आहेत आणि या खटल्यांच्या निवाड्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं वातावरण निर्माण करणाऱ्यांचा या शिफारस व निवाड्यांमुळे मुखभंग झाला आहे. मला नेहमीच वाटायचं बहुमताच सरकार विरुद्ध सक्षम सरन्यायाधीश त्यामुळे संसद विरुद्ध न्याययंत्रणा हा संभाव्य संघर्ष होईल. पण तो टाळला, ते मला तरी फारच भावलं.

१०. कायदे मंडळ कायदे करणार, ते लोकांनी पाळावे, नाही पाळले तर प्रशासनानं त्यावर नजर ठेवावी आणि कायदे न पाळणाऱ्यांना न्यायालयानं शिक्षा करावी, अशी आपल्या देशातील कारभाराची ढोबळमानानं रचना आहे. त्यात संसद ( कायदे मंडळ ) सर्वोच्च आहे, पण त्याचं कोणतंही भान विशेषत: संसदेला राहील नाही. नाहीतर प्रत्येक सुधारणा करण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावा लागली असती का ?

११. व्यक्तिगत पातळीवर विवाहबाह्य संबंधांला माझं समर्थन नाही, पण विरोध तर मुळीच नाही. कारण वैयक्तिक (सार्वजनिक नव्हे!) पातळीवर प्रत्येकाला हवं तसं जगण्याचा अधिकार मला मान्य आहे. विवाहबाह्य संबंध गुन्हा न ठरवण्याचे निवाडे संस्कृती रक्षकांना अर्थातच रुचणारे नाहीत. ‘जे मला मान्य नाही, ते संस्कृतीत बसत नाही’ असा बचाव करणारी आपल्या समाजाची आणि त्यातही संस्कृती रक्षकांची एक मानसिकता आहे या मानसिकतेलाच हे संस्कृती रक्षक नैतिकता आणि समाज मान्यता समजतात, हे तर घोर अज्ञानच आहे.

१२. या निर्णयामुळे विवाहित स्त्रीच्या परपुरुषाशी येणाऱ्या संबंधांतुन जन्मणाऱ्या अनौरस संततीमुळे मालमत्तेच्या वारसाहक्कात येऊ शकणाऱ्या कटकटी टाळणे शक्य होईल.

१३. विवाहित पुरूषाने विवाहबाह्य संबंध ठेवून आपल्या पत्नीची प्रतारणा करणे हे दिवाणी स्वरूपाचे गैरवर्तन आहे. घटस्फोटाने वैवाहिक संबध संपुष्टात आणण्यासाठीचे ते एक कारण असू शकते. विवाह कायद्यात तशी तरतूद आहेच व ती योग्यही आहे. स्त्रीचा समानतेचा लढा पुरूषांपेक्षा निसर्गाविरुद्ध आहे !!

१४. मानवी जीवनातील विवाह हा महत्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे मानवी समाज विवाह करतो उद्या विवाह संस्थेपेक्षा त्याला कोणतीही दुसरी सुरक्षित व्यवस्था भेटली तर तो तिचा स्वीकार करेल, मात्र सध्या तरी विवाह संस्थापेक्षा उत्कृष्ट पर्याय मानवाकडे नाही हे निश्चित. मग ती टिकवण्यासाठी कायदा अस्तित्वात आणायचा का ? स्पष्टपणे तरी न सांगता एवढं सांगू शकते की विवाह संस्था उत्कृष्ट असेल तर तिला कायद्याची गरज भासणार नाही. आणि ती निश्कृष्ट असेल तर कायदा असतानाही ती नष्ट होईल.

महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या समानतेच्या हक्कावर घाला घालणारा कोणताही कायदा घटनासंमत असू शकत नाही. पत्नीवर पुरुषाची मालकी नसते हे ठणकावून सांगण्याची आता वेळ आली आहे. असे अभूतपूर्व मत सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी नोंदवले. हा कायदा पुरूष व स्त्रीची नैतिकता वेगळ्या तागडीत तोलणारा आहे. यात लैंगिक भेदभाव आहे व तो विवाह संबंधातील दोन व्यक्तींना असमान अधिकार देतो. विवाह झाला की, स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व संपते व तिनेच फक्त पतीशी एकनिष्ठ राहायचे असते, हा विचार मुळात समतेच्या तत्वाला सुरुंग लावणारा आहेच. सोबत पुरुषच फक्त नादी लावणारा असतो व स्त्री त्याला बळी पडते या जुनाट कल्पना आजच्या काळात सुसंगत होत नाही आहेत. त्यामुळे फक्त त्यात आपण पुरूषालाच गुन्हेगार कसे समजू शकतो. कारण व्यभिचाराच्या या गुन्ह्यात जी कृती अभिप्रेत आहे, ती दोन सज्ञान व्यक्तीकडून स्वखुशीने केली जाणारी कृती असल्याने मुळात व्यभिचार हा फौजदारी गुन्हाच ठरू शकत नाही. भविष्यात या निर्णयाचा फायदा काही मुक्तेश्वरांनी घेतला आणि त्यावर संसदेत काही कायदा अस्तित्वात येऊ शकतो. उदाहरणार्थ – Triple Talaq case. त्यातही या निर्णयाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे न्यायाधीश चंद्रचूड यांनी याचं मुद्द्यावर ३३ वर्षांपूर्वी आपल्या वडिलांनी अर्थात न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड दिलेल्या निर्णयाला Overrules केलं कारण तस रुलिंग होतं, तेव्हा एकचं चर्चा संपूर्ण भारतात चालू होती ती म्हणजे – Like father, unlike son !

Supreme Court is not bound by its own rulling. It can rectify it. असंही म्हटलं जातं. अर्थात हाही एक पर्यायच. पण आपलंच रूलिंग फिरवायला सुप्रीम कोर्टाकडे तसं कारण असावं लागतं. शिवाय ते रुलिंगही अंतिम नाहीच.

हा निर्णय समान तत्वाच्या चष्म्यातून पहिला तर योग्य ठरतोय. पण सार्वजनिकदृष्टया ही योग्य ठरेल का ? याबाबतीत शंकेच उधाण माझ्या मनात अजूनही आहे.

“विवाह झाला की, स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व संपते व तिनेच फक्त पतीशी एकनिष्ठ राहायचे असते, हा विचार मुळात समतेच्या तत्वाला सुरुंग लावणारा आहे.”

IMG

दिपाली बिडवई, नाशिक

(लेखिका ब्लाॅगर आहेत)

गांधी विचार पोहचविण्यासाठी तरुणाचा ३७ किलोमीटर सायकल प्रवास

IMG WA
IMG WA

पुणे | साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगीकारलेल्या महात्मा गांधीजींचं आयुष्य हे अनेकांसाठी कुतूहल राहिलं आहे. अशावेळी झपाट्याने पुढे जाणाऱ्या यंत्रयुगात एक तरुण ज्यावेळी हा साधेपणा अंगीकारून गांधी विचार लहान मुलांपर्यंत पोहचवतो, त्यावेळी नक्कीच म्हणता येतं – गांधी अब भी जिंदा हैं !!

निलेश शिंगे या पुण्यात राहणाऱ्या तरुणाने चंग बांधला – शाळेतील मुलांपर्यंत गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची माहिती पोहचविण्याचा, त्यांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा आणि आरोग्याबद्दल जागरूक करण्याचा.. आणि हाच संकल्प आज पूर्ण करून दाखविला.

केशवनगर, मुंढवा येथून सुरु झालेला हा प्रवास – मगरपट्टा सिटी – हडपसर गाडीतळ – कावडी पाट टोल नाका – थेऊर फाटा – तारमळा जि. प. शाळा – कोळवडी मांजरी रोड मार्गे पुन्हा केशवनगर पर्यंत चालला.

तारमळा, थेऊर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज गांधी जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. सुरुवातीला प्रतिमपूजन झाल्यानंतर निलेशने आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या मनोगतात त्याने गांधीजींची श्रमप्रतिष्ठा, वेळेचं नियोजन, सत्य व अहिंसेबद्दल असलेला ठामपणा, त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतलेल्या व्यक्तींची माहिती, सत्याग्रहाचे अस्त्र, शिक्षण आणि गांधीजींच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या. भारतीय राजकारणातील महत्वाच्या टप्प्यावर गांधीजींची भूमिका कशी होती? यावरही त्याने थोडक्यात माहिती दिली. याशिवाय लाल बहादूर शास्त्रींच्या शांत, संयमी स्वभावासोबत त्यांची शेतकरी व जवानांप्रती असलेली बांधिलकी मुलांना समजावून सांगितली. अत्यंत सोप्या भाषेत त्याने या सर्व मुद्द्यांची मांडणी केली. आज शाळेने स्वच्छता कार्यक्रमसुद्धा हाती घेतला होता. त्यालाही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

निलेश हा ३८ वर्षीय तरुण, खराडी येथील EON आयटी पार्क मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत आहे.

अभिनंदन व इतर माहितीसाठी संपर्क –

निलेश शिंगे – 9766349754

आर्थर अष्कीन, गेरार्ड मौरौ, डॉना स्ट्रिकलांड यांना भौतिकशास्त्रातील २०१८ चे नोबेल जाहीर

नोबेलनगरी | लेझर किरणांच्या अभ्यासासाठी २०१८ सालातील भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. आर्थर अष्कीन, गेरार्ड मौरौ, डॉना स्ट्रिकलांड यांना संयुक्तरित्या हे पारितोषिक मिळणार आहे. आर्थर अष्कीन यांना ऑप्टिकल ट्वीझ्झरची निर्मिती व त्याचा जैविक संस्थांवर होणारा परिणाम या शोधासाठी तर मौरौ आणि स्ट्रिकलांड यांना कमी आकाराचे आणि अधिक क्षमतेचे ऑप्टिकल पल्सेस बनविण्याच्या शोधासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची अर्धी रक्कम आर्थर यांना मिळणार असून उर्वरीत रक्कम बाकी दोघींमध्ये वितरित होईल.

विद्यार्थी साहाय्यक समिती च्या माध्यमातून गांधी जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

Gandhi Jayanti Program
Gandhi Jayanti Program

पुणे | कुंदन पठारे

आज विद्यार्थी साहाय्यक समिती मध्ये महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी लजपत भवन मध्ये हरीश बुटले सरांच्या माध्यमातून स्वच्छता विषयी सर्व विदयार्थी यांनी सामूहिक शपथ घेतली. प्रभात फेरी काढून सर्व विद्यार्थी यांनी स्वच्छता विषयी जनजागृती केली. पुसळकर चौकात कचरा व्यवस्थापन विषयी पथ नाट्य सादरीकरण करण्यात करण्यात आले. शिवाजी हौशिंग सोसायटी भागात सामूहिक स्वच्छ ता मोहीम राबविण्यात आली.

लजपत भवन मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटल च्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. मुलानी भरभरून या वेळी प्रतिसाद दिला.
या वेळी श्री.तुकाराम गायकवाड, श्री.तुषार रंजनकर, श्री.कुंदन पठारे, श्री.हरीश अष्ठेकर, श्री.सचिन मोकाशे, श्री.सुभाष आपटे हेही उपस्थित होते.

मिस्टर गांधी उत्तर दया – डॉ. जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad on Mahatma Gandhi
Jitendra Awhad on Mahatma Gandhi

गांधी जयंती विशेष | गांधी खर म्हणजे बापू म्हणायला हव होत किंवा महात्मा पण तरी मी मुद्दाम गांधी म्हणतो आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारतो आहे.

तुमच्या बद्दल इतके बोलल जात आहे रोज हे तुम्हाला माहीत आहे का ? म्हणजे चांगल वाइट अस दोन्हीही बाजूने बोलल जात … यातल खर काय आहे हो गांधी ?

सगळ्यात जास्त तुमच्यावर श्रद्धा असणारे खुप आहेत, तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणारे ही बहुसंख्य आहेत.

पण मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस कसा वाइट होता, किती नुकसान केल आहे देशाच, अगदी देशद्रोही होता अस बोलणाऱ्याची संख्या आता कमी नाही. गंमत म्हणजे यातल्या बहुतेकानी तुम्ही लिहलेली एकहि ओळ वाचलेली नाही. तुम्ही देशद्रोही आहात का गांधी ?

तुमच चरित्र वाइट होत अस म्हणणा-यांनी तुमच एकही चरित्र वाचलेल नाही.

दूसरीकड़े तुमच्या काही भक्तानि तुम्हाला पोथित बंद केल आहे. तुम्ही परिवर्तन स्विकारणारे म्हणून प्रसिद्ध. पण, तुमच्याच भक्तानि तुम्हाला अपरिवर्तनीय करुन टाकल आहे. भक्त आणखी काय करतात. तुम्ही नेमके कसे होतात गांधी ?

तुमच नाव अजूनही चलनी नाण आहे हे तुम्हाला माहीत आहे का गांधी ? फक्त राजकारणातच नाही तर व्यवहारात सुद्धा आम्ही चलनाला गांधी हा पर्यायी शब्द वापरतो. म्हणून तुम्हाला सतत खिशात ठेवतो आम्ही… हे नेमके काय आहे ?

मजबूरी का नाम महात्मा गांधी हे लहान पणापासून ऐकतो आहे ह्याचा नेमका अर्थ काय आहे हो गांधी ?तुम्ही तरी सांगा.

तुमची किती चेष्टा केली जाते हे तुम्हाला माहीत नसेल… किती-किती नावाने तुम्हाला संबोधित केल जात हे तुम्हाला माहितही नसेल… तुम्ही चेष्टा आणि कुचेष्टाचा विषय आहातच पण अनेकांच्या द्वेषाचा देखील विषय आहात…

तुम्ही काय काय चुका आणि पाप केली ते तुम्हीच लिहुन ठेवल आहे पण, गांधी तुम्हाला माहीत नसलेली अनेक पाप तुमच्या माथ्यावर आम्ही मारून ठेवली आहेत…. तुम्हाला ही पाप माहीत आहेत का ?

तुम्ही सतत राम नाम जपायचे, अभंग आणि प्रार्थना म्हणायचे म्हणून इथल्या मुस्लिमांनी तुमच्याकड़े सतत संशयाने पाहिल. पण, म्हणून हिंदु तुम्हाला आपल मानतात ह्या भ्रमात राहु नका… तुम्ही नेमके कोणाचे होतात हा संशय अजूनही दोघाना आहे… म्हणजे तुम्ही माणूस होतात आणि माणुसकीवर प्रेम करत होतात ह्या वर दोघांचा विश्वास नाही. मग तुम्ही नेमके कोणत्या धर्माचे आहात गांधी ?

आइनस्टाइन म्हणाला ते खर वाटत की तुम्ही हाडामासाचे माणूस होतात… ह्या वर येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत. त्याच हे भाकित आम्ही खर ठरवल आहे… तुम्ही नेमके कोण होतात हे सांगा गांधी ?

तुम्हाला मारणाऱ्या त्या थोर अमानावाचे पुतळे उभारले तर तुम्हाला नवल वाटायला नको… ही तुम्हाला सूचना आहे धमकी समजा हवतर.. तुमच्या सत्याग्रह किंवा उपोषण असल्या फ़ालतू गोष्टीना आता काही किंमत नाही हे तुम्हाला माहीत आहे ना ?

मला कळत नाही की गांधी तुमचा खून केला, तरी तुम्ही संपायला तैयार नाही. आम्ही तुम्हाला खुप बदनाम केल तरी तुम्ही त्याला पुरुन उरलात …आम्ही देशातच तुम्हाला खुप बदनाम केल पण तरी सगळ जग तुमच्या समोर कस नतमस्तक कस होत हो ?

आम्हाला आमची ओळख सांगण्यासाठी १५ लाखाचा सूट घालावा लागतो ..आणि तुम्ही फक्त एका वस्त्रानिशी काश्मीर ते कन्याकुमारी कसे फिरत होतात ..मिस्टर गांधी ?

जगात कोणीही असो भारत म्हणजे गांधीचा देश अस कस म्हणतात हो ?

गांधी तुमचा विचार मान्य नसलेली माणस देखील तुमच्या समोर कशी झुकतात हो ?

इतके सगळे शोध लागून प्रगती होऊन प्रचंड विकास होऊंन देखील शेवटी सगळे विद्वान तुमच्या जुनाट विचारा जवळ येऊन का थांबतात ?

जगाला तुमचाच विचार वाचवेल अस सतत जगाला का वाटत ?

तुमच्याशी वैचारिक मतभेद असणारी विचारधारा तुमच्या पुढे नतमस्तक का होते ?

डावे म्हणतात की तुम्हाला काही कळत नाही तुम्ही गोंधळलेले होतात ?

उजवे म्हणतात की तुम्हाला इतर धर्माविषयी प्रेम होत ?

यातल खर काय ?

तुम्ही नेहमी सत्य बोलायचे अस म्हणतात ते खर आहे का हो ? कारण दिवसभरात आम्ही इतके असत्य बोलतो की कुणी खर बोलत हेच खोट वाटत .

मला खरच कळत नाही गांधी मी कोणावर विश्वास ठेउ … या सोशल मेडियाच्या जगात तर तुम्ही इतके बदनाम आहात … कितीतरी माणस तुमच्या वर इतकी तूटुन पडतात की वर्षानुवर्ष तुम्ही त्यांच्या वर केलेल्या अन्याया विरुद्ध त्यानी रणशिंग फुंकल आहे अस वाटत… सोशल मीडिया म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का गांधी ?

मी खुप सामान्य आहे निति नैतिकता या मार्गा वरुन मला चालता येत नाही. भ्रष्टमार्ग स्विकारल्या शिवाय मला उदरनिर्वाह करता येत नाही . पण, मग तरी मी तुम्हाला जाब विचारतो आहे. बोला उत्तर दया बोला गांधी. अस प्रेमाने आणि करुणेने नका बघू माझ्याकड़े मला नाही सहन होत ते… इतके क्षमाशील असण बर नाही गांधी…

द्विराष्ट्र वादाचा सिद्धांत मांडणा-यांची आज पूजा केली जातेय. आणि तुम्हांला फाळणीचा गुन्हेगार ठरवला जातंय गांधी… न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा हा देश तुम्हाला देताना तुम्हाला यातना नाही का होत मिस्टर गांधी ?

इतके सगळ सहन करून तुम्ही सतत इतके हसतमुख हे सगळा बघून तुम्हाला यातना नाही का होत ? कि कालच ओघात तुम्ही सुद्धा बदललात ?

कसे असता हो तुम्ही ….

तुमची हत्या करणा-या नथूरामाला आदर्श मानणारे आज सकाळीच स्वताला साबरमतीचे संत म्हणत तुमच्या पुतळ्याला हार घालून आले. हे तुम्ही पाहील असेलच.

मिस्टर गांधी तुम्ही कसे काय इतके सहनशील आहात हो. नथुरामाने तीन वेळा तुमच्यावर हल्ला केला. पण, तीनही वेळेला मोठ्या मनाने तुम्ही त्याला माफ केलत. त्याच नथूरामाने अखेरीस तुमचा जीव घेतला. तुम्ही अजून इतके सहनशील, सोशीक, क्षमाशील आहात का ? कारण आतातर केवळ गोमांस घरी ठेवल या संशयावरून ज्या घरातील एक मुलगा सैन्य दलात देशाची सेवा करतोय त्याच्या बापालाच ठेचून ठार मारलं जातंय. तुम्हांला वाटत नाही का ? तुमची सोशीकता हा देश विसरला आहे. मिस्टर गांधी मला उत्तर द्या.

कि ६५ वर्षात इथल्या मुर्दडांच्या प्रमाणे तुमच्या हि संवेदना बोथट झाल्यात ..बोल मिस्टर गांधी..आज हे प्रश्न तुम्हाला माझासारखे तरुण विचारणार आणि तुम्हाला उत्तर द्यावा लागेल, की तुम्हाला ठाऊक आहे करुणा आणि अंहिसा हेच शाश्वत सत्य आहे … बोला गांधी

मिस्टर गांधी उत्तर दया..

तुम्हांला गोळ्या मारणा-या नथूरामाला तुम्ही खरच माफ केलत का ओ ! भेटला का कधी तुम्हांला तो. तुम्हांला अहो जा हो करावस वाटत पण, त्याच नावही तोंडात घ्यावसे वाटत नाही. कायद्याने ज्याला खुनाच्या आरोपाखाली फाशी दिली, त्या खुनाचे उदात्तीकरण करणारी नाटक आता महाराष्ट्रात सुरु आहेत. हे नाटक बघायला समोर बसलेल्या प्रेक्षकवर्गावर अशी काही मोहिनी घातली जाते की, नाटकामध्ये एक क्षण असा येतो की, नथुराम जेव्हा तुमच्यावर गोळ्या झाडतो तेव्हा संपूर्ण प्रेक्षकवर्ग हा उठून टाळ्या वाजवायला लागतो. होय मिस्टर गांधी हे तुमच्याच देशात घडतंय…

तुम्हांला मारलेल्या बंदुकीतल्या गोळ्या अजूनही संपलेल्या नाहीत. विरोधी विचार ऐकूनच घ्यायचे नाही हे सूत्र आजही भारतात चालू आहे.काल-परवा पर्यंत तर या नामर्दांनी तर हदद्च केली गौरी लंकेश नावाच्या एका महिला पत्रकाला 7 गोळ्या मारल्या. मिस्टर गांधी तुम्हांला गोळ्या घालताना जसे त्यांचे हात कापले नाहीत…. तसे ह्या बहिणीला मारतानाही त्यांचे हात कापले नाहीत. कारण, यांचे मेंदू थिजलेले आहेत. रिव्हॉल्वरही तेच आणि भेजाही तोच काही बदललेले नाही.

(टिप : एक गोष्ट तितकीच सत्य आहे. हे कोणाला पटो अगर न-पटो मिस्टर गांधी… तुमच्या मारेक-यांवरती मनापासून प्रेम करणा-यांना हे कळून चुकले आहे. कि हा देश नथुरामाचा नाही… तर गांधींच्याच नावाने ओळखला जातो. त्यामुळे जगभरात फिरताना त्यांना फक्त एकच माल विकायला मिळतो. त्या मालाच नाव आजही मोहनदास करमचंद गांधी आहे.)

डॉ. जितेंद्र आव्हाड

(लेखक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून असून महाराष्ट्र विधानसभेवर आमदार आहेत)

तुम्ही कधी येताय? प्रेमाचा चहा प्यायला??

चहा
चहा

खाऊगल्ली | चहा हा अमृतासारखा असला तरी त्यात प्रेम नसेल तर तो व्यर्थच म्हणावा लागेल. आजूबाजूला चहा पिणारी लोकं जेव्हा म्हणू लागली की चहा म्हणून फक्त साखरेचं पाणीच मिळणार असेल तर बाहेर चहाच नको प्यायला त्यावेळी वाईट वाटलं..आणि निर्णय घेतला झकास चहा बनवून द्यायचा..चहा बनवण्याची आवड लहानपणापासूनच होती, आता फक्त ती मनापासून जोपासली. साताऱ्यातील नागरिकांची चहाची तल्लफ लक्षात घेऊन त्यांना प्रेमाचा चहा उपलब्ध करून देणाऱ्या अजय राजपुरे आणि सागर काकडे यांनी चहाविषयीची ही माहिती आज हॅलो महाराष्ट्रला दिली.

२१ जून २०१८ रोजी साताऱ्यातील राजवाडा परिसरात गोल बागेसमोर या शॉपची सुरवात करण्यात आली. कुटुंबातील लोकच या ठिकाणी आपुलकीने लोकांची सेवा करतात. अमृततुल्य हे नाव लोकांना तितकं पचनी पडत नाही, अशावेळी आपुलकी वाटणारं नाव म्हणून प्रेमाचा चहा असं ट्रेंडी नाव दुकानाला दिलं. चहासाठी वापरण्यात येणारा मसाला ५ वेगळ्या पदार्थांपासून बनविला जातो, आणि हाच मसाला चहाला स्पेशल टेस्ट देतो. चहामुळे पित्त किंवा आरोग्याच्या कोणत्याच तक्रारी उद्भवत नाहीत. प्रेझेन्टेशन कौशल्यामुळे सुद्धा लोक दुकानाकडे सहज आकर्षिले जातात. स्वच्छतेला आणि क्वालिटीला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न असून विविध कार्यक्रमांच्या पार्टी ऑर्डर्स देखील स्वीकारत असल्याचंही अजय यांनी सांगितलं.

तर सातारकर मंडळी, तुमच्यातील हरवलेल्या प्रेमाचा शोध घ्यायला एकदा नक्की भेट द्या आणि पिऊन पहा – प्रेमाचा चहा

अजय राजपुरे – 9595435043, 9595958410

भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती

images
images

अर्थनगरी | योगेश जगताप

भारतीय वंशाच्या हार्वर्ड बिझनेस स्कुलमधील प्राध्यापिका गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख आर्थिक सल्लागारपदी आज नेमणूक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टीन लिगार्ड यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. गीता गोपीनाथ या ४६ वर्षाच्या असून त्यांनी लेडी श्रीराम महाविद्यालय दिल्ली येथून अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली आहे. दिल्ली आणि वॉशिंग्टन येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून २००१ साली प्रिंस्टन विद्यापीठातून पीएचडी मिळवली आहे. २००५ सालापासून त्या हार्वर्ड विद्यापीठात अध्ययन करत आहेत.

अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समितीवर त्या सध्या कार्यरत आहेत. यामध्ये अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू, नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च, हँडबुक ऑफ इंटरनॅशनल रिसर्च या संस्थांचा उल्लेख करता येईल. आर्थिक धोरणे, भाववाढ, मुद्रित धोरण, रोजगार, सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अशा विविध विषयांवर ४० हुन अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर त्यांनी प्रकाशित केले आहेत.

जगातील सर्वोत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञांपैकी गीता एक आहे. विषयाचं उत्तम आकलन, प्रश्न सोडविण्याचं कौशल्य, चांगल्या पद्धतीने विकसित झालेले नेतृत्वगुण आणि दीर्घ आंतरराष्ट्रीय अनुभव यामुळे या पदासाठी ती सर्वार्थाने योग्य असल्याचं मत क्रिस्टीन लिगार्ड यांनी व्यक्त केलं. तिच्या निवडीने मला अतिशय आनंद झाल्याचंही पुढे त्या म्हणाल्या.

चरखा अजूनही फिरतोच आहे… तुझं सूत कातणं चालुच आहे…!

images
images

गांधी जयंती विशेष कविता | विनायक होगाडे

तुझ्या कृश देहकाठीवर आच्छादलेली, पण तीन गोळ्यांनी रक्ताळलेली,
ती फक्त सफेद खादी नव्हती…
तर त्यात होतं संपूर्ण भारताचं महाकाय प्रतिबिंब…
जे उमटलं होतं तुझ्या सत्याच्या असंख्य प्रयोगांती…
तू पांघरलेल्या खादीत होता हरेक प्रकारचा धागा…
असा धागा जो आजही त्या शाश्वत मूल्यांची मजबुती घेऊन उभाय…
इथला इतिहासच सांगतो की,
याआधी हे धागे कधीच पुरेसे एकसंध नव्हते… ना होते एकजीव…

भगवे धागे… हिरवे धागे… निळे धागे… न जाणो कित्येक रंगाचे ते धागे…
पण नव्हते ते कधीच एका रंगाचे…
ना ते रंगले कधीच एका रंगात…
पण का कुणास ठाऊक…
त्यांना मात्र अजूनही उमगलं नाहीय…
की अस रंगबिरंगी असण्यातच या खादीचं अपरिमित सौंदर्य दडलेलं आहे…

हा…
पण ते मात्र अजूनही करताहेत तेच प्रयोग… मात्र असत्याचे…
ते भिडवतात धाग्याला धागे…
अन धाग्यानेच उसवतात धागे…
धागे कोसळतात… उध्वस्त होतात…
धागे घायाळ होतात… रक्तबंबाळ होतात…
पण तरीही अजून शमली नाहीय त्यांची अतिरंजित महत्वाकांक्षा…
वस्त्राला एकाच रंगात रंगावायची…

म्हणूनच…
ते सतत उलट फिरवत राहिले तुझ्या चरख्याचं चक्र…
घालत राहिले मध्येच आडकाठी…
तू गती दिलेल्या चरख्यास…
पण मला कमाल वाटते ती याची की,
तरीही,साऱ्या जगाला अचंबित करावंस अस,
कसं काय विणलंस तू हे अशक्यप्राय वस्त्र…

मग मी धुंडाळत गेलो मागे मागे वस्त्राचा इतिहास…
आणि मग मला चरख्यावर बसलेले दिसले अनेक महात्मे…
जे देत होते गती चरख्याला…
तुझ्याचसारखा संघर्ष करत..
अखंड अन अविरतपणे…

आणि मग हे ही लक्षात आलं…
हे वस्त्र विणणं तितकं सोपं नव्हतंच मुळी…
कारण इथं मुळात सुताच्या कातण्यातच अडचणी होत्या…
अडचण होती धाग्या-धाग्यात असलेल्या धर्माच्या भिंतीची…
धाग्याच्या जातीय मानसिकतेची…
आणि ते मात्र खुशाल घालत होते यास खतपाणी… शतकानुशतके…
आणि विखारानेच नासवत होते प्रक्रिया विणण्याची…

पण तरीही ते विणल गेलं…
विणलं गेलं तुझ्या चरख्याने…
प्रेम आणि करुणेच्या मार्गाने…
कारण ,तू कातत राहिलास संथपणे एक अन एक धागा…
त्या शाश्वत मूल्यांनी…
सत्याच्या सातत्याने..
अहिंसेच्या मार्गाने…
कारण,हिंसेचा एक हिसका धागे तोडतो,
हेही तुला उमगलं होत…

आणि मग तू विणत गेलास धागे…
धागा शेतकऱ्यांच्या न्यायाचा…
धागा अस्पृश्यांच्या हक्काचा…
धागा बाईच्या सन्मानाचा…
धागा शोषितांच्या जगण्याचा…
धागा हिंदू-मुस्लीम ऐक्याचा…

सरतेशेवटी…
हे असंख्य चित्रविचित्र धागे जुळवण्याची
किंमत तुलाही चुकवावीच लागली…
त्यांना चरखा थांबवता आला नाही…
त्यांनी तुलाच थांबवलं… नव्हे संपवल…

त्यांना वाटलं तीन गोळ्यांनी विणकर संपेल…
आणि विणकरासंगे चरखाही…
म्हणून त्यांनी पेढेही वाटले…
पण चरखा मात्र फिरतच राहिला…

मग त्यांनी तू आधारासाठी वापरत असलेली काठी शाखेत फिरवली…
आणि पुनःपुन्हा आडवी घातली तुझ्यात चरख्यात…
लांब राहून दात काढणं तर त्यांचं चालूच होतं…
पण त्याच दाताखाली तुझ्या द्वेषाने त्यांची जीभ मात्र चावली जात होती…
ते तुझी इरसाल बदनामी तर नेहमी करतच राहिले…
पण तू लीलया खरा सिक्का ठरत राहिलास…

हा…
एके ठिकाणी तू खोटा ठरलास…
‘प्रथम ते दुर्लक्षतात, मग ते तुमच्यावर हसतात,मग ते तुमच्याशी लढतात आणि मग तुम्ही जिंकता…’ असं तू म्हणालास…

हो…त्यांनी तुलाही अन्नूलेखलं…
आणि ते तुझ्या विचारांवर सुरवातीला तर हसतच होते…
पण…
अरे पण ते तुझ्याशी लढलेच कुठे…?
तुझ्या विचारांना ते भिडलेच कुठे…?

आणि मग त्यांनी आजमावला त्यांचा असत्याचा प्रयोग…
त्यांनी नेहमीप्रमाणे काढलं…
त्यांच्या अस्तनीतील राखून ठेवलेल शस्त्र…
आणि घातल्या गोळ्या तुझ्यावर…
तू पांघरलेल्या त्या सफेद खादीवर…
नव्हे त्या बिंबावर… ज्यात भारताचं प्रतिबिंब दिसतं…

पण तरीही चरखा फिरतोच आहे…
फिरतोच आहे… फिरतोच आहे…
आणि आज त्यांनाही उमगलंय बहुदा… तुझ्या त्या डेंजर चरख्याचं विधायक उपद्रवमूल्य…

हा…पण ते बदलले नाहीत…
त्यांनी रणनीती मात्र बदललीय…
आता तू त्यांना प्रातःस्मरणीय झालायस…
आता तर ते चरख्यावरही बसतात…
आलेल्या पाहुण्यांना रेशीमबागेत नाही… तर तुझ्या आश्रमात नेतात…

तुझा खून करून झालाय…
पण तुझं त्यांच्या आडवं येणं थांबलेलं नाहीय…
ते आता तयारी करताहेत…
तुझ्या अपहरणाची…
तू मात्र निर्विकारपणे तसाच हसत रहा…
तुला कशाचीच फिकीर नाही…
कारण मला माहितीय…
चरखा अजूनही फिरतोच आहे…
तुझं सूत कातणं चालुच आहे…!

विनायक होगाडे

9011560460

महात्मा गांधींची दुर्मिळ चित्रे

Mahatma Gandhi
Mahatma Gandhi

पुणे | महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्याच्या ४०० दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन पुणे येथे भरवण्यात आले आहे. सदरील प्रदर्शन मोफत असून ते दोन ठिकाणी भरवण्यात येणार आहे. १ आॅक्टोबर ते ३ आॅक्टोंबर दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे तर ४ आॅक्टोंबर ते ७ आॅक्टोंबर गांधी भवन, कोथरुड येथे ते नागरिकांसाठी खूल असेल.

या प्रदर्शनातून महात्मा गांधीजींचा जीवनप्रवास चित्ररुपातून उलगडण्यात आला आहे. सकाळपासून नागरिकांनी बालगंधर्व कलादालन येथे गर्दी केली आहे.

व्हॉट्सअप वर बोलू देत नाही म्हणून पतीने आणि त्याच्या प्रेयसीने केली आत्महत्या

सिकंदराबाद | येथील २७ वर्षीय शिवा कुमार या तरुणाने आपली पत्नी आपल्याला व्हॉट्सअपवर मैत्रिणीशी बोलू देत नाही या कारणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवा कुमारच्या आत्महत्येची बातमी कळताच त्याची प्रेयसी असलेल्या १९ वर्षीय वेनीलानेसुद्धा विष घेऊन आत्महत्या केली. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे नातेसंबंधात पडत चाललेली फूट पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवून आली असून या घटनेने तरुणाई हादरली आहे.
मागील महिन्यातच शिवा कुमारने लाहरी हिच्याशी विवाह केला होता. विवाहानंतरही शेजारी राहणाऱ्या वेनीलाशी त्याचे फोन व व्हॉट्सअपवरुन बोलणे सुरुच होते. या गोष्टीला वैतागून लाहरी ने दोघांनाही खडे बोल सुनावले होते. शिवा कुमार हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता.