परभणी जिल्ह्यात युतीचा झेंडा फडकला !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांचे निकाल आता हाती आले असून, जिल्ह्यातील मतदाराने तीन विद्यमान आमदारांना नाकारले आहे. तर परभणी विधानसभेच्या विद्यमान आमदारांना, पुन्हा संधी दिलीय. या निकालामुळे, जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आता, तीन चेहऱ्यांना बदलून संधी मिळाली आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघांमधून तुरूंगामधून निवडणूक लढवत उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळवत जिल्ह्यातील राजकारणामध्ये इतिहास नोंदवला आहे. यासोबतच परभणी मध्ये आमदार राहुल पाटील यांनी विरोधकांचे डिपॉझिट जप्त करत भव्य विजय खेचून आणला आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी – मानवत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व भाजपाचे उमेदवार मोहन फड यांना या निवडणुकीमध्ये पराजयाला सामोरे जावे लागले आहे . याठिकाणी काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांनी फड यांचा 14738 मतांनी पराभव केला आहे. वरपूडकर यांना या निवडणुकीत 1 लाख 5 हजार 297 मते मिळाली आहेत. जिल्ह्यातील दुसरा मतदार संघ असलेल्या जिंतूर सेलू मधूनही राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजय भांबळे हे पराजित झाले आहेत. भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी 3567 मतांनी त्यांचा पराभव केलाय. मेघना बोर्डीकर यांना तब्बल 1 लाख 16 हजार 146 मते मिळाली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचेच गंगाखेड – पालम चे विद्यमान आमदार, मधुसूदन केंद्रे यांना ही यावेळी जनतेने नाकारले असून, रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना 81 हजार 159 मते मिळवत आपला विजय साजरा केलाय. विशेष म्हणजे मधुसूदन केंद्रे यांना या निवडणुकीमध्ये, मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असुन त्यांना डिपॉजिट ही वाचवता आले नाहीय. गुट्टे यांनी तिरंगा मध्ये राहत निवडणूक लढवली होती .युतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे विशाल कदम यांनी दुसरे स्थान मिळवले आहे. त्यांना 62 हजार 643 मते मिळाली आहेत.

जिल्ह्यातील परभणी विधानसभा एकमेव मतदार संघ असून, याठिकाणी विद्यमान आमदाराने आपली खुर्ची कायम ठेवली आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार राहुल पाटील यांनी ही निवडणूक एकतर्फी जिंकत, सुमारे 81 हजार मतांच्या फरकाने आपला विजय साजरा केला. आ .राहुल पाटील यांना 1 लाख 3 हजार 469 मते निवडणुकीत मिळाली आणि त्यामुळे बाकी सर्व उमेदवारांचे मोठ्या संख्येने डिपॉझिट जप्त झाले आहे. एकुणच परभणी जिल्ह्यातील यावर्षी झालेल्या विधानसभा निकालांकडे पाहिले, तर विद्यमान उमेदवारांना विरोधात ,मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. आणि त्या नाराजीचा फायदा, विरोधकांनी उचलत आपला विजय साजरा केला.

Leave a Comment