लखनौ : उत्तर प्रदेशातील उनाव या ठिकाणी घडलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी सी.बी.आयने आरोपपत्र दाखल केले आहे. भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या भावा सहित अन्य चार जणांवर बलात्काराचे आरोप ठेवण्यात आले असल्याचे समजत आहे. जयदीप सिंह सेंगर आणि त्याचे साथीदार विनीत मिश्रा उर्फ विनय मिश्रा, बीरेंद्र सिंह उर्फ बऊवा, रामशरण सिंह उर्फ सोनू सिंह, शशि प्रताप सिंह उर्फ सुमन सिंह यांच्या विरोधात सी.बी.आय. ने आरोप पत्र दाखल केले आहे. सदरील खटल्याची सुनावणी लवकरच करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
उनाव बलात्कार प्रकरणाने उत्तर प्रदेश हादरवून सोडले होते. विरोधक भाजप सरकार विरोधात आक्रमक झाले होते. हा खटला सी.बी.आय कडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी जनमानसातून समोर येत होती. अखेर आज आरोपींना अटक झाल्यावर उत्तर प्रदेशातील तणाव थोड्याप्रमाणात निवळला असल्याचे चित्र आहे.
उनाव बलात्कार प्रकरणी भाजपा आमदाराच्या भावा विरुद्ध सी.बी.आयचे आरोपपत्र दाखल
अमेरिकेचे परमाणू निःशस्त्रीकरण धमकी सारखे – उत्तर कोरिया
प्याँगयांग : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात गेले दोन दिवस शांती वार्ता कार्यक्रम सुरु आहे. त्यासंदर्भात उत्तर कोरियाने आज माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. “अमेरिकेचे परमाणू निःशस्त्रीकरणाचे धोरण हे इतर देशांना धमकी देण्यासारखे आहे” असे उत्तर कोरियाने म्हणले आहे. अमेरिकेच्या परमाणू निःशस्त्रीकरणाच्या धोरणाला उत्तर कोरिया कदापि पाठींबा देणार नाही अशी भूमिका उत्तर कोरियाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू
मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर या महिलेचा आज उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. मुलाला शाळेत सोडून घरी परतत असलेल्या अस्मिता काटकर अंधेरी पूल दुर्घटनेत अडकल्या आणि गंभीर जखमी झाल्या होत्या. पाच दिवस त्यांनी मृत्यू शी झुंज दिली परंतु ती झुंज अपयश ठरली. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान अस्मिता काटकर यांच्या कुटूंबियांना रेल्वे प्रशासनाने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
शाळेतून छडी होणार गायब, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचा महत्वाचा निर्णय.
मुंबई : ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे गाणं आता काल बाह्य होणार आहे. कारण शाळेतील छडी आता इतिहास जमा होणार आहे. छडी गायब करण्याचा निर्णय राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने घेतला आहे. छडीची शिक्षा ही मुलांच्या शरीर आणि मनाला इजा पोहचवत असल्याचे आयोगाचे निदान झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.
लहानपणी शिक्षकांची छडी बघून मुलांच्या मनात धस्स व्हायचं. मुलांच्या मध्ये शिस्त दिसून यावी आणि मुलांनी अभ्यास करावा यासाठी छडीचा धाक असायचा परंतु ही छडी बाल हक्क आयोगाने गायब केल्याने अभ्यासाच्या शिस्तीसाठी शिक्षकांची कसोटी लागणार आहे.
भामरागडमधील शाळा शिक्षकांच्या प्रतिक्षेत, पंचायत समितीला टाळा ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा
भामरागड : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या अतिदुर्गम भागातील बहुतांश शाळांमधे शिक्षकच नसल्याचे समोर आले आहे. नक्षलवादामुळे नेहमीच चर्चेत असणारा भामरागड तालुका शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत अजूनही उपेक्षीतच असल्याचे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून जूलै महिणा उजाडला तरी येथील शाळा शिक्षक कामावर रुजू होण्याची प्रतिक्षा करत असल्याचे धक्कादाय चित्र आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०१७ – २०१८ मध्ये जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ही बदली प्रक्रिया ‘सगम” आणि “दुर्गम” अशा पद्धतीने करण्यात आल्याने भामरागड़ तालुक्याला त्याचा मोठा फटका बसला आहे. या बदली प्रिक्रियेतून भामरागड़ तालुक्यातून एकुण १૪२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र या १૪२ बदली करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्यात भामरागड तालुक्याला केवळ ६९ शिक्षक भेटले आहेत. या दुर्गम भागातून दुसर्या तालुक्यातील सगम भागात या बदल्या करण्यात आल्याचे समजत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून जुलै महिना उजाडला तरी निम्म्याहून अधिक शिक्षक अजून शाळांमधे रुजूच झाले नसल्याचे चित्र आहे. यामुळे भामरागड़ या अतिदुर्गम तालुक्यातील मुलांचा शैक्षणिक दर्जा कसा सुधारणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. “कोणत्याही समाजाचा विकास हा शिक्षणातुन सुरु होतो. राज्याची आणि राष्ट्राची ताकद किंवा शक्ती हे शिक्षण आहे. शिक्षण सर्वदूर पर्यंत पोहचले पाहिजे म्हणून सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत. असे असतांना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड़ तालुक्यात मात्र शिक्षणाविषयी शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे’ असे मत जुवी गावचे रहिवासी आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य लालसू नोगोटी यांनी व्यक्त केले आहे. भामरागड़ तालुक्यात सर्वात जास्त “माड़िया” या अती असुरक्षित आदिवासी जमातीचे लोक राहत असून त्यांचा विकास शिक्षणाशिवय शक्य नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हणले आहे. “शासन गोर गरीब आदिवासीना त्यांचा विकास व्हावा म्हणून बैलजोड़ी, घरकुल, शेतीचे अवजार, काटेरी तार इत्यादी देत आहे. या सर्वांपेक्षा शिक्षण हे विकासाचे मुलभुत साधन आहे. पोलिस विभागाच्या वतीने तर चप्पल, छत्री, भांडी, कपडे इत्यादी देण्यात येत आहे. आपण जर शिक्षणाविषयी एवढे उदासीन असू तर हे सर्व देऊनही काहीच होणार नाही” असे मत भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी यांनी मांडले आहे. विकासाच्या नावाखाली सरकार भामरागड तालुक्यातील आदिवासींची फसवणूक करत असल्याचा आरोप मडावी यांनी यावेळी केला आहे. “सरकार विकासाचे नाटक करत आहे. खरा विकास करायचा असेल तर शिक्षण व्यवस्था बळकट करायला हवी.” असेही त्यांनी म्हणले आहे.
शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरित भराण्यात यावीत अशी मागणी यावेळी जि.प. सदस्य नोगोटी, पं.स. सदस्य मडावी तसेच गावकर्यांनी केली आहे. शाळेला शिक्षक उपलब्ध न झाल्यास पंचायत समिती कार्यलयासह सर्व शाळाना टाळा ठोकण्यात यईल असा इशारा यावेळी देण्यात आल आहे.
अयोध्या विवाद प्रकरणी १३ जुलैला न्यायालयीन सुनावणी
दिल्ली : अयोध्या विवाद प्रकरणी १३ जुलैला न्यायालयीन सुनावणी होणार आहे. याआधी १७ मे रोजी यापुढील सुनावणी उन्हाळ्याची सुट्टी संपल्या नंतर सुरू होईल असे सुनावणीदरम्यान न्यायालयाने जाहीर केले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एसए नजीर यांच्या न्यायपीठाने १७ मे रोजी हिंदू संघटनांचा युक्तिवाद ऐकला होता. आता १३ जुलै रोजी मुस्लीम पक्षकारांची बाजु एकली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय न्यायपीठासमोर सुन्नी वक्फ बोर्डाच्यावतीने वकील राजीव धवन यांनी शुक्रवारी युक्तिवाद केला. ‘मशिदी मनोरंजनासाठी तयार होत नाहीत तर तेथे हजारों लोक नमाज (प्रार्थना) करून धर्माच्या पालनाचे कर्तव्य करतात’ असे मत धवन यांनी मांडले आहे. ‘हे इतके पुरेसे नाही काय?’ असा सवालही त्यांनी न्यायालयाला केला आहे. अयोध्या प्रकरणात मूळ याचिका सादर करणाऱ्या एम. सिद्दीकी यांचे निधन झाले आहे. त्यांचे कायदेशीर वारस त्यांचे प्रतिनिधीत्व करत असून त्यांचे उत्तराधिकारी एम. इस्माईल फारूकी हे अयोध्या प्रकरणाचा खटला चालवत आहेत.
धक्कादायक, विद्यार्थीनीवर मुख्याध्यापक, शिक्षकांनीच केला बलात्कार
पटना : इयत्ता नववीमधे शिकणार्या विद्यार्थीनीवर शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनीच बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार बिहार मधे घडला असल्याचे समोर आले आहे. सारान जिल्ह्यातील एका खाजगी शाळेमधे हा प्रकार घडला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शाळेचे मुख्याध्यापक, काही शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण १८ जणांनी शाळेतील विद्यार्थीनीवर बलात्कार केला असल्याचे समजत आहे. हा प्रकार मागील ७ महिण्यांपासून होत असल्याचा आरोप त्या विद्यार्थीनीने केला आहे. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरच बलात्काराचा आरोप होत असल्याने पालकांमधे संतापजनक वातावरण आहे. बिहार पोलीसांनी सदरील शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि दोन विद्यार्थी यांना बलात्कार प्रकरणी अटक केली आहे.
दुधसंकलनासाठी प्लॅस्टिक कॅन वापरण्यास शासनाचा मज्जाव, ३०९ दुधसंघांना नोटीसा
मुंबई : राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणी अंतर्गत महाराष्टातील ३०९ दूध संघांना राज्यसरकारने नोटिसा पाठवल्या आहेत. दूध संकलनासाठी आता प्लॅस्टिक कॅन वापरण्यास राज्य शासनाने मज्जाव केला आहे. दूध संघात प्लॅस्टिक कॅन वापरताना दिसल्यास त्या दूधसंघावर प्लॅस्टिक बंदीच्या अधिनियमात अंतर्गत कार्यवाही केली जाणार असल्याचे सरकारने पाठवलेल्या नोटीसमधे नमुद करण्यात आले आहे. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयावर प्रशासन सक्तीने वागत असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानात हिंदू महिला निवडणुकीला उभी
कराची : पाकिस्तानमधे सध्या निवडणुकांचा माहोल आहे. सिंध प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच हिंदू महिला उभी राहीली आहे. ३१ वर्षीय सुनीता परमार या थारपरकर जिल्ह्यातील सिंध विधानसभा मतदारसंघ पीएस-56 या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुनीता यांच्या अजेंड्यावर स्त्रियांचा शैक्षणिक स्तर उंचावणे व त्यांना आरोग्य सुविधा पुरवणे अादी मुद्दे आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान मध्ये हिंदू दलित महिला कृष्णा कुमारी कोल्ही यांनी विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक जिंकली होती.
विधान सभेच्या सभागृहात झाला अंधार
नागपूर : आज महाराष्ट्र विधी मंडळात वीज पुरवठा न झाल्याने कामकाज बंद ठेवण्यात आले. विधी मंडळातील कामकाज विरोधकांच्या गदारोळाने नव्हे तर विधी मंडळ परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याने बंद ठेवावे लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारने हट्टाने नागपूरला अधिवेशन घेण्याचे ठरवले खरे परंतु अधिवेशनात सरकरची पुरती नामुश्की झाली आहे. सततच्या वीज खंडित होण्याने सभागृहातील कामकाज तहकूब करण्याचे प्रसंग आज दिवस भरात सतत घडत होते. वास्तविक पाहता ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे असून देखील आज विजेची अशी झालेली वाताहत राज्याला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. मुसळधार पावसामुळे विधान भवनाच्या पायऱ्यांना पाणी लागले असून आमदार निवासातही पाणी शिरले आहे.










