हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईला लागून असणारा…निमशहरी आणि आदिवासी अशा अजब संमिश्रनातून तयार झालेला पालघर लोकसभा मतदारसंघ (Palghar Lok Sabha 2024) …2009 च्या लोकसभा पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या या नव्यानवख्या मतदारसंघात प्रस्थापित पक्षांच्या राजकारणाला टक्कर देण्यासाठी वसई विरार आणि आजूबाजूच्या पट्ट्यात प्रभावी असणाऱ्या बहुजन विकास आघाडी हा पक्ष मैदानात उतरला…चिन्ह होतं शिट्टी… पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस भाजप शिवसेना यांसारख्या पक्षांना पाणी पाजून बहुजन विकास आघाडीने पालघर मध्ये शिट्टी वाजवून आपला पहिला खासदार दिल्लीत पाठवला…यानंतरच्या निवडणुकांचा निकाल जरी बदलत गेला…तरी शिट्टीनं विरोधी उमेदवारांच्या शिट्टी गुल केल्या एवढं मात्र नक्की…राज्यात अपक्ष आणि लहान मोठ्या पक्षांचं अस्तित्व जवळपास संपलेलं असताना पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी हा पक्ष अजूनही इतका प्रभावी का ठरतोय? महायुती मधील शिंदे गट आणि भाजपमध्ये या जागेवरून रस्सीखेच का सुरुय? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर जाणून घेणार आहोत
वसई आणि नालासोपारा हे निम-शहरी विधानसभा मतदारसंघ पालघर मतदारसंघात आहेत. तर, उर्वरित चार मतदारसंघ हे आदिवासीबहुल आहेत. यामध्ये डहाणूमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले आमदार आहेत. तर, विक्रमगडमधून राष्ट्रवादीचे सुनिल भुसरा, पालघरमधून शिवसेना शिंदे गट श्रीनिवास वणगा, बोईसरमधून बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील, नालासोपारातून बविआचे क्षितीज ठाकूर आणि वसईतून बविआचे हिंतेद्र ठाकूर हे आमदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणावर नाही. तर, शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाची ताकद ठाकरे गटाच्या तुलनेत अधिक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये भाजपमुक्त असणाऱ्या मोजक्या जिल्ह्यांमध्ये पालघरचाही समावेश होतो…कारण या मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नाहीये…त्यामुळे पक्षीय बलाबल पाहता निम्म्या मतदारसंघावर म्हणजे तीन आमदार आपल्याकडे असल्याने बहुजन विकास पक्ष पालघर मध्ये बाहुबली ठरतो…
गेल्या तीन दशकांपासून आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांचा बहुजन विकास आघाडीची वसई विरार शहरावर निर्विवाद सत्ता आहे…लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही वसई विरार हा मोठा असल्याने या शहराची जिल्ह्याच्या राजकारणात मोठी भूमिका असते…2009 ला जेव्हा हा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने करिष्मा करून दाखवला…अवघ्या 15 दिवसांपूर्वी बळीराम जाधव यांची उमेदवारी जाहीर करून लोकसभेत दणदणीत विजय मिळवण्याचा विक्रम शिट्टीनं केला होता…
2014 च्याही पालघर लोकसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव तर महायुतीकडून भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्यात प्रमुख लढत झाली होती. या लढतीत भाजपचे चिंतामण वनगा यांचा दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय झाला… पण मोदी लाटेतही शिट्टीने घेतलेल्या मतांनी बहुजन विकास आघाडीवरचं पालघर वासियांचं प्रेम आटलं नसल्याची पोचपावतीच दिली…मात्र खासदार चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या पालघरच्या मतदारसंघावर 2018 साली पोटनिवडणूक झाली…या पोटनिवडणुकीत भाजपाने राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षातून आयात केले व राजेंद्र गावित हे भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणुकीत विजयी झाले…मात्र एकाच वर्षात राजकारणात बऱ्याच उलथापालथी पाहायला मिळाल्या…2019 मध्ये तिकीट वाटपाच्या घमासानात शिवसेना पालघरच्या जागेसाठी अडून बसली…तोडगा काही निघता निघेना.. अखेर शेवटी भाजपने विद्यमान खासदाराला शिवसेनेच्या पदरात टाकून ही जागा शिवसेनेला सोडली…2019 साली झालेली ही लढत अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरली…ही लढत प्रामुख्याने खासदार राजेंद्र गावित विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्या विरोधात झाली.. या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीनं शिट्टीला पाठिंबा दिला होता.. भाजप शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत मूळ भाजपाच्या मात्र शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांचा 23 हजार 404 मतांनी निसटता विजय झाला…
अन अनपेक्षितपणे भाजपचा असणारा हा पारंपारिक मतदारसंघ शिवसेनेकडे शिफ्ट झाला…शिवसेनेच्या बंडात राजेंद्र गावित हे शिंदे गटासोबत राहिल्याने आता आपला हा मतदारसंघ पुन्हा आपल्याला मिळावा यासाठी भाजप हट्ट धरू शकतो…पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेची ताकद असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या देखील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के व खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील पालघर येथे मेळाव्यात विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच धनुष्यबाण चिन्हावर लोकसभा निवडणूक लढतील व जिंकतील असं म्हणून भाजपची कोंडी केलीय… तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांचे दौरे, मेळावे देखील पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे भाजपच्या अंतर्गत देखील खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे कळते. राज्याचे दिवंगत आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सावरा, त्याचबरोबर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार विलास तरे यांची नावं भाजपाकडून लोकसभेसाठी चर्चेत आहेत…
तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीची भाजपशी वाढती जवळीक पाहता महाविकास आघाडी 2019 प्रमाणे उमेदवार न देता शिट्टीला पाठिंबा देण्याची शक्यता यंदा तरी कमी आहे…दुसरीकडे महाविकास आघाडी कडून उद्धव ठाकरेंनी पालघरमधून भारती कामडी याना तिकीट दिले आहे. तर बहुजन विकास आघाडीकडून माजी खासदार बळीराम जाधव त्याचप्रमाणे बोईसरचे आमदार राजेश पाटील ही दोन नावं उमेदवारीसाठी पुढे करण्यात आली आहेत…. त्यामुळे नेहमीच थेट लढत पाहायला मिळणाऱ्या पालघरमध्ये यंदा त्रिशंकू परिस्थिती असणार आहे… 2019 ला अवघ्या काही मतांनी बहुजन विकास आघाडीचा खासदारकीचा चान्स हुकला होता…त्यामुळे 2024 मध्ये काही केल्या पालघरमध्ये शिट्टीचाच आवाज घुमला पाहिजे…यासाठी हितेंद्र ठाकूर आणि त्यांची टीम कामाला लागलीये…सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद या मतदारसंघात जास्त आहे..डहाणूमध्ये पक्षाचा आमदार आहे…2019 ला या पक्षाने शिट्टी ला पाठिंबा दिला होता…मात्र महाविकास आघाडी एक दिलाने लढली तर ही सगळी मते आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी येऊ शकतात…कोकणासह पालघर जिल्ह्यात सध्या नावारूपाला आलेली जिजाऊ संघटनेचं नाव सध्या बरच मोठं झालय. त्यामुळे जिजाऊ संघटना नेमकी कोणाला साथ देते की एकाकी लढते हे ही पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…