परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
शेतात उसाला पाणी देण्यास गेलेल्या एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आल्याने दोन दिवसांपूर्वी मानवत तालूक्यात खळबळ उडाली होती. शेतात झालेल्या या खुनाने ८० च्या दशकात महाराष्ट्रात गाजलेल्या मानवत खून खटल्याची स्थानिकांना आठवण करून दिली. या संदर्भात मृत महिलेच्या पतीने खून झाल्याची मानवत पोलिसांत फिर्याद होती. दरम्यान, पोलिसांच्या तपासात फिर्यादी पतीच पत्नीचा मारेकरी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसांकडून याविषयी मिळालेली माहिती अशी कि,दि. ३० जानेवारी रोजी मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील तुकाराम बाबुराव पिंपळे याने नेहमीप्रमाणे दुपारी शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या पत्नी आशामती तुकाराम पिंपळे (वय २९) हिस अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने जखमी करुन मारून टाकले आहे, अशी फिर्यादी दिली होती. सदर प्रकरणी मानवत पोलीसांनी पोलीस ठाणे मानवत गु.रं.न ११ / २०२० कलम ३०२ भा.दं.वि प्रमाणे गुन्ह्याची नोंद करुन या प्रकरणाचा तपास स.पो.नि शिवाजी पवार यांच्याकडे सोपवला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी ज्या शस्त्राने महिलेला मारण्यात आले ते शस्त्र आजूबाजूला आढळून आले नाही. फिर्यादी पतीला त्याच्या घराची चावी मागितली असता, ती हरवली असल्याचे त्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले. तुकाराम पिंपळे याने यावेळी आंघोळ करून कपडे बदलल्याचे व अंगावर नवीन बनियान घातल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांचा संशय तुकाराम पिंपळे याच्यावर बळावला होता .दरम्यान चौकशीमध्ये पोलिसांनी खाक्या दाखवताच तुकाराम पिंपळेने आपल्या पत्नीच्या खून केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले धारदार कोयता जप्त करण्यात आला असून त्याला तत्काळ अटक केल्याची माहीती स्थानिक पोलिसांनी दिली.
सदरचा तपास पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय, अपर पोलीस अधीक्षक श्री आर रागसुधा, उप.वि.पो.अ सेलू एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहा.पोलीस निरीक्षक शिवाजी पवार, सहा.पोऊनि ताठे, शेख गौस, पोहेकॉ. दीपक वाव्हळे, हनुमान पावडे, मगर आदींनी केला आहे.