Monday, February 6, 2023

आंबेघरमध्ये दरड कोसळली : घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली; तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर परिसरातील वाडी तसेच गावांमध्ये भूस्तखलनाच्या घटना घडू लागल्या आहेत. पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर येथील काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तर अजूनही तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

- Advertisement -

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या डोंगरलगत आंबेघर हे गाव वसले आहे. या गावाच्या पाठीमागे मोठा डोंगर असल्याने येथे राहणाऱ्या ग्रामस्थाना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री घडलेल्या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे संपूर्ण पाटण तालुका हादरून गेला आहे.

या गावात दरड कोसळण्याची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र, त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासुन बेपत्ता असल्याचे त्यांचा शोध घेण्याचे काम स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत. या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहे.

दरम्यान, पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. येथील परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनाने इतरत्र हलवले आहे. ही घटना ही गुरुवारी सायंकाळी घडली आहे.