पंढरपूर | पुढील महिन्यात येणारी आषाढी एकादशीची परंपरेप्रमाणे शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे विधी व पूजा करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, यासाठी प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व शासनाला पाठविण्यात येणार आहे. आषाढी एकादशीबाबत चर्चा करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची गुरुवारी बैठक झाली. बैठकीच अध्यक्षस्थानी समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर होते. या बैठकीस चार स्थानिक सदस्य उपस्थित होते. इतर सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.
जुलै महिन्यात 20 रोजी होणारी आषाढी एकादशी परंपरेप्रमाणे साजरी करण्यावर एकमत झाले. त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा होईल. त्यासाठी त्यांना अधिकृत निमंत्रण देण्याचा ठराव करण्यात आला. मंदिर समितीची होणारी पाद्यपूजा, शासकीय महापूजा, शासनाने दिलेल्या मुख्य पालख्यांना परवानगी व त्यांची पांडुरंगाबरोबर देव आणि पादुका यांची भेट होण्याबाबत श्री विठ्ठलास 18 संस्थांचे नैवेद्य दाखविण्यात येतात. त्यांना परवानगी देण्याबाबतही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शिवाय आषाढी एकादशी दिवशी खासगीवाल्यांचा रथोत्सव परंपरेप्रमाणे निघतो. त्यास परवानगी देणे, मानाच्या 195 फडकन्यांना दर्शनासाठी परवानगी देणे, पांडुरंगाच्या पादुकांची परंपरेप्रमाणे मिरवणूक निघते त्या मिरवणुकीस परवानगी देणे, महाद्वार काल्यास परवानगी देणे व प्रक्षाळ पूजेला परवानगी मागण्यात आली आहे. या व इतर प्रथा व परंपरेचे जतन करून शासनाने परवानगी द्यावी तसेच महापूजेचा मानाचा वारकरी ठरविणे याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकान्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याबाबत चर्चा झाली. आषाढी यात्रेनिमित्त 12 जुलैपासून श्री विठ्ठलाचा पलंग काढण्यात येणार आहे. त्यानंतर श्री विठ्ठलाचे 24 तास ऑनलाईन पध्दतीने दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.
शासनाच्या नियमांनुसार मानाच्या मालख्या येतील. त्या त्या पध्दतीने त्यांची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी मंदिर समितीची आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्यात कोणतीही कमतरता पडणार नाही, असे समितीचे सहाध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. या बैठकीस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजीराजे शिंदे, शकुंतला नडगिरे, नगराध्यक्षा साधना भोसले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच इतर सदस्य अनलाईन पध्दतीने उपस्थित होते.