पालघर प्रतिनिधी । शिवसेना पक्षातून पालघर मतदारसंघात हॅट्रिक साधलेल्या पालघरच्या माजी आमदार व राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जव्हार येथील प्रचारसभेत हा पक्षप्रवेश पार पडला.
सन १९९५, १९९९ आणि २००४ या विधानसभेच्या तीन निवडणुकांमध्ये पालघर मधून विजयी झालेल्या मनीषा निमकर यांचा २००९ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाल्याने पराभव झाला होता. काही वर्षांनंतर त्यांनी बहुजन विकास आघाडी प्रवेश केला. बहुजन विकास आघाडीतर्फे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तसेच २०१६ मध्ये झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्या बहुजन विकास आघाडीकडून बोईसर येथून त्याचप्रमाणे सर्वपक्षीय पाठिंब्यावर पालघर येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या.
मात्र या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी डहाणू मतदारसंघात भाजपाचे काम सुरू केले होते. अखेर त्यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान त्यांच्या या भाजपा प्रवेशामुळे पालघर मध्ये मोठी उलथापालथ मानली जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ‘भाजपा’मध्ये प्रवेश केल्यामुळे बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान निमकर यांचा जो निर्णय असेल त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.