हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या ठिकाणी आता विविध पक्ष व सामाजिक संस्थांनकडून मदत केली जात आहे. त्यांच्याप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळी येथे पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. यावेळी त्यांनी आता पक्ष बाजूला ठेऊन प्रत्येकाने सध्याच्या संकटात नुकसानग्रस्तांना मदत करणे महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकांनी मदत करावी, असे आवाहन मुंडे यांनी केले.
कोकणात झालेल्या नुकसानीबाबत आज परळी येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मदत रॅली काढली. यावेळी त्यांच्या मदतीच्या रॅलीत शिवसेनेसह विविध पक्ष, सामाजिक संघटना देखील सहभागी झाल्या. यावेळी भाजपनेत्या मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मदत फेरीबाबत त्या म्हणाल्या की, कोकणात महापुरामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सरकारकडून मदत मिळत आहे तरीही आपली मदत तिथपर्यंत पोहचविणे गरजेची आहे.
यावेळी पंकजा मुंडे यांनी मदतीसाठी सर्व पक्षांनी पुढे यावे असे आवाहनही केले. सध्या राजकारण करण्यापेक्षा शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष न मानत सर्वानी एकदिलाने महाराष्ट्रावर आलेले संकट आणि त्यासाठी समर्पण हे देणे हेच महत्त्वाचे काम आहे. पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तिथे गेली तर ते फायद्याचे आहे. आपण तिथे जाण्यापेक्षा, तिथे मदत पोहोचावी. नुकसानग्रस्त भागात सध्या मदत मिळणे आवश्यक आहे, असेही मुंडे म्हणाल्या.