Friday, December 19, 2025
Home Blog Page 6738

मराठा आरक्षण | खासदार साबळे आणि बारणे यांच्या घरा समोर घंटानाद आंदोलन

Thumbnail
Thumbnail

पिंपरी चिंचवड | मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी भाजपा खासदार अमर साबळे आणि शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांच्या घरा समोर आज घंटा नाद आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्या पासून आंदोकांनी घंटानाद आंदोलनाला सुरुवात केली.
मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून लोकप्रतिनिधींच्या घरा समोर आंदोलन करण्याचे सत्र मराठा आंदोलकांनी आरंभले आहे.

दिनांक ९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक सकल मराठा समाजाने दिली आहे. राज्याच्या सर्वच भागांत मराठा आंदोलन सुरु आहे.

गाडीला हात लावला म्हणुन शिक्षिकेची विद्यार्थींनीला बेदम मारहान

Thumbnail
Thumbnail

औरंगाबाद | आपल्या चार चाकी गाडीला हात लावला म्हणून शिक्षेकेने विद्यार्थींनीला बेदम मारहान केल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे. विद्यार्थीनीला मोठया प्रमाणात मारहाण करण्यात आल्याने पालकांमधे संतापाची प्रतिक्रीया उमटत आहे. यामुळे सदर मुलीने शाळेत जाण्याचा धसका घेतला आहे. मुलगी पाचवीत शाळा शिकत आहे. शिक्षिकेने मुलीला केलेली मारहाण सीसीटीव्ही कामेऱ्यात कैद झाली असून शिक्षिका अडचणीत येण्याची संभावना या मुळे वाढली आहे.
मार हान झालेल्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस चौकीत फरद सुलताना या मारहाण करणाऱ्या शिकक्षेकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गाडीला हात लावला म्हणून आशा पध्द्तीने मारहाण करणे अत्यंत चुकीचे असल्याचे सर्वत्र बोलले जाते आहे.

अफवा रोखण्यासाठी व्हाट्सआपचे आयआयटीला साकडे

Thumbnail
Thumbnail

मुंबई | व्हाट्सआपचा वापर करून अफवा पसरवण्याचे जणू पेवच फुटले आहे. आशा प्रकारातून व्हाट्सआपची मोठी मान हानी होते आहे. व्हाट्सआपच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर तोडगा काढण्यासाठी व्हाट्सअॅपने खूप प्रयत्न केले. परंतु त्यांच्या कौशल्याला मर्यादा पडल्याने आता त्यांनी जगातील नामांकित संगणक तंत्रज्ञ संस्थांना या समस्येवर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
आयआयटी मुंबईला या आशयाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. आयआयटी मुंबईने यात आपले संशोधक उपाय देण्याचे मान्य केले असून योग्य उपाय सुचवणाऱ्यास व्हाट्सआपने ३५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मराठा मोर्चाच्या निमित्ताने …

Thumbnail
Thumbnail

हनुमंत दि .पवार, उस्मानाबाद

        पुन्हा एकदा महाराष्ट्रात ‘जात जाणीव’ वर्ग जाणीवेवर हावी झाली. शांततेत., शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने मराठा जातसमूह सहकुटुंब रस्त्यावर उतरला. मागण्यांबाबत सर्वांनीच मराठ्यांशी सहमत असावे असे नाही. मराठ्यांनी एकत्र येऊन संसदीय राजकारणातले आजवरचे जनचळवळींचे हुकमी म्हणून ओळखले जाणारे ‘मोर्चा’ हे हत्यार परिणामकपणे वापरले. अहिंसा, शांतता ही ‘शस्त्र’ ज्या समाजवादी – गांधीवादी मंडळींची ओळख होती, ती हुकूमशाही – सरंजामी म्हणून लोकशाहीत बदनाम असणाऱ्या मराठ्यांनी लिलया पळवली. आता प्रश्न उपस्थित होत आहेत कि , मराठे खरंच शेवटपर्यंत अहिंसक राहतील? महिलांच्या अत्याचाराबद्दल संवेदनशील राहतील? नोकरी – शिक्षण- हमीभाव या भौतिक प्रश्नांवर चिकाटीने व्यवस्थेशी झगडतील? मुलतः सत्ताधारी असल्यामुळे येणारी सर्वसमावेशकता जपतील? की जातीची अस्मिता – जातीचे प्रश्न – जातीचे संगठन – जातीचे लढे इ. मधून एकजातीय ओळखीत अडकतील? मराठा जातीअंतर्गत असलेले उच्च, मध्यम व गरीब – शेतमजूर – भूमिहीन यांच्यातील संबंध संघर्षाचे राहतील? की शोषक असो वा शोषित आपण सर्व एकाच जातीचे म्हणून जातिअंर्तगत शोषणाची व्यवस्था जपतील? राज्य (state) म्हणून हा प्रश्न सरकार कोणत्या पद्धतीने सोडवणार? दलित – ओबीसी -भटके -अल्पसंख्यांक या वर्गाशी पुढील काळात मराठा जात समूहाचे नाते कोणत्या प्रकारचे असणार? या व अशा कितीतरी प्रश्नांना आज महाराष्ट्र सामोरा जात आहे . या प्रश्नांच्या अनुषंगाने का लेख..

इतर महत्वाचे लेख – 

         या मोर्च्यांनी महाराष्ट्रातील कृषिव्यवस्थेशी नाळ असलेल्या मराठा समूहावर कोणाही एका नेत्याची पकड नाही हे सिद्ध केले. राणे, विखे, थोरात ,देशमुख, कदम आदी मनसबदार, मराठा पुढारी म्हणून ओळखले जाणारे मेटे, खा.संभाजी राजे, भैय्यु महाराज, सत्ताधारी विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, शेतकरी संघटनेचे लोकप्रिय नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पाशा पटेल, रघुनाथदादा पाटील इ. नेतृत्वाला मराठ्यांनी एक प्रकारे शह दिला आहे. त्यांना राजकारणाचा फेरविचार करायला भाग पाडले आहे. त्यामुळे कोणाही एकाच्या नावावर या आंदोलनाची वासलात लावता येणे शक्य झाले नाही. आता हे बघणे महत्वाचे आहे की यातून नवे लोकाभिमुख नेतृत्व उभे राहणार का? काही विद्वानांनी या मोर्च्याच्या पाठीमागे शरद पवार तर काहींनी रास्वसंघ – भाजप उभे असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. जर या आंदोलनातून नवे नेतृत्व उभे राहिले नाही तर वरील निरीक्षण खरे ठरेल. आज आंदोलकांमधून प्रस्थापित राजकारण्यांना (सर्वपक्षीय) तरुण प्रश्न विचारत आहेत. नेत्यांच्या मागे न धावता, आंदोलकांच्या मागे नेत्यांना धावावे लागत आहे. हे स्वागतार्ह आहे. नाहीतर भले – भले क्रांतिकारक, डावे, समाजवादी, जनचळवळीवाले, गांधीवादी, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या दारात ‘उपकृत’ होण्यासाठी रांगा लावताना महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहेत. यात सर्वात आघाडीवर रिपब्लिकन पुढारी आहेत. साहित्यिकांची तर तुलनाच कोणाशी याबाबतीत होऊ शकत नाही . (आठव्या पिंपरी चिंचवडच्या संमेलनात स्वागताध्यकक्षांनी वाटलेल्या रमण्या), माध्यमातही मराठा पुढाऱ्यांची मर्जी सांभाळण्याची लागण मोठ्या प्रमाणात झालेली आहेच. अश्या वातावरणात मराठा जनतेच्या पाठीमागे प्रस्थापित नेते हे दृश्य मोठे सुखावणारे आहे. मात्र यातून नवे नेतृत्व उभे राहिले नाही तर, हे आंदोलन म्हणजे निव्वळ राजकीय आशा – आकांक्षांनी प्रेरित झालेल्या नेत्यांची आपापसातील साठमारी ठरेल. मराठे आजवरच्या मराठा धुरीणांना जाब विचारणार का? जाहीरनामे -पक्षीय ध्येय धोरणे याबाबत मराठा सजग राहणार का ? की परत जातीच्या आवाहनाला बळी पडणार हे पाहणे गरजेचे आहे.

         मराठा मोर्च्याच्या निमित्ताने डाव्या – समाजवादी पक्ष संघटनांच्या (विचारसरणीच्या नव्हे) मर्यादा स्पष्ट झाल्या. वरातीमागून घोडे ‘ या म्हणीप्रमाणे मराठ्यांचा असंतोष प्रकट झाल्यावर हे फक्त प्रतिक्रिया देण्यातच अजूनही धन्यता मानत आहेत. शेती – शिक्षण – रोजगार या क्षेत्रातील मराठ्यांचा असंतोष यांना का एकत्र करता आला नाही? एकेकाळी हेच मराठे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते, हेच मराठे डावा विचार घेऊन कामगारांसाठी लढणाऱ्या कामगार संघटनांचा कणा होते, याच मराठ्यांनी डाव्या विचाराने प्रेरित होऊन शेतकरी कामगार पक्ष काढला होता. हेच मराठे समाजवादी पक्ष संघटनेत बिनीचे शिलेदार होते याच मराठ्यांनी शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतमालाच्या हमीभावाचा एल्गार पुकारला होता. याच मराठ्यांनी विखे-गाडगीळ – मेहता त्रयींच्या मार्गाने सहकार फुलवला होता. हेच मराठे अध्यात्मिक क्षेत्रातील समतेच्या प्रांगणात वारकरी म्हणून पुढे होते. हेच मराठे प्रादेशिकतावाद सोडून काँग्रेसच्या पाठीमागे होते, याच मराठ्यांनी मराठी च्या हितासाठी इतर प्रदेशांशी भांडण झुंपले होते, याच मराठ्यांनी हॆद्राबादच्या निझामाला सळो -की पळो करून सोडले होते, इतके राजकीय – सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेले मराठे आज काँग्रेस, भाजपा, शिवसेना, शेतकरी संघटना, कम्युनिष्ट, समाजवादी इ. पासून चार हात लांब राहण्यात का धन्यता मानत आहेत? याचा विचार या निमित्ताने होण्याची गरज आहे. ताराबाई शिंदेंसारख्या महिला विदुषी ज्या समूहातून पुढे आल्या त्या समूहातील स्त्रियांचा आक्रोश स्त्री मुक्ती संघटनेच्या व्यासपीठापासून दूर का राहतो? मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न डाव्या विद्यार्थी संघटनांच्या लढ्यांचा विषय का नाही झाले? विस्थापित – प्रकल्पग्रस्त मराठा शेतकरी जनआंदोलनाच्या राष्ट्रीय आंदोलनात का इतक्या मोठ्या प्रमाणात उतरत नाही ? या सर्व गोष्टींबाबत संबंधितांनी लढ्याची भाषा, मार्ग, नेतृत्व, संघटन या बाबतीत पुनर्विचार करण्याची संधी म्हणून मराठा मोर्च्याकडे पाहावे. जातीच्या नावाने, आवाहनाने एकत्र येणाऱ्या मराठ्यांना बांधून ठेवणारा मुख्य घटक हा ‘भौतिक प्रश्नाचा’ आहे हे मान्य करूनच पुढे जावे लागेल. बरं, हे जातीचे मोर्चे आहेत, तर मग या मंडळींनी मराठा जातीच्या संघटनांचे म्हणजे मराठा सेवा संघ, मराठा महासंघ , संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड , शिवसंग्राम या संघटनांचे नेतृत्व शिरोधार्य मानून या बॅनरखाली का आंदोलन केले नाही, असा प्रश्न पुरोगाम्यांना का बरे पडला नसावा ?

इतर महत्वाचे लेख –

या मोर्च्यामधील तरुणांच्या असंतोषाला हिंसक वळण लावण्याचे प्रयत्न केले जाणार नाहीत असे नाही खा. उदयनराजे यांनी नक्सलवाद्यांचं नेतृत्व मी करेन, मराठ्यांची मुलं मागण्या मान्य नाही झाल्या तर शस्त्र घेतील असं म्हणनं, सांगलीच्या मोर्च्याला संभाजी भिडे यांनी दिलेला पाठिंबा, अथवा पुण्यातील मोर्च्यात हिंदुत्ववाद्यांनी वाटलेली सामान नागरी कायद्याची पोस्टर्स असतील, हि नमूनेदाखल काही उदाहरणे आहेत. मराठा तरुणांना हे लक्षात घ्यावे लागेल की भारतीय राज्यघटनेला नख लावून आपले कल्याण होणार नाही. हिंसा हि अंतिमतः अराजकाला निमंत्रण देते . घटनेच्या रक्षणाची जबाबदारी मोठ्याप्रमाणात बहुसंख्यांक म्हणून आपली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही प्रकारे हिंशेचे समर्थन न करता एका मोठ्या समूहाला संसदीय लढ्यातील हत्यारे वापरून न्याय मिळवून दिला होता, हे उदाहरण मराठ्यांनी विसरू नये. परिस्थिती चिघळवण्यासाठी भाजप सरकार काय करेल याचा भरवसा नाही. नक्षलवादी नवीन भरतीसाठी व्यवस्थेमधल्या असंतुष्टांच्या शोधात असतात, या दोन्ही शक्तीपासून आंदोलनाला हिंसेची लागण होण्याचा धोका ओळखून सावधानता बाळगावी लागेल अन्यथा मराठा मोर्च्यामधून एक जरी दगड भिरकावला गेला तर अवघा मराठा समाज बदनाम होऊ शकतो, याचे भान बाळगावे लागेल.

          आरक्षण आणि अट्रोसिटी संबंधातील मागण्यांची गुंतागुंत पाहता त्या तातडीने मान्य होतील याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गरीब – शेतमजूर- भूमिहीन मुलांच्या प्राथमिक ते उच्चं शिक्षणापर्यंतच्या प्रवासात वसतिगृह, भोजन, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया व शिक्षणाचा दर्जा याअनुषंगाने काही गोष्टींची मागणी सरकारकडे तातडीने करावी लागेल. त्यामध्ये शिक्षण सम्राटांचे चराऊ कुरण असलेला व्यवस्थापन कोटा सरकारच्या अधिकारात आणणे, मोफत वसतिगृह, भोजन, बार्टी च्या धर्तीवर शिक्षण -प्रशिक्षण – संशोधन क्षेत्रात मराठ्यांच्या मुलांसाठी संस्था उभी करणे, शिक्षण शुल्क माफ करणे, या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर हमी भावाच्या मागणीच्या दृष्टीने सरकारला पावले उचलावी लागतील. अर्थात त्यासाठी संसद – न्यायालय व इतर समाजघटकांच्या नाराजीचा, परवानगीची सरकारला गरज नाही. वरील दोन्ही गोष्टी सरकारने तातडीने कराव्यात. त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासून, येत्या रब्बी हंगामापासून करावी. शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव हे शेतकरी आत्महत्या थांबीवण्याचे दोन हुकमी उपाय आहेत. सरकार आरक्षण आणि अट्रोसिटीच्या चर्चेत माध्यमांकरवी आंदोलकांना अडकवत आहे. हे ओळखून मराठा मोर्च्याच्या धुरिणांनी वरील दोन मांगण्यांवर सर्व शक्ती पणाला लावावी. अट्रोसिटी कायदा हा आजही समाजातील साधन -सत्ता – प्रतिष्ठा – सुरक्षाहींन समाजाच्या प्रतिष्ठा व सुरक्षेसाठी गरजेचा आहे, पण याआडून कायद्याचा गैरवापर करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात गावागावात आज नजरेस येते हे वास्तव आहे. जिथे खरंच दलितांवर अन्याय होतो तिथे परिणामाकपणे हा कायदा राबविला जात नाही आणि जिथे केवळ दहशत – ब्लॅकमेलिंग करून कायदा बदनाम केला जातो तिथे कायद्याची बदनामी जास्त होते. ज्यांना अट्रॉसिटी पूर्ण बंद करायची आहे , ज्यांना अट्रॉसिटी आणखी कडक करायची आहे या दोघांना केवळ राजकारण करायचे आहे . हा कायदा ‘ब्लॅक अँन्ड व्हाईट ‘ या दोनच पर्यायात पाहून चालणार नाही. दलित पक्ष संघटनांनी या कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणून आजवर किती प्रबोधनाच्या कार्यशाळा – चर्चासत्र घेतली? कायद्याचे ज्ञान जनतेला व्हावे म्हणून किती दलित संघटनांनी दलितांना कायद्याची कलमं समजावून सांगितली? किती मराठा संघटनांनी कायद्याचा गैरवापर करणं सोप्प नाही, हे कायद्याचा मसुदा हातात घेऊन मराठा जनतेला सांगितलं? दोन्हीकडून ‘साप -साप म्हणून भुई थोपटणं सुरु आहे’ , दोन्ही समाजाच्या संयुक्त कमिट्यांनी गाव – खेड्यांपासून राज्य पातळीवर प्रबोधन करण गरजेचं आहे, अट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही फक्त त्याची योग्य अमलबजावणी कशी करता येईल हाच मार्ग दलित आणि मराठ्यांपुढे आहे. तो परिणामकपणे अवलंबावा लागेल. भिवंडी पॅटर्न चे जनक माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, उद्धव कांबळे, अशोक धिवरे, माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, बी. जी. कोळसे – पाटील, बी.एन. देशमुख, नरेंद्र चपळगावकर, राजकीय नेते बाळासाहेब आंबेडकर, रूपा – बोधी कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, हरी नरके, डॉ . सदानंद मोरे, कॉम्रेड विलास सोनावणे, ऍड. असीम सरोदे, डॉ.आ.ह.साळुंखे, ऍड. नितीश नवसागरे, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, मंगल खिंवसरा, पुरुषोत्तम खेडेकर आदी जबाबदार मंडळींनी पुढाकार घेऊन तालुका स्तरापासून या कायद्याच्या परिणामक अंमलबजावणीसाठी गठीत करावयाच्या समित्यांची रचना, कार्यपद्धती, जबाबदारी, अधिकार, आदींचा मसुदा शासनास द्यावा व यातून मार्ग काढावा .

         मराठा मोर्चास जातीयवादी मोर्चा म्हणून काही मंडळींकडून हिणवले जात आहे. भगवानगडावर जमणाऱ्या वंजारी बांधवांनी, म.फुले समता परिषदेस जमणाऱ्या माळी बांधवानी,’आम्ही सारे ब्राह्मण’ म्हणून जमणाऱ्या ब्राह्मण मंडळींनी , राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून जमणाऱ्या धनगर बांधवांनी, ब्राह्मणांपेक्षाही ब्राह्मण्य पाळणाऱ्या लिंगायतांनी, एमआयएम च्या नावाने गोळा होणाऱ्या मुस्लिमांनी, काँग्रेस – राष्ट्रवादीलाही लाजवेल अशी घराणेशाही राबवणाऱ्या सांप्रतच्या समाजवादी -गांधीवादी, एनजीओ वाल्यांनी, सोयाबीन पीक किती महिन्यात येत हे न सांगू शकणाऱ्या कम्युनिष्टांनी, एका पिढीच्या सेवेच्या कामावर पुढच्या चार चार पिढ्या समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या समाजसेवकांनी, अजूनही पोटजातीत लग्न लावणाऱ्या नवबौद्धांनी खरंच मराठ्यांना जातीयवादी म्हणण्याचा नैतिक अधिकार संभाळलाय का? नव्हे तो त्यांना आहे का ? हा प्रश्न विचारावा लागेल. संत तुकोबा ऐके ठिकाणी म्हणतात –

आंम्हा हे कौतुक,

जागा द्यावी नीत !

करावे फजित

चुकती ते !

            तर असे चुकणाऱ्यांची फजिती समन्यायी पद्धतीने करणारे ‘रामशास्त्री बाण्याचे ‘ विश्लेशक , लेखक , पत्रकार , आज समाजात अस्तित्वात आहे का ? असले तर त्यांनी जातीचा प्रश्न अजेंड्यावर घ्या म्हणणाऱ्या कॉम्रेड शरद पाटलांना कम्युनिष्टांनी बहिष्कृत करून त्यांची राजकीय हत्या केल्यानंतर वा कॉम्रेड गोविंद पानसरेंनी खरा शिवाजी लोकांसमोर मांडण्याचा ‘गुन्हा’ केला म्हणून सनातनी ब्राह्मणांनी माथेफिरू बहुजनांकरवी हत्या केली तेव्हा काय विश्लेषण केले ? सनातनी कम्युनिष्ट आणि सनातनी ब्राह्मणांनीं या दोन छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासू मांडणी करणाऱ्या , सरंजामी म्हणून बदनाम करण्यात आलेल्या मराठा जातीत जन्माला येऊन वर्गांताचे – जातिअंताचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या खऱ्याखुऱ्या कॉम्रेड्स इथल्या कम्युनिष्टांनी , मराठ्यांनी , सारस्वतांनी , दलितांनी , कामगारांनी , काय दिले ? महाराष्ट्र जात- जाणिवेसह वाढला , त्याला वेसण घालून समता – बंधुता – स्वातंत्र्याची देशाला प्रेरणा देणारी मांदियाळी मराठा जातीत जन्मली . छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते यशवंतराव चव्हाण असा समृद्ध वारसा जाती अंताचा आहे तो इतक्यात नामशेष होणार नाही त्यामुळे इतर जातींनी मराठा आकस ठेऊ नये , मराठा जातीतल्या तरुणांनीही ही लढाई खरोखरच कोण्या जातीच्या विरोधात नसून आमच्या भौतिक प्रश्नांच्या सोडवणुकीची आहे , हे पुढील काळात सरंजामदार मराठे , सनातनी ब्राह्मण , संधीसाधू दलित – ओबीसी पुढाऱ्यांच्या विरोधात उभी करून महाराष्ट्राला नवी दिशा द्यावी हि अपेक्षा .

        त्या अगोदर मराठा जातीतल्या तरुणांना आपल्या घरातील तथाकथित खानदानी बाज बाजूला ठेवून महिला – मुलींना समानतेने वागवावे लागेल . आपल्यातील अक्करमाशी – बारमाशी वादावर विजय मिळवावा लागेल . प्रस्थापित पाटील – देशमुखांना पर्यायी राजकीय नेतृत्व उभे करावे लागेल , कारण येथून पुढचे सर्व लढे हे संसद – विधिमंडळात लढले जाणार आहेत . कला – साहित्य – क्रीडा – प्रसारमाध्यमे , तंत्रज्ञान , उद्योग , संशोधन यामध्ये स्वतःला झोकून द्यावे लागेल.

        हे सर्व करत असताना हे राज्य आणि पर्यायाने या देशाची सत्ता कशी आणि कशासाठी राबवायची याचा शिवछत्रपतिंनी घालून दिलेला वारसा विसरायचा नाही. तो समतेचा आहे. सर्वाना सोबत घेऊन रयतेचे राज्य (फक्त मराठा नव्हे ) स्थापण्याचा आहे. शेतकरी हिताला प्राधान्य. महिलांचा आदर करण्याचा आहे. रयतेच्या हिताला बाधा आणणारा ‘मुसलमान’ अफ़जलखान , ‘ब्राम्हण’ कृष्णाजी भास्कर कुलकर्णी , ‘मराठा’ रांझ्याचा पाटील…शिवाजी महाराजांनी कापून काढला . रयतेच्या हिताला जागणारा’मुसलमान’ दौलतखान , ‘ब्राम्हण’ बाजीप्रभू देशपांडे , ‘मराठा’ बाजी पासलकर ..यांना शिवाजी महाराजांनी जीवापाड जपले . ज्यांना जनहितासाठी समाजकारण – राजकारण करायचे आहे त्या सुज्ञांनी शिवाजी महाराजांची दृष्टी स्वीकारावी हि विनंती.

n

हनुमंत दि .पवार

( सूंभा – उस्मानाबाद )

 

लिंगायत महासंघाची आरक्षणाची मागणी

Thumbnail
Thumbnail

पुणे | ‌महाराष्ट्रात सुमारे १ कोटी लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाने आरक्षणासाठी शासनाकड़े लिंगायत महासंघाने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. लिंगायत वाणी समाजाला आरक्षण मिळते परन्तु इतर वीरशैव, हिंदू लिंगायत, व फक्त लिंगायत यांना खुल्या प्रवर्गातच आहेत त्यांनाही ओबीसी प्रमाणे आरक्षण मिळावे अशी मागणी पत्रकार परिषदेत लिंगायत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन बिरादर यानी केले.

‌तसेच मराठा धनगर मुस्लिम आरक्षणाला यावेळी पाठिंबा देण्यात आला. ‌३० मार्च २०१८ च्या लातूर येथे राज्यव्यापी बसव महामेळावा घेण्यात आला होता,त्यांन्तर शासनाने २७/४/२०१८ रोजी सोलापुर येथील मेळाव्यात १५ दिवसांत हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल होतं. अद्यापहि या प्रश्नाच निराकरण झाले नसल्याने लिंगायत महासंघाने स्पष्ट केले, ‌शासनाने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा मराठा क्रांति मोर्चा सारख आम्हीही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

किशोरवयीन मूला- मुलींसाठी अर्थसाक्षर निमकाची प्रशिक्षण योजना

Thumbnail
Thumbnail

पुणे | ‌अर्थनियोजन हे एक प्रकारचे कौशल्य आहे आणि ते शाळेच्या माध्यमातून शिकविले जात नसल्याच माजी, सैन्य अधिकारी प्रिंस पॉल यांचं म्हणन आहे, ते पत्रकार परिषदेत या संस्थेची भूमिका मांडत होते.
‌ते म्हणाले, आर्थिक नियोजनाचे धड़े हे शाळेकडुन अपेक्षित असूनही ते शिकवत नाहीत, व ते शिकवण्यास ते असमर्थ असल्याचा आरोप ही त्यांनी या वेळी केला, मुलांना शाळा बाह्य आर्थिक व्यवहार प्रत्यक्षपणे कौशल्य विकसित करण्यासाठी निमका ही संस्था कार्यरत आहे असे म्हणाले, ‌निमका संस्थेचा उद्देश ‌किशोरवयीन मूला मुलींची आर्थिक समज वाढावी, ‌मुले मनी स्मार्ट व्हावित, ‌जगाच्या आर्थिक स्पर्धेत बरोबरिला जाण्यास प्रत्यक्ष सहभाग़ासाठी प्रवृत्त करणे. ‌या प्रशिक्षण योजनेचा कालावधी दोन महिन्यांच्या असून आठवड्याचे दोन दिवस याचा लाभ घेता येणार आहे, व यासाठी शुल्क रु.६००० प्रति व्यक्ति असेल.

भारतीय क्यूबिक असोसिएशन व अमनोरा नॉलेज फाउंडेशन तर्फे रूबिक क्यूब चैंपियनशीप चे आयोजन

Thumbnail
Thumbnail

पुणे | आजच्या शिक्षण पद्धतित सर्जनशीलता व तर्कशास्त्र हे अभावानेच जाणवत, भारतीय शिक्षण पद्धती ही वास्तववादी नसून पुस्तकी नावर सर्वाधिक भर आढळून येतो, मुलांच्या बूद्धयांकाचा विचार न करता बाल वयोगटात त्यांच्यावर आपण नको त्या गोष्टी लादतो, विविध खेळ त्यांचे कौशल्य या कड़े तिरकसपणे पाहण्याची दृष्टी विकसित करण्यासाठी इंडियन क्यूब असोसिएशन संचलित पुणे जिल्ह्य रूबिक क्यूब चैम्पियनशिप चे आयोजन दिनांक १९/८/२०१८ रोजी सकाळी, ९:३० वाजता पवार पब्लिक स्कूल येथे केले आहे, पाचशे पेक्षा जास्त स्पर्धक यामध्ये भाग घेतिल अशी अपेक्षा पदाधिकारी अश्विनी वासकर, उर्मिला राणा, श्रेयस भोसले, यांनी व्यक्त केले.

काय आहे रूबिक क्यूब
रूबिक क्यूब हा एक त्रिमितिय कोडे आहे, याचा शोध हंगेरिया देशातील मूर्तिकार वास्तुशास्त्र प्राध्यापक एटनो रूबिक यांनी १९७४ मध्ये लावला.
हा एक प्रकारचा खेळ असून यामुळे मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते व बुद्धिला अधिक चालना मिळते असे या संस्थेचे म्हणणे आहे.

नक्षलवादाचे आव्हान – देवेन्द्र गावंडे

Thumbnail
Thumbnail

पुस्तक परिचय – प्रणव पाटील

          खर तर मला नक्षलवाद रोमँटिक वाटायचा. कारण मी नक्षलवाद समजून घेण्याकरिता राहुल पंडीता यांचं हॅलो बस्तर हे पुस्तक वाचलं होते. त्यात खरं तर नक्षवादी चळवळीच्या सुरुवातीच्या काळातील माहीती दिलेली होती. ज्यात शिकलेले अनेक तरुण-तरुणी विशेषतः बंगालमधील झुंडीच्या झुंडीने नक्षलवादी बनून क्रांतीची स्वप्ने बघत होते पण जसजशी पोलिसीकारवाई सुरु झाली आणि नक्षलवादी तरुण मरु लागले तसतसे हे तरुण तरुणी आदिवांसींना उघड्यावर टाकून शहरात पळून गेले. त्यानंतर चळवळ कट्टर स्थानिकांच्या हातात गेली आणि हळूहळू ती अतिशय हिंसक होऊ लागली.

          प्रस्तुत पुस्तकाचे लेखक देवेन्द्र गावंडे यांनी स्वतः नक्षलग्रस्त भागात फिरुन खऱ्या खोट्या गोष्टी लोकांसमोर आणल्याआहेत. गर्द झाडीचा पडदा पांघरून उग्र गटविधी घडवणाऱ्या लाल फौजीची सत्यकथा देवेंद्र गावंडे यांनी रेखाटली आहे. नक्षलवादी चळवळीचे सचित्र वास्तव अगदी जस आहे तस मांडणारे हे पुस्तक आहे. २००४ साली नक्षलवादी म्होरक्या आझाद याने आबुजमाड डोंगरवर या वेगवेगळ्या नक्षली गटांना एकत्र करुन “भारतीय कम्युनिस्ट पार्टी – माओवादी” या झेंड्याखाली एकत्र रचना केली. दंडकारण्याचे वेगवेगळे विभाग पाडून नक्षल्यांचे दलम तैनात केले. खरं तर नक्षलवादी अशा घनदाट अरण्यात जागतात कसे? त्यांचे उत्पन्नाचे स्रोत कोणते यावर या पुस्तकात सविस्तर शोधा घेत माहीती मांडली आली आहे. सरकारतर्फे आदिवांसींना मिळणारे निम्मे धान्य हे नक्षलींना द्यावे लागते.तंदूपत्ता ठेकेदारांकडून मिळणारे हप्ते (हा सरा हिशोब काही कोटींच्या घरात आहे) हे पैसे चळवळीसाठी कशा प्रकारे वापरले जातता? शहरातील समर्थकांना कशा प्रकारे ते पुरवले जातात याचा लेखाजोखाच या पुस्तकात मांडला आहे.

           आपण अनेक वेळा वाचतो की पोलिस आदिवासींचा कसा गैरफायदा घेतात अनेकदा बलात्कारही करताता पण नक्षलीतर याच्या एक पाऊल पुढेच आहेत, चळवळीतील स्त्रीला काही वेळा भयानक परिस्थितीतून कसं जावं लागतं. पोलिसांचा खबरी असल्याच्या नुसत्या संशयामुळे कशा प्रकारे नक्षली आदिवासींचे अर्धवट गळे कापून तडफडवून मारतात. नक्षलींना खरं तर आदिवासींचा विकास नकोच आहे कारण त्यांचा विकास झाला तर नक्षली चळवळीची हवाच निघून जाईल म्हणून पक्के रस्ते, लाईट, नदीवरचे पूल, शाळा यांची कामे नक्षली बंद पाडतात…पण या नक्षलवाद्यांचे ऐकीकडे आश्चर्यच वाटतं इतक्या घनदाट जंगलातही ते रोज बीबीसी वरच्या जागतिक बातम्या ऐकतात तसेच तरुणांसाठी चालूघडामोडींचे बौध्दिक घेतले जाते. सैन्यालाही गुंगारा देत हे नक्षली अनेक दिवस उपाशी जंगलभर फिरत असतात आणि आपली यंत्रणा कार्यन्वित ठेवतात. या पुस्तकामुळे प्रथमच महाराष्ट्र प्रांताचा नक्षलवादी म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे आणि सगळ्या नक्षलींचा सेनापती गणपती हे दोघे कसे दिसतात हे पहायला मिळाले.

या नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव पूर्वी तेलंगना प्रांतात होता परंतु आन्ध्र प्रदेश सरकारने ग्राऊंड हंट मोहीम आखल्या नंतर तिथे शेकडो नक्षली मारले गेले आणि त्यातील मुख्य नक्षली नेते हे छत्तीसगढ, झारखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील समायिक असणाऱ्या दंडकारण्यात येऊन राहीले. त्यामुळे हा प्रदेश चळवळीचा केन्द्रक बनून राहीला आहे. आबूजमाड डोंगर त्यांची राजधानी आहे.जिथून गणपती हा नक्षली म्होरक्या सगळा कारभार पाहतो. आजही या चळवळीवर तेलगू नक्षलवाद्यांचा वरचष्मा आहे कारण यातील अनेक जण तेलंगणा प्रांतातील आहेत. म्हणूनच नक्षलींना आदिवासी आण्णा म्हणतात.

या पुस्तकातील सर्वांत भयानक वाचलेली गोष्ट ही पोलिस आणि सी.आर.पी.एफ च्या जवानांची आहे. सतत तणावग्रस्त भागात राहून अनेकांना वेड लागले. काहींनी या वेडापायी आत्महत्या केल्या तर काहीजण एकमेकांवर गोळ्या चालवल्या….अनेक जण रस्त्यावर वेड्यासारखं काहीतरी लिहीत बसतात तिथेच ओरडून रडतात अशा परिस्थितीत पोलिस आणि जवान तेथे गस्त घालत राहतात. आज दंडकारण्यात पोलिस स्टेशन हे किल्लेच झाले आहेत अशा प्रकारे असुरक्षितता तिथे गडद आहे. तसेच सरकारचा आदिवासींना हत्यारे देऊन सलवा जूडूमचा यशस्वी झालेला प्रयत्न पण सरकारनेच तो प्रयत्न बंद करुन हजारो आदिवासींना विस्थापित होण्यास कसे भाग पाडले याचा ठोकटाळा पुस्तक देते. तसेच एकाच घरातील दोन भावांपैकी एकजण नक्षलवादी आणि एक जण पोलिसात असतो अशीही उदाहरणे समोर येतात. नक्षलवादी चळवळ ही खरीतर एका उद्देशाने तयार झाली होती आणि आज ती स्वतः चं साम्राज्य टिकवण्यासाठीच कशी झगडतीये आणि यात कशाप्रकारे हजारो आदिवांसीचा बळी जातो.हे सध्याचे या चळवळीचे चित्र आहे. हे पुस्तक वाचल्या नंतर मी देवेन्द्र गावंडेनां नागपूरला फोन करुन त्यांनी या नक्षलवादी चळवळी बद्दलचे माझे डोळे उघडल्या बद्दल आभार मानले.

        तरीही नक्षलवाद्यांची दलम रचना,सांस्कृतिक नाट्य मंचाचे गावोगावी भरणारे जलसे,त्यात स्वतः ते तरुण तरुणी गाण्यातून सरकारवर टिका करुन नक्षल चळवळीत भरती होण्याचं आमंत्रण देतात. जनताआदालत यात सर्वांना समोर आरोपीची चौकशी होऊन शिक्षा दिली जाते. या विषयी नक्कीच अजूनही कूतूहल वाटते. या नक्षलवादी चळवळीत आज नवे तरुण भरती होत नाही.ही त्यांच्या समोरची प्रमुख काळजी आहे. तरी शहरीभागातील अनेक तरुण या चळवळीत सहभागी आहेत ही धोकादायकच गोष्ट आहे.यासाठी नक्षलवादी धूर्तपणे दलित कार्ड वापरताना दिसतात. परंतु त्यांनी केलेल्या सर्वांतधिक हत्या या दलितांच्याच आहेत हेही जगासमोर यायला हवं. भारतीय लोकशाहीचा प्राण असणारी निवडणूकही नक्षली या भागात होऊन देत नाही आणि तरीही कोणी या निवडणूकीत उभं राहीलं तर त्याला ठार केलं जातं. भारतीया समोर नक्षलवाद हा मोठा प्रश्न असला तरी शासनाला तो प्रश्न हताळणं अद्यापही जमलेलं नाही. कारण त्यात आदिवासी मागास राहण्यामागे जसा नक्षलींचा फायदा आहे तसाच आणखी हितसंबंधी गटांचाही त्यात फायदा आहे. त्यामुळे ज्यांच्यासाठी हा लढा उभारला होता ते आदिवासी मात्र या जंगलातून हळूहळू हद्दपार होताना दिसत आहेत.

पुस्तकाचे नाव – नक्षलवादाचे आव्हान
लेखक – देवेंन्द्र गावंडे
साधना प्रकाशन, पुणे
250 रु मूल्य

प्रणव पाटील

फूलं आणि काटे

Thumbnail
Thumbnail
प्रणव पाटील

रोज दुपारी मी औंधच्या ब्रेमन चौकात सिग्नलसाठी थांबतो. तेव्हा रोज एक चित्र हमखास पाहतो त म्हणजे सिग्नलची गरीब मुलं हातात गुलाबांचा गुच्छ घेऊन उभे असतात. “फक्त दहा रुपये, दहा रुपये” करत सिग्नल चालू होईल या भितीने गाड्यांच्या मधल्या बेचक्यातून सरसर पळताना दिसतात. या रोज दिसणाऱ्या चित्रामुळे मी अनेक वेळा अस्वस्थ व्हायचो पण आता मात्र मला काहीही वाटत नाही. मी एका पांढरपेशा आणि कार्ल मार्क्सच्या दृष्टिकोनातून बुर्झव्वा गटातील असल्यामुळे या सर्वात खालच्या, कष्टकरी, शेतकरी, मजूर ,कारागीर यांच्या घामावरचा फायदा घेणारा वर्गातून असल्यामुळे मला आशा गरिबांचं चित्र समोर असूनही त्या बाबतीत काहीही करु वाटत नाही. कारण मला त्यात माझा फायदा दिसत नाही. मला त्यात माझं काही कर्तव्य आहे असंही वाटत नाही. सरकार आशा गोष्टींसाठी काय ते काम करेल ही त्यामागची भावना असते.

प्राचीन काळात भले भारतात सोन्याचा धूर निघाला असेल पण तेवढिच गावकुसा बाहेर असणारी अमानवी अस्पृश्य प्रथा असणारी काजळी ही त्या इतिहासात पानोपानी पसरलेली आहे. मला काय या चकचकीत आणि गचाळ शहरातील रस्त्यावर फिरणारे दरिद्री, पुलाखाली राहणारे भटके, नदीपात्रात झोपडपट्टीत राहणारे दलित, मुस्लिम माझे भाऊ बंध वाटतात का? सध्या तरी मुळीच नाही. असं का होतयं. धावपळीच्या जगात आपल्या वेगाला जुळवून न घेऊ शकणारे मागे पडलेले वेगळे झालेले दिसतात. मला अजून आठवतं मी आशा वस्तींमधे गेलो, तर मला नवे मोबाईल, TV असे अधुनिक बाज असलेला मध्ययुगीन समाज दिसतो. जो अजूनही कुठेतरी हळूवारपणे आपल्या जून्या कोषातून बाहेर पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे असाही समाज, मित्र मैत्रिणी आहेत ज्यांचा वावर भारतात असला तरी मनाने ते अमेरिकेत असतात. तसाचा त्यांचा पोषाख,विचार,आणि वागणं. आजही कुठेतरी इंडीया च्या खूप मागे भारत आहे. जो भारत रोज डोळ्यांना दिसतो पण मनात मात्र जाणूनबुजून इंडीया चं फक्त दिसेल अशी व्यवस्था सर्वत्र आहे.

खरंतर अर्थव्यवस्थेतील अतिशय कटू सत्य जे कार्लमार्क्स सांगतो ते म्हणजे अतिउच्च श्रीमंतांचे पाय हजारो हातांवर उभे असतात. एका पातळी नंतर पैसा पैशाला खेचतो. काय भारतात एक दिवस या दोन्ही चित्रांची कल्पना शक्य आहे का? गरीब आजही त्या परिस्थितीतच का आहे? श्रीमंत अजून का श्रीमंत होत आहेत? परवा आपल्या देशाने जगाच्या अर्थ व्यवस्थेमधे ६व्या स्थानावरुन फ्रांन्सला मागे टाकत ५ वे स्थान गाठलं म्हणून काय आनंद झाला !!! पण काय आपण खरचं सर्वसमावेशक प्रगती केली आहे काय? युरोपीयन वृत्तपत्रांनी या गोष्टींची खिल्ली उडवली आणि सांगितलं की फ्रान्स मधे प्रति व्यक्ती उत्पन्न ३७,५००डॉलर आहे तर भारतात तेच प्रति व्यक्ती उत्पन्न फक्त १,७00 डॉलर आहे .मग तरीही भारत यात पुढे कसा? कोणत्या ठराविक समुहाचे उत्पन्न सतत वाढत आहे? काय ३% लोकांकडे आपल्या देशाची ७०% संपत्ती आहे ?
या ३% लोकांच्या हातात सत्ता, मिडीया, शिक्षणसंस्था, मनोरंजनाची साधने एकवटलेली आहेत. त्यामुळे नकळत माझ्या देशाच्या उत्थाना करिता असणाऱ्या जाणिवा कापल्या गेल्या आहेत ?
काय आपण फुलांसाठी कुण्याच्या तरी हातात काटे दिले आहेत का? आज तरी मला स्वतः हून या लोकांसाठी काहीही करावं वाटत नाही कारण नकळत माझं आणि पर्यायाने माझ्याकडून कुणाचं तरी आर्थिक शोषण होत आहे.ही साखळी सगळ्या भोवाती जेवढी घट्ट असेल तो पर्यंत मला काटे असूनही फक्त टवटवीत,लाल फुलंच दिसतील.

प्रणव पाटील

9850903005

देऊळ – मार्मिक सत्य मांडणारा चित्रपट   

Thumbnail ८
Thumbnail ८

 अमित येवले 

 जेव्हा पैसा हेच सर्वस्व बनते तेव्हा नैतिकता कुठतरी मागे पडते, माणसाची स्वार्थी हाव ही जन्म घेते मग कोण बरोबर आणि कोण चूक हे माणुस विसरतो

           काही सिनेमे हे वेगळी भूमिका मांडणारे असतात तर काही सिनेमे समाजाला आरसा दाखवणारे असतात. ‘देऊळ ‘ हा चित्रपट याच प्रकारात मोडणारा आहे. सध्यस्थितीतले एकदम मार्मिक सत्य यामध्ये दिग्दर्शकाने योग्यपणे मांडले आहे. चित्रपटाची संपूर्ण मांडणी ही एका गावातील वास्तव दृश्यांवर दाखवण्यात आली आहे. की जे गाव काही तरी सुधारणा करू पाहत आहे, पण त्यांना हे विकासाचे गणित तयार करतांना पायाभूत सुविधांपेक्षा काही तरुणांना या ‘देऊळ’ ची संकल्पना ठीक वाटते आणि मग पुढील सर्व काही या देऊळ च्या भोवती विकास, राजकारण, रोजंदारी, झुंडशाही कशी निर्माण होते हे दाखवण्याच्या योग्य प्रयत्न केला आहे. आणि या सर्व जोडीला नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी आणि नसिरुद्दीन शहा यांनी प्रभावी कामगिरी करुन या चित्रपटाला एका उंचीवर नेऊन सोडले आहे.

          सुरवातीला गिरीश कुलकर्णी (किश्या) हा त्याची करडी नावाची गाय शोधत असतो, ती त्याला बऱ्याच वेळेपासुन सापडत नव्हती, शेवटी एका टेकडीवर त्याला ती सापडते आणि मग तेथून हा सीनेमा ‘टर्न’ घेतो. किश्याला स्वप्नात औदूंबराच्या झाडामध्ये दत्त दिसतो, आणि नंतर सकाळी तेथे एक सुतार त्याच्या एका सवंगडयाला मोबाइल वरुन मापे सांगतांना त्या झाडावर खानाखुणा करतो आणि मग तेथे गावातील लोकांना दत्ताचा ‘त्रिमूर्ती’ आकार दिसतो. गावातील युवा राजकारणी आप्पा, महासंग्रामचा पत्रकार व त्यांचे एक दोघे बेकार मित्र याचा फायदा घेऊन दत्त अवतरल्याची बातमी छापतात. यामुळे आजुबाजुला चर्चा रंगल्यामुळे तेथील ग्रामसभा मंदिर बांधण्याचा निर्णय घेते. यामध्ये भाऊ (नाना पाटेकर) यांच्या विरोध असतांना देखील त्यांच्या निर्णय कसा पलटतो हे पहाणे गंमतीशीर वाटते.या सर्व प्रकारामुळे नाना कुलकर्ण्यांचे (दिलीप प्रभावळकर) ग्रामीण रुग्णालयाचे अभ्यासपूर्ण असे मॉडेल बाजूला पडते. त्यामुळे ते गाव सोडून बंगलौर येथे जाण्याचा निर्णय घेतात.

              मग दत्त मंदिर उभे करण्यासाठी पूर्ण गांव कामाला लागते. शाळेतील शिक्षक मुलांना घरूण देणगी आणायला भाग पाडतात, मुलांना इतरांच्या मोबाईल वर दताच्या संर्दभात मेसेज करायला लावतात. पूर्ण गांव दत्तमय होऊन जाते, दत्तमंदिराबाहेर स्टॉल लावण्यासाठी बोली सुरु होतात. प्रत्येक जण या मध्ये भाग घेताना दिसतो आणि यामध्ये आपला आर्थिक विकास कसा होईल ते पहात असतो. कोणी चारचाकी गाडीवर बळजबरीने दत्ताचे स्टिकर चिपकवते आणि पैसे घेते तर देवदर्शनाची माहिती दिली म्हणून माहिती सांगीतल्याचे पैसे घेतो.

                चमत्कारासाठी साधू आणून बसविला जातो, करडी मातेचे मंदिर बांधुन तिला चारा पैसे घेऊन दिला जातो.हे असे सगळे साक्षात्काराचे, चमत्काराचे मार्केटिंग दत्ताच्या नावाखाली खपने चालु होते. देवभाव कमी आणि व्यवहारी भाव जास्त प्रकट होतो. काही काही विबत्स चाली वर दत्ताची गाणी रचली जातात आणि त्याची मोठ्या प्रमाणात कैसेट च्या रुपात विक्री होते.

               जेव्हा पैसा हेच सर्वस्व बनते तेव्हा नैतिकता कुठतरी मागे पडते, माणसाची स्वार्थी हाव ही जन्म घेते मग कोण बरोबर आणि कोण चूक हे माणुस विसरतो. येथे पण हेच दाखवण्यात आले आहे. ज्याने दत्त प्रकटले हे सांगितले…व जिच्यामुळे दत्तदर्शन घडले, यांचा विसर येथे पडलेला दिसतो. करडी गायीच्या पायाला जखम झाली असते, पण तिच्या कडे दुर्लक्ष केले जाते, आणि किश्याला या मंदिरात मंत्री आल्यावर बाहेर अडवून मारहाण करण्यात येते.ही स्वतःची झालेली कोंडी पाहून किशा अस्वस्थ होतो. त्याला दरोडेखोर (नसरूदीन शहा) याच्या रुपात साक्षात्कार होतो.मग तो देवाची मूळ मूर्तीच चोरून नदीत विसर्जित करतो. पण यामधुन साध्य काहीच होत नाही लोकांच्या धार्मिकतेच्या भावनांवर येथील राजकारणी लगेच वाजत गाजत नवी दत्त मूर्तीची स्थापना मंदिरात करतात. यामध्येच चित्रपटाचा शेवट करण्यात आला आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकाला एक सामाजिक दर्शन घडत जाते. नानांचे विचार, त्यांचा अभ्यास, त्यांची समाजाप्रती असलेली जाणीव हे वेगळे पणाने या मध्ये भासते. गिरीश कुलकर्णी यांचा अभिनय हा खूप पाहण्यासारखा आहे. सरपंचाची सासू म्हणून खूप मनोरंजक अशी भूमिका उषा नाडकर्णी यांनी केली आहे.

दिग्दर्शन
उमेश विनायक कुळकर्णी

निर्मिती
देविशा फिल्म्स (अभिजीत घोलप)

कथा
गिरीश कुलकर्णी

पटकथा
गिरीश कुलकर्णी

प्रमुख कलाकार
गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुळकर्णी, मोहन आगाशे, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, हॄषिकेश जोशी, श्रीकांत यादव, अतिषा नाईक, नासिरुद्दीन शाह

अमित येवले