पुणे | नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आज अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष पूजा करण्यात आली. अंगारकी निमित्त हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. मंदिर परिसर लक्ष लक्ष फुलांनी नंदनवनात बदलून गेला होता.
ब्रँडेड गणपती, व्हीआयपी गणपती अशी प्रसिद्धी असलेला पुण्याचा दगडूशेठ गणपती पुण्याची शान मानला जातो. शहराच्या मध्यमागी असणारे गणपतीचे मंदिर गणेश भक्तांना आकर्षून घेते. या अंगारकी चतुर्थीला फुलांची खास सजावट करण्यात आली होती. घागरीतून पाणी पडते आहे असे दृश्य फुलांच्या साहाय्याने मंदिराच्या शिखरावरती साकारण्यात आले होते.
पहाटेची काकड आरती होऊन मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भल्या सकाळी सहा वाजता दर्शन रांग जोगेश्वरी मंदिराला वळसा घालून नगरकर तालीम चौकापर्यंत विस्तारली होती. दुपारी बाराच्या आरतीला तर भक्तांनी मंदिरा समोरील रस्ता व्यापून टाकला होता. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने अंगारकी चतुर्थीच्या उपवासाचे सार्थक भक्तांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळत होते.
दगडूशेठ मंदिराला अंगारकी चतुर्थी निमित्त आकर्षक सजावट
नांगरे पाटलांनी केले भावनिक आवाहन अन हिंसक जमाव झाला स्तब्ध
चाकण | मराठा आंदोलकांकडून काल दिनांक ३० जुलै रोजी पुणे जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. चाकण परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याठिकाणी पोलिसांच्या गाड्यांची अक्षरशः राख करण्यात आली. अजय भापकर नावाचे पोलीस शिपाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर दोनच तासात ते कोम्यात गेले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने कोल्हापुर परिक्षेत्राचे म्हानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चाकण मध्ये रिक्षांने फिरुन आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करू लागले. व्यवस्थेची वाताहत पाहून नांगरे पाटील ही भावनिक झाले आणि आंदोलकांना म्हणाले मोठा भाऊ समजून माझं ऐका! असे म्हणताच आंदोलक शांत झाले आणि शहरात शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.
चाकण औद्योगिक वसाहतीचा पट्टा असल्याने तेथील लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. औद्योगिक वसाहत पट्टा असल्याने या भागात शांतता प्रस्तापित होणे अत्यंत आवश्यक आहे. चाकण परिसरात पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अतिरिक्त कुमक मागवून शांतता राखण्यास मोठी कसरत केली. आज दिवस भरात काही अपवाद वगळता शांततेत सर्व नागरी कारभार सुरळीत पार पडले.
आंदोलनामुळे महाराष्ट्र बदनाम : राणे
मुंबई | आरक्षणाच्या हिंसक स्वरूपाने महाराष्ट्र बदनाम होत चालला आहे असे मत नारायण राणे यांनी मांडले आहे. तसेच सत्तेत असताना पवारांनी आरक्षण का दिले नाही असा सवाल ही राणें यांनी केला आहे. शिवसेना कधीच आरक्षणाच्या बाजूने नव्हती, मराठा जनाधार आपल्या बाजूने रहावा ही सेनेची मनीषा आहे असे म्हणत राणे यांनी सेनेवर यावेळी तोफ डागली आहे. आंदोलमामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे असे म्हणुन आंदोलन थांबवण्याचे आवाहन राणें यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.
आरक्षणासाठी घटनादुरुस्तीची गरज नाही.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांनी घटनादुरुस्ती करण्याचे आवाहन केले असले तरीही राणेंनी मात्र घटनादुरुस्तीची गरज नसल्याच म्हणनं आहे. तो राज्यापुरता मर्यादित विषय असल्याचही त्यांनी स्पष्ठ केल.
आंदोलकांच्या मारहाणीत तो पोलीस गेला कोमात
पुणे | मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान चाकण पोलिस स्टेशनची तोड़फोड़ करण्यात आली होती. त्यावेळी चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अजय भापकर यांना आंदोलनकर्त्यांनी जबर मारहाण केली होती. त्यांची प्रकृति चिंताजनक असल्याची माहिती येत आहे. तसेच त्यांना काल दवाखान्यात दाखल केल्यापासून दोन तासात ते कोमात गेले आहेत.
अजय भापकरांना पाहण्यासाठी कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील रुबी हॉल क्लिनीकला भेट देणार आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी समाजाच्या सर्व स्तरातून पुढे येत आहे. राज्याचे जनजीवन विस्कळीत होत चालले असून सामान्य लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.
मुंबईकरांनो समुद्र किनाऱ्यावर जाताय सावधान!
मुंबई | मुंबईच्या किनाऱ्यावर ब्लू बॉटल (जेली फिश ) ची इंट्री झाली आहे. सध्या हा मासा अरबी समुद्रात धुमाकुळ घालतो आहे. ब्लू बॉटल नामक जलचर प्राणी पैसिफिक, अटलांटिक, अरबी समुद्रात मुंबईच्या गिरगाव, जुहू चौपाटीवर दहशत माजवत आहे. हा मासा पाण्याच्या उथळ भागांत राहत असल्याने तो सहज किनाऱ्यावर येतो.
ब्लू बॉटल हा प्राणी मनुष्य जमातीसाठी घातक ठरू शकतो. अनेक सागरतज्ञांनी नागरिकांना धोक्याचा इशारा दिला असून समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. ब्लू बॉटल उभयलिंगि प्राणी असल्याने याला जोड़ीदाराची आवश्यकता नाही. ब्लू बॉटल हा जरी दिसायला सुंदर असला तरी तो मुंबईकरांची झोप उडवू शकतो.
मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये एका तरुणाची आत्महत्या
बीड | मराठ्यांना आरक्षण मिळावे या कारणासाठी बीड मध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. अभिजित देशमुख असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे वय ३५ आहे. विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला हा तरुण असून नोकरी नमिळाल्याने त्रस्त होता. त्याने घराजवळ झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्याने जीव देताना एक चिठ्ठी लिहली आहे. त्याने मराठ्याना आरक्षण मिळावे म्हणून आपण आपला जीव देत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. दरम्यान या चिठ्ठीची पोलिस चौकशी केली जाईल असे संबंधित तपास अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मराठा आरक्षणासाठी झालेली ही सातवी आत्महत्या असून सरकारने आरक्षणाच्या प्रक्रियेचा ठोस कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. मराठा आंदोलकांनी आरक्षण प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्याचा २४ तासाचा ऑल्टीमेंटम सरकारला दिला आहे.
आसाम एनआरसी मुद्यावर संसदेत मंथन, कॉग्रेसने दिली स्थगन प्रस्तावाची नोटीस
नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. कॉग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य दोन सदस्यांनी आसाम एनआरसी मुद्यावर स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच तृणमूल कॉग्रेसने संसदीय काम काजाच्या नियम २६७ नुसार राज्यसभेत चर्चेची नोटीस दिली आहे. कालच्या दिवशी याच मुद्यावर राज्यसभा दिवस भरासाठी तहकूब करण्यात आली होती.
लोकसभेत प्रश्नउत्तरच्या तासातच सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले होते. बीएसएफ आणि असाम राइफल्स तुकड्या रोहिंग्यांना सीमेवर अटकाव करण्यासाठी तैनात करण्यात आल्या असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले.
पूर्वोत्तर सीमेकडून रोहिंग्याचे अर्कमन रोखण्यात सरकारने कडक पावले उचलली असून भारतात घुसलेल्या रोहिंग्याना मॅनमारमध्ये परत पसठवण्यासाठी तेथील सरकार बरोबर बोलणी चालू असल्याची माहिती किरण रिजिजू यांनी सदनाला दिली.
गुण वाढले, पण गुणवत्तेचं काय ? – राजेंन्द्र मोहिते
नमस्कार, मी राजेंद्र मोहिते, १२ वी अकाउंटन्सी चे क्लासेस घेतो. तेही ग्रामीण भागात. पोरं प्राज्ञ भाषेत गावंढळ म्हणावी अशीच. पुढच्या वर्षी क्लासचा रौप्यमहोत्सव होईल. माझे विद्यार्थी अनेक उच्च पदांवर काम करताहेत. दोन, तीन सीए आहेत, काही मोठमोठ्या कंपन्यांत आहेत, उद्योगांत वेगवेगळ्या क्षेत्रांत आहेत, देशाच्या सीमेवर आणि सीमेपलीकडेही आहेत. मी पोरांवर (पोरं म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी) संस्कार करण्याचा माझ्या वकुबाप्रमाणे प्रयत्न केला, तो थोडाबहुत का होईना, पण यशस्वी झाल्याचं समाधान आज, मला मिळतंय खरं, पण पुढे मिळेल अशी गॅरंटी वाटत नाही.
पूर्वी साधी, फाटक्या फाटक्या पँटांतील मुलांची आणि सध्या सलवार कमीजच्या मुला-मुलींची जागा आता हाफ मॅनेला वुईथ जीन्स (दोघांनीही) घेतलीय. पूर्वी चालत किंवा सायकलवरून येणारी ही पोरं आता गाड्या ‘उडवत’ कलासवर येतात. (पूर्वीच्या शिकवणीची जागा आता क्लासनं घेतलीय म्हणा!) पिशव्यांची जागा आता ‘सॅक’ नी घेतलीय, डबा आता ‘टिफिन’झालाय, भाजी भाकरीच्या जाग्यावर आता नूडल्स आहेत. टाईमपास आठ आण्याच्या फुटण्याऐवजी एअरपॅक्ड कुरकुरे आलेत. पण ९ चा पाढा येत नाही, हेही तितकंच खरं. हातात असलेल्या फोनला ‘अँड्रॉईड पीस’ म्हणायचं हे त्यांना कळतं खरं पण त्या दोन्ही शब्दाचं स्पेल्लिंग नीट लिहिता येत नाही त्याला आपण काय म्हणणार, प्रगती की अधोगती?
मी फार जुन्या काळात जात नाही.पण माझे आई वडील दिडकी, पावकी चा पाढा सहज म्हणून दाखवायचे, अर्थात तो त्यांच्याएवढा मला येत नव्हता नव्हता आणि नाहीही. कारण ‘बीजगणित’ नावाचं भूत आमच्या मानगुटीवर कायम बसलेलं असायचं. (a+b) square = means what? उत्तर पुस्तकातील बघून लिहायचो खरा, पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग फक्त ‘डिग्री मिळून नोकरी आणि छोकरी’ साठी होतो, हा शोध खूप उशीरा (!) लागला. तीच गोष्ट भाषेची, संस्कृत बापजन्मात जमलं नाही, पुस्तकातल्या हिंदीपेक्षा सिनेमातली हिंदी जास्त कळायची. आपली वाटायची, अजूनही वाटते. इतिहास आवडायचा खरा पण त्यातल्या सनावळ्या पाठ करता करता गड किल्ले चढण्याइतकी दमछाक व्हायची. त्यातच इंग्रजीचं व्याकरण डोस्क्यावर बसलं पण डोक्यात काही गेलं नाही आणि भूमितीच्या बाबतीत तर वाटोळंच! पण आज बाजारात गेलं की कोणती वस्तू कितीला घ्यायची हे ग्यान माझ्या आईबापाने दिलं. आज हे ‘knowledge’ माझी मुलं त्यांच्या मम्मी पप्पांकडून घेऊ शकतात का?
मूळ प्रश्न असा आहे की ती बाजारात जातात का? ते तर बझारमध्ये जातात! तिथं सगळंच लेबल्ड (आणि या जंजाळात मी पप्पा आणि बायको मम्मी ) कधी झालो हे कळलंच नाही. माझा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकतो. मोठ्या दोन्ही मुली मराठी माध्यमातून शिकल्या. तर इंग्लीश मिडीयमचा मुलगा ज्यावेळी ९ वी चा निकाल लागून १० वीत गेला (दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट) त्यावेळी कराडातील कलासवाल्यांचे फोन सुरू झाले.
अशाच एका ‘सरांनी’ मला फोन केला..
क्लासचे सर – अश्वमेध चे पप्पा का?
मी – होय, आपण कोण?
क्लासचे सर – मी xxxx कलासमधून बोलतोय ,xxxx सर
मी – हां बोला.
क्लासचे सर – अहो तुमचा मुलगा खुप छान आहे, तो दहावीत जाणार आहे, नववीला चांगले मार्क्स आहेत. अबाव 90%. त्याला थोडं मार्गदर्शन करायचं होतं.
मी – बरं. काय मार्गदर्शन करायचं आहे ?
क्लासचे सर – आम्ही कौन्सिलिंग घेतो, तुमचा मुलगा पुढे स्टार होईल, आमच्या fees नाममात्र आहेत. एकदा पाठवून तरी बघा.
मी – सर धन्यवाद. फक्त मला एक सांगा तुम्ही बाजारात गेला आणि कोबीचा दर ५ रूपये किलो असेल तर तीन पावशेरचे किती द्याल तुम्ही?
क्लासचे सर – अहो हा काय प्रश्न आहे?
मी – मग सांगा ना?
क्लासचे सर – थांबा. (please wait)… (फोन कट होतो)
आजपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही.
मग मला प्रकर्षाने प्रश्न पडतो की माझ्या पोरांची किंमत काय? लेबल्ड बझारची की रोकड्या बाजारची?
पोरगं बाजारात जायला पाहिजे…दुनियेच्या ओपन मार्केटमध्ये. तरच त्याला त्याची खरी किंमत (म्हणजे त्यानं स्वतःची लावलेली, त्याला लागलेली आणि लादलेली नव्हे!) कळेल. असं वाटायला लागलं. आणि तेच खरं आहे.
राजेंन्द्र मोहीते
(लेखक कराड तालुक्यामधील रेठरे गावात अकांउंटचे क्लासेस घेतात)
महिलांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो – सर्वोच्च न्यायालय
दिल्ली | दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातील खतना या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. खतना प्रथेविरोधातील याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने ‘महिलांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो’ असे म्हणुन खडे बोल सुनावले आहेत. खतना प्रथेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून सदर प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
खतना प्रथेविरोधात बोहरा समाजातील महिला काही बोलण्यास बहुदा तयार होत नाहीत. विषय संवेदनशील आणि नाजूक असल्याने आजवर कोणीही यावर विशेष आवाज उठवला नव्हता. परंतु आता याच समाजातील महिलांनी एकत्र येऊन खतना प्रथेविरोधार आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. आरिफा जोहरी नावाची एक तरुण पत्रकार याचे नेतृत्व करत असून आपल्या मोहीमेला त्यांनी सहीयो (मैत्रिण) असे नाव दिले आहे.
काय आहे खतना प्रथा ?
मुस्लिम समाजात ज्याप्रमाणे विशिष्ट वयात मुलांच्या गुप्तांगाचा भाग कापला जातो त्याचप्रमाणे दाऊदी बोहरा समाजात विशिष्ट वयात महिलांच्या गुप्तांगाचा भाग कापण्याची प्रथा आहे. या अनिष्ट प्रथेलाच खतना असे म्हटले जाते. साधारण सात – आठ वय झाले की दाऊदी बोहरा समाजात मुलींच्या जननांग कापले जाते. यावेळी त्या महिलांना प्रचंड त्रास होतो. काही वेळा काहीजणी यातून आजारी ही पडतात.
आसामच्या एनआरसी मुद्द्यावर राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली | आसाम राज्यातील गुसखोरी रोखण्यासाठी स्थापित केलेल्या राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) या संस्थेचा दुसरा आणि अंतिम मसुदा आज प्रकाशित होणार होता. या मुद्द्यावर कॉग्रेस, सपा, तृणमूल कॉग्रेसच्या सदस्यांनी तुफान गदारोळ केल्याने राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना सदन भरण्यापूर्वी काही सदस्य भेटले आणि सदनात आसामच्या एनआरसी मुद्द्यावर चर्चा घडवण्याची आणि सरकारने आपली बाजू मांडण्याची विनंती केली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच कॉग्रेस, सपा, तृणमूल कॉग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ सुरू केला. अध्यक्ष नायडू यांनी सदनात आसामच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी ही माझी ही इच्छा आहे असे सांगितले तसेच सदनात गृह मंत्री उपस्थित आहेत. मी त्यांना या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यायला सांगतो तरी देखील या तीन पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ थांबवला नाही. चार वेळा तहकूबी देऊन सुध्दा गदारोळ न थांबल्याने राज्यसभा २ वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.










