हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात सध्या महागाईने उच्चांक गाठला असून दोन वेगळं पोट भरण्याचेही नागरिकांचे वांदे झाले आहेत. अशातच आता पाकिस्तान सरकार बिघडत चाललेल्या आर्थिक संकटाला रोखण्यासाठी धडपडत असताना, अर्थमंत्री इशाक दार यांनी ही सर्व दैवी कृपा मागून चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान हा देश इस्लामच्या नावावर स्थापन झालेला एकमेव देश आहे आणि त्याच्या विकास आणि समृद्धीसाठी अल्लाह सर्वशक्तिमान जबाबदार आहे असं त्यांनी म्हंटल.
इस्लामाबादमध्ये ग्रीन लाइन ट्रेनच्या उद्घाटन समारंभात बोलताना इशाक दार यांनी सांगितले की, इस्लामच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळे नक्कीच आपल्या देशाची प्रगती होईल असा त्यांचा पूर्ण विश्वास आहे. जर अल्लाह पाकिस्तानची निर्मिती करू शकतो, तर तो या देशाचे संरक्षण, विकास आणि समृद्धी देखील करू शकतो. देशाचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली सरकार या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
पाकिस्तानच्या सध्याच्या दुर्दशेला पाच वर्षांपूर्वी सुरू झालेला ‘ड्रामाच जबाबदार आहे, त्यामुळेच देशातील जनता अजूनही त्रस्त आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. परकीय चलनाच्या अभावामुळे पाकिस्तानकडे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी देखील पैसे देण्यासाठी कोणतेही चलन शिल्लक नाही. या संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक संस्थांकडून आर्थिक पॅकेज शोधत आहे.