मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलेले आहे. त्यांनी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहावे, असे समन्सद्वाराने सांगण्यात आलेले आहे. राज ठाकरेंना 22 आॅक्टाेबर 2008 राेजी अटक झाली होती. त्याचा निषेध नाेंदवत परळीतील पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटीवर दगडफेक केली हाेती. दरम्यान, न्यायालयाने राज ठाकरेंना 12 जानेवारी रोजी हजर राहण्याचे समन्सद्वारे सांगितले आहे.

एसटीवर करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट रद्द करून जामीन मिळवण्यासाठी राज ठाकरे 12 जानेवारी रोजी परळीत येणार आहेत. परळी येथील घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

राज ठाकरे व मनसे कार्यकर्ते न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 6 जानेवारी 2022 रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करत 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत परळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणातील मनसेचे तत्कालीन पदाधिकारी संजय अघाव, प्रल्हाद सुरवसे, अनीस बेग, शिवदास बिडगर, राम लटपटे या पाच जणांनी न्यायालयात हजर हाेऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. परंतु राज ठाकरे यांच्याविरुद्ध १३ एप्रिल रोजी दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.