हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या ११ राष्ट्रीय सचिवांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत मोदींनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. मंत्रीपदाची ‘अपेक्षा’ असलेल्या नेत्यांनाही मोदींनी खडे बोल सुनावले. आत्ता लोकसेवा करण्याची वेळ आहे. मंत्रीपद मागण्याची नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे उपस्थितीत असलेल्या बैठकीत लगावला. मंत्रीपदाला नव्हे तर लोकसेवेला प्राधान्य द्या, असा कानमंत्रही मोदींनी दिला.
एकूण ११ राष्ट्रीय सचिवांचा सोशल मीडिया रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हातात घेऊन बसले होते. एकूण २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले होते. त्यावर कोणकोणते नेते ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्रामवर व्यक्त झाले आहेत. याची इत्यंभूत माहिती मोदींकडे होती
पकंजा मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीत पकंजा तुम्ही जास्त बोलता, लोकल मुद्द्यांवर खूप बोलता पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत. लोकलपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांकडे जास्त लक्ष द्या असा सल्ला मोदींनी पंकजा मुंडेंना दिला. परंतु, हे सांगताना मोदीजींनी.. तुम्ही खूप बोलता या शब्दावर जोर दिला. त्यामुळे सर्वांनाच त्याचा अर्थ कळाला.
लोकांशी नाळ तोडू नका
बीड जिल्ह्यात एक मुस्लिम व्यक्तीनं गोशाळा बांधलीय. तो दीडशे गायींचा सांभाळ करतो. त्यांना केंद्र सरकारनं पद्मश्री दिलाय. या पद्मश्रींना जाऊन तुम्ही भेटला आहात का, असा सवालही मोदींनी पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर पंकजा मुंडे काहीच बोलल्या नाहीत. त्यावर लोकांशी नाळ तोडू नका असा सल्लाही मोदींनी दिला.