सराफा दुकानफोडीचा मास्टरमाईंड पोलीसांच्या जाळ्यात; परतवाडा पोलिसांची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका सराफा दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात २ महिन्यांनी यश आलं आहे. ६० ते ७० लाख रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ करून पळालेल्या कुख्यात आरोपी पंकजसिंह दुधानी याला परतवाडा पोलीसांनी मुंबईतून अटक केलेली आहे.

परतवाडातील व्यावसायिक ईश्वरलाल अग्रवाल सराफ यांचे ज्वेलरीचे दुकान फोडून पंकजसिंह आणि त्याच्या ३ साथीदारांनी सोन्या-चांदीचे गहाण असणारे दागिने आणि इतर मुद्देमाल चोरून नेला होता. मागील ३ महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र चोरटे नेहमीच शिताफीने निसटून जात होते.

दरम्यान शुक्रवारी पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी मुंबईत अंबरनाथ येथील झोपडपट्टीमध्ये गेले असता या चोरी प्रकरणातील आरोपी तिथेच लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी पंकजसिंग दुधानी याला तडकाफडकी अटक केली. पोलिसांच्या पिसीआर टीमने मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रीया सुरू केली असून या चोरट्यांनी आणखीही चोरी केल्या आहेत का याचा तपास करणं पोलिसांकडून सुरू आहे.